यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ८२

सत्ताधा-याला संयम हवा

यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या जनकल्याणाची चिंता सदैव मनात बाळगून कार्य केले आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही दु:खविरहित जीवन जगण्यासाठी काळजी घ्यायला सांगताना ते म्हणतात, "दु:खात असलेल्या जनतेच्या जीवनावर सुखाची सावली निर्माण करणे हे राजाचे कार्य आता प्रत्येक मराठी माणसाने केले पाहिजे. एकेक माणूस, एकेक मूल, हे सावली देणारे झाड आहे असे मानून त्यास खतपाणी घातले पाहिजे." यावरून यशवंतरावांच्या मनात गोरगरीब जनतेबाबत किती कणव होती हे स्पष्ट होतेच शिवाय बंधुभाव वाढीस लागून महाराष्ट्रातील जनतेचे जीवन सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा ही त्यांची भावनाही स्पष्ट होते. महाराष्ट्रीय लोकांनी आपला धर्म, जात अगर पक्ष विसरून आपण सर्व एक बांधव आहोत असे मानले पाहिजे. फक्त महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणारा तो महाराष्ट्रीय असे न मानता जो महाराष्ट्रात राहतो आपल्या शक्तिनुसार जीवन समृद्ध करतो तो प्रत्येक माणूस महाराष्ट्रीय आहे अशी महाराष्ट्रीयन लोकांची व्याख्या ते करतात. यशवंतरावांनी 'माझ्या कल्पनेतील खेडे' या विषयावर पुणे आकाशवाणीवर भाषण केले. त्यावेळी त्यांच्या मनातील खेड्याची कल्पना ते पुढीलप्रमाणे स्पष्ट करतात, "माझ्या कल्पनेतील खेडे म्हणजे केव्हा एके काळी लोक शेती करू लागले आणि तिच्याभोवती राहू लागले आणि म्हणून बनले ते खेडे नाही किंवा ओढ्याच्या काठी शीळ घालीत हिंडणारा आणि कोळिकेची साद ऐकत फिरणारा कवी कल्पना करतो ते खेडे नाही, तर देशाच्या जीवनात आपले स्थान घेणारे, सदैव विकास करणारे, या टोकापासून त्या टोकापर्यंत जीवनाचे पडसाद ज्याच्यावर पडत आहेत आणि जे आपल्या उत्पादन क्षमतेने इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे असे वर्धिष्णू गाव हे माझ्या कल्पनेतील खेडे आहे." ग्रामीण भागात विकासाच्या माध्यमातून नवचैतन्य निर्माण झाले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. तसेच या भागात नवचैतन्य निर्माण करुन लोकशाहीस पूरक असे नवे नेतृत्व निर्माण झाले पाहिजे. सहकाराच्या माध्यमातून नव्या सुधारणा देशाच्या कानाकोप-यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत असे ते सांगत असत. आपली भरभराट शेतीवर तर अवलंबून आहेच एवढेच नव्हे तर आपले औद्योगिकरण शेतीच्या भरभराटीवर अवलंबून आहे असे त्यांचे ठम मत होते. एवढेच नव्हे तर शेतीला उद्योगाची जोड देऊन कृषी उद्योग निर्माण करण्यावर त्यांनी भर दिली. महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, ग्रामीण व कृषी औद्योगिक सहकार परिवर्तनाचा नवा दृष्टिकोन त्यांनी जनतेसमोर ठेवला. ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी कष्टकरी आणि कामकरी माणसाला माणूस म्हणून विकासाच्या नव्या वाटांवर स्वबळावर त्यांनी उभे करण्याचा प्रयत्न केला. श्रमाइतके व घामाइतके सुंदर जगात काहीच नाही अशी त्यांची ठाम भूमिका होती. म्हणूनच त्यांना श्रमिकाविषयी व ग्रामीण लोकांविषयी फार जिव्हाळा होता. जवळीक वाटत होती. उद्योगधंदे, कारखानदारी, रोजगारी, बेकारी, याविषयी त्यांनी मांडलेले वेगवेगळे विचार फार महत्त्वाचे आहेत. शेतकरी, कामगार, कारागीर यांची शक्ती आणि बुद्धी सहकाराकडे वळवायला हवी तिला विधायक वळण द्यायला हवे. असे वातावरण ग्रामीण भागात निर्माण झाले पाहिजे. आपल्या या स्वप्नाचे उद्दिष्ट सांगताना ते म्हणतात, "एकमेकांच्या वैरानं वसवलेले, दारिद्रयाने निराश झालेले, आजपर्यंत एकसारखा कुणीतरी आपल्यावरती अन्याय केला या भावनेनी इतराकडे संशयाने पाहणारे असे गाव वसण्यापेक्षा एकमेकांकडे सहृदयतेने मदत करण्याच्या भावनेने पाहणारा बंधूबंधूंचा असा एक निराळा समाज खेड्यांतून आपल्याला उभा करावयाचा आहे." असे ग्रामीण भागाबाबत व्यापक उद्दिष्ट ते स्पष्ट करतात. ग्रामीण भागातील शेतक-याला सहकारातून कर्जपुरवठा करता आला, त्याच्या शेतीमालावर प्रक्रिया करणारे कारखाने सुरू करता आले तर त्याची आर्थिक दुरावस्था दूर करता येईल.

सहकारात उद्धाराची शक्ती आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या औद्योगिक दृष्ट्या अविकसित ग्रामीण भागापर्यंत ही सहकारी चळवळ पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. ही चळवळ जनतेची चळवळ व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती, तसेच मार्गदर्शन त्यांनी केले. दुर्बलांना सामर्थ्य देण्यासाठी सहकारी चळवळीचा जन्म झालेला आहे या मूळ प्रेरणेकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे असा सल्लाही त्यांनी दिला. विकासाची ही प्रक्रिया तळाच्या माणसांपर्यंत पोहोचवायची असेल तर विकासाची संघटना व सत्ता जनतेच्या शेवटच्या थरापर्यंत पोहोचली पाहिजे असा आग्रही विचार ते मांडतात. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती करायची असेल तर शिक्षणाचा प्रसार होऊन जनता शहाणी व समजूतदार झाल्याशिवाय सहकारी चळवळीचा पाया भक्कम होणार नाही. शेती हाच महाराष्ट्रीयन लोकांना मुखअय व्यवसाय आहे. तो ग्रामीण विकासाचा गाभा आहे. या भाग्याभोवती छोटया उद्योगाची इमारत उभारली पाहिजे. महाराष्ट्राच्या भूमीवर उद्योगाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी शासनाचे मार्गदर्शन आणि उत्तेजन असायला हवे. सामान्य माणसांचे अर्थशास्त्र सहकाराशिवाय सुटणार नाही. सामान्य माणसांचे हित जोपासण्याच्या अर्थनीतीस त्यांनी त्यांच्या भाषणातून प्राधान्य दिले. याचबरोबर लोकशाहीचे हे स्वरुप कोठेही डागाळणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. कारण सहकार चळवळीत 'आर्थिक सत्ता' आहे याजी जाणीव लोकांना झाली आहे. त्यामुळे ही चळवळ एका अर्थाने सत्तेचे केंद्र बनत आहे.  आणि सत्तेचे केंद्र म्हटले म्हणजे लोकशाहीचा अंकुश त्यावर ठेवलाच पाहिजे. तसे न केल्यास अनियंत्रित सत्तेमुळे विकासाचे हे शस्त्र दुधारी ठरेल अशी साधार भीती ते व्यक्त करतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org