यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ७८

म्हणून ही परिस्थिती काबूत आणावयाची असेल तर या गोरगरिबांच्या प्रश्नासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. ज्या योगे महाराष्ट्राचा मान आणि महाराष्ट्राची शान वाढेल असे काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवाय महाराष्ट्रातील माणसाला प्रश्नाचे गांभीर्य समजावून दिले तर तो उत्साहाने उठतो, पण कर्तव्याची जाणीव दिली नाही तर तो पुन्हा झोपतो, असा मारठी माणसांचा स्वभाव आहे. तेव्हा या गोरगरिबांचे कल्याण करावयाचे असेल, त्यांना भरभराटीचे व सुखाचे दिवस निर्माण करावयाचे असतील, त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करावयाची असेल तर त्यांच्या मनातील विचलित अवस्था नाहीशी करून त्यांना 'स्व' कर्तृत्वाची जाणीव करून देऊन प्रोत्साहित केले पाहिजे. "गरीबमनात नव्या आकांक्षा उत्पन्न करून त्यांना कार्यप्रवण करण्यास प्रवृत्त करण्याऐवजी त्यांच्यात असंतोषच पसरविण्याचा प्रयत्न झाला तरी रात्री त्यांचे लक्ष त्या श्रीमंताच्या तिजोरीकडे जाईल इतकेच. पण खरा प्रश्न कायमच राहील. पैसा हा पूंजापतींच्या किंवा सरकारच्या तिजोरीत नसून तो आकाशातील ढगांत आहे. त्या ढगांतून खाली पडणा-या जलधारात आहे. त्या पाण्याच्या प्रवाहरुपी नदीत आहे. नदीच्या दुकाठास मिळणा-या काळ्या जमिनीत आहे. त्याच जमिनीतील खनिज संपत्तीत आहे. त्याच खनिज संपत्तीद्वारा निर्माण होणा-या वैज्ञानिक यंत्रसामुग्रीत आहे. इतकेच नव्हे तर त्या सर्वांना एका सूत्रात बांधणा-या मानवाच्या मनगटात आहे. असे जर ह्या गरीब जनतेला पटवून देऊन त्यांच्यात सृजनशक्ती निर्माण करून त्यांना कार्यप्रवण केले तर आले सारे प्रश्न सुटतील व त्या सुटण्यातच भारतीय लोकशाहीचे भवितव्य सामावलेले आहे." असे विचार यशवंतरावांनी 'हिंदी लोकशाहीचे भवितव्य' या विषयावर वसंत व्याख्यानमालेत पुणे येथे इ.स. १९५२ मध्ये मांडले या गरीब समाजाने निराशावादी, भांडखोर, रडवी, विकलतेची, विषादाची आणि पराभवाची भावना सोडून दिली पाहिजे आणि आपल्या स्वत:च्या मनगटाच्या सामर्थ्यावर स्वत:चे जीवन स्वत:च फुलवले पाहिजे असा विश्वास ते व्यक्त करतात. यशवंतरावांनी सामाजिक प्रश्नांवर बोलताना सामूहिक विकास, रस्ते, पाणी, शिक्षण, जातीयता निर्मूलन, आर्थिक प्रगती, सेवाभावी संस्थांचे कार्य, कल्याणकारी योजना, शेतीचा प्रश्न,औद्योगिक विकास यांसारख्या असंख्य प्रश्नांवर भाष्ये केली आहेत. "संबंध मानवी समाजाचे कल्याण हे आपले अंतिम ध्येय असून आर्थिक विकास हे ते ध्येय साध्य करण्याचे एक साधन आहे. त्यामुळे सामाजिक समस्यांच्या संदर्भात आर्थिक समस्यांची पाहणी करणे आवश्यक आहे." यासाठी ज्ञानाची उपासना करणा-या ज्ञानी, विद्वान, बुद्धिवंतांनी कोणाच्या आमंत्रणाची वाट न पाहता स्वयंस्फूर्तीचे पुढाकार घेऊन आपली