यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ७९

यशवंतरावांची भाषणे ही आशय, आविष्कार व अभिव्यक्तीच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने ती अभ्यासाचा विषय बनतात. या भाषणांचे भाषेच्या दृष्टीनेही वेगळेपण आहे. कारण आपल्या विचार विश्लेषणात त्यांनी भाषेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यांचे भाषण ही व्यक्तिगत क्रिया असल्याने त्यांच्या तोंडून व्यक्त होणा-या बोलीभाषेचा ठसा शाश्वत स्वरुपाचा आहे. त्यामुळे त्यांची भाषणे ही व्यक्तिगत आविष्काराची भाषिक प्रात्यक्षिके आहेत. या भाषणांतून आशय कसा प्रकट होतो. भाषा कशी वापरली जाते. त्याहीपेक्षा आशय प्रकट करण्याची त्यांच्या भाषेची पद्धती कशी होती हे प्रामुख्याने त्यांच्या भाषणांतून पाहावयास मिळते. भाषेचा उपयोग भाषणात कलाद्रव्यासारखा आहे. त्यामुळे भाषणात भाषेचा खास उपयोग केला आहे. त्यामुळे भाषा हेच त्यांच्या भाषणाचे महत्त्वाचे माध्यम आहे. ते जेव्हा भाषणांमधून शब्दाशब्दांतून पुढे सरकत असत तेव्हा त्यासाठी अलंकार, लय, प्रतिमा यांचा उपयोग करत असत. म्हणून समाजउपयोगी साधन म्हणून सामाजिक, शैक्षणिक विचारांचे दर्शन घडविण्यासाठी भाषेचा कलात्मक उपयोग त्यांनी केला. यशवंतरावांसारखा वक्ता भाषेचा हा जो नेहमीपेक्षा निराळा असा उपयोग करतो त्यासच त्यांची शैली म्हणता येईल. आल्पशा शब्दभांडाराच्या माध्यमातून आपल्या आशयाला अनुरूप अशा शब्दांची निवड करून त्यांचा नव्या संदर्भात वापर करून नवी रुपे तयार करून भाषेच्या सामर्थ्यात त्यांनी भर घातली आहे.

यशवंतरावांची इतर विषयावरील भाषणे

यशवंतरावांनी समाजाच्या प्रगतीला पोषक अशा नवविचारांचा उपयोग भाषणातून केला. त्यांचा तो काळच उद्बोधन आणि प्रबोधनाचा होता. तो काळ मराठी साहित्यातील उत्साहपूर्ण विस्ताराचा ऐतिहासिक टप्पा होता. यशवंतराव चव्हाण आणि हा कालखंड यांचा सांधा छानपैकी जमून गेला होता. कारण राजकीय नेत्याला सामाजिक, सांस्कृतिक परंपरा सांभाळावीच लागते. नेत्याला समोरच्या समाजाचे भान ठेवून परंपरा आणि नवपरिवर्तन यांचा मेळ घालावा लागतो. त्याला सतत सुबोध परिभाषेत व सरळ भाषेत बोलावे लागते. हे बोलण्यासाठी विषय प्रतिपादनासाठी त्यांनी अनेक विषयांवर आपले फक्त चिंतन केले. समाजात जेथे ढोंग, असत्य, लुच्चेगिरी, प्रतिगामित्व, अन्याय, जुलूम या गोष्टी आढळल्या तेथे त्यांनी भाषणांतून आवाज उठवला. ढोंगी आणि भ्रामक लोकांच्यावर तेवढ्याच तिखट अशा प्रतिक्रिया व्यक्त करून त्यांना सावधानतेचा इशारा दिला तर गुणी आणि पराक्रमी लोकांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकून त्यांचे कौतुक केले. महाराष्ट्राला वंदनीय आणि आदरणीय वाटणा-या अनेक सत्पुरूषांचा आणि विद्वानांचा गौरव केला. सत्कार्य आणि सद्हेतु यांचा सदैव विजय व्हावा म्हणून ते सतत झगडत राहिले. देशातील आणि इतर प्रांतांतील भीषण आणि बिकट घटनांची माहिती भाषणांतून दिली. 'संयुक्त महाराष्ट्र' च्या प्रसंगी तर या विषयावर निरनिराळ्या बाजूने त्यांनी मते नोंदवली. महाराष्ट्राच्या विकासाच्या आणि कल्याणाच्या चळवळीचा त्यांनी त्यांच्या भाषणातून हिरिरीने पुरस्कार केला. राजकारण हे लोककल्याणासाठी असते हे त्यांनी पुढा-यांना व जनतेस निक्षून सांगितले. त्यांनी आपली बुद्धिमत्ता, मुत्सद्देगिरी आणि कर्तृत्व यांचा योग्य वापर करून आपल्या वाणीच्या जोरावर महाराष्ट्राचे आणि राष्ट्राचे हित साधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी अनेक योजना राबविल्या. त्या योजना समाजापर्यंत जाण्यासाठी भाषणाच्या माध्यमातून जनजागृती केली. महाराष्ट्राच्या या प्रश्नांखेरीज संबंध राष्ट्राच्या आर्थिक, राजकीय, संरक्षण, परराष्ट्र इ. प्रश्नांबाबत त्यांनी परखड विचार मांडले. एकूणच देशाच्या पुरोगामी धोरणाला दिशा देण्यासाठी, तसेच राज्यकारभारातील वाढत्या भ्रष्टाचाराने निर्मूलन करण्यासाठी केंद्रीय मंत्री या नात्याने त्यांनी आपले सर्व वजन आणि सामर्थ्य पणाला लावले. देशाच्या सर्व भागांमधील जनतेला न्यायाची समानतेची नि विकासाची शाश्वती वाटण्यासाठी अनेक व्यासपीठांवरून त्यासंबंधी समजूतदार विचार मांडले, काँग्रेस राजवटीचा डगमगता डोलारा सावरला जाण्यासाठी अनेक काँग्रेस शिबिरापुढे त्यांनी नेत्यांना, कार्यकर्त्यांना, मार्गदर्शन केले. राजे लोकांच्या तनख्याबाबत पुरोगामी धोरण स्वीकारून त्यांनी त्यांचे तनखे बंद केले. यावरून यशवंतरावांच्याकडे असलेली समाजवादी दृष्टी व पुरोगामी धोरण लक्षात येते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org