ज्ञानगंगा समाजापुढे खुली केली पाहिजे. सामाजिक परिवर्तन ज्ञानी विद्वानांच्या विचारसमंथनातून होत असते. म्हणून ज्ञानाची उपासना करणा-याची एक प्रचंड आघाडी निर्माण व्हावी, असे झाल्यास अनेक सामाजिक प्रश्न समूळ नाहीसे होतील. यशवंतराव हे जीवनवादी साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते असल्याने त्यांनी समाजावर संस्कार आणि जीवनमूल्यांवर निष्ठा ठेवणारे विचार दिले. सामाजिक दु:खे आणि समस्या यांना सामोरे जाणारा मार्ग त्यांनी भाषणांतून दाखवण्याचा प्रयत्न केला. अनेक सामाजिक प्रश्न हाताळले व वास्तवता आणि ध्येयवादास पूरक विचार मांडले. त्यामुळे त्यांचे हे विचार वाङ्मयीन तत्त्वविवेचनपर निबंधआत समाविष्ट होणारे आहेत. कारण अशा प्रकारच्या निबंध वाङ्मयात मूल्ये, तत्त्वे किंवा विचारप्रणाली या संबंधीचे विवेचन अभिप्रेत असते. म्हणजेच तत्त्वविवेचन हेच साधार असते. यशवंतरावांनी समाजातील अनेक प्रचलित कळीच्या मुद्यांवर भाषणातून मते मांडली आहेत. निबंध वाङ्मयातून अशा विविध प्रश्नांवर चर्चा केली जाते अथवा त्या समस्यांवर परखड अशी मते नोंदवली जातात. अशा स्वरुपाच्या निबंधात त्या विषयाचा दृष्टिकोन, त्या विषयाचे साक्षेपी ज्ञान, मुद्देसूद मांडणी इत्यादींना महत्त्व असते. यशवंतरावांच्या सामाजिक विषयांवरील भाषणांतून सुद्धा या सर्व मुद्दयांचा ऊहापोह आलेला आहे. निबंध लेखन हा एक प्रकारचा विचार व्यवहार असतो. यशवंतरावांच्या भाषणांतूनही विवेकशील विचारांचे विवेचन येते. या विवेचनासाठी सामान्य तर्कपद्धती, तुलनात्मक पद्धती, ऐतिहासिक पद्धती, शास्त्रीय पद्धती यांचा उपयोग केला जातो. आपल्या विचारांचे प्रतिपादन करून प्रभावीपणे त्या विचारांची मांडणी केली जाते. यशवंतरावसुद्धा सामाजिक, धार्मिक, राजकीय असा कोणतातरी सिद्धान्त, विचार उतरविण्याचा मनोमन प्रयत्न करत असत. त्यासाठी लेखणी आणि वाणी या दोन साधनांचा त्यांनी उपयोग केला. लोकजागृती आणि लोकसंग्रह ही दोन उद्दिष्टे समोर ठेवून ते सतत कार्यमग्न राहिले. त्यांच्या लेखनाची जी शैली होती तीच त्यांच्या वक्तृत्वाची राहिली. या गुणांमुळेच त्यांची भाषणेही निबंधासारखी होत. त्यांच्या या निबंधशैलीतील भाषणांतून देशाहिताची कळकळ, लोकजागृतीची तीव्र तळमळ, निर्भयता आणि निश्चय इ. गुण ओतप्रोत भरलेले आहेत. तसेच त्यांच्या या निबंध धाटणीच्या भाषणांतून त्यांच्या मनाची बैठक विचारवंतांची असली तरी तिला सर्वस्पर्शी रसिकतेचा, सूक्ष्म निरीक्षणाचा, सामाजिक जिव्हाळ्याचा, विविध विषयात रमणा-या वृत्तीचा आणि अस्सल मराठी व भरघोस अशा सुंदर भाषाशैलीचा आधार आहे. त्यामुळे त्यांच्या या साहित्यातून यशवंतरावांच्या व्यासंगाचे दर्शन घडतेच शिवाय त्यांच्या शैलीचा डौल, पांडित्याचे प्रतिबिंब जागोजागी पाहावयास मिळते. 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org