यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ७५


शहरापेक्षा ग्रामीण भागाकडे लक्ष :


यशवंतराव सामाजिक सुधारणेचे कार्य शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात करणे गरजेचे आहे असे सांगतात. कारण तेथील अज्ञान, रुढींचे प्राबल्य आणि प्रचंड दारिद्रय यामुळे खेड्यापाड्यातील समाज अतिशय देवभोळा व धर्मनिष्ठ बनला आहे. त्यामुळे तिथे जातीपातीची बंधने अतिशय कडक आहेत. अस्पृश्यता निवारणाचे कार्य हे तिथे काहीच करू शकत नाही. ग्रामीण भागात खेड्यापाड्यापर्यंत, आदिवासीपर्यंत समाज-सुधारकांनी पोहोचून तिथे परिवर्तन घडवून आणावे असा ते सल्ला देतात. हे करीत असताना त्या लोकांवर आपण उपकार करत आहोत ही भावना न ठेवता समाजकल्याण साधण्यासाठी करीत आहोत ही भूमिका असणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही ते बोलून दाखवितात. सामाजिक कार्याची दिशा सांगताना त्या कामाची दोन गटात विभागणी करतात, "पहिला प्रकारात मुख्यत: शारीरिक दृष्ट्या अपंग असलेले, भिकारी, बालगुन्हेगार, वेश्या, स्त्रियांचा अनैतिक व्यापार करणारे व अमली पदार्थांचे सेवन करणारे व्यसनी लोक आणि त्याचप्रमाणे हरिजन, गिरिजन व माजी गुन्हेगार यांसारख्या समाजातील सर्वसाधारण हक्कापासून वंचित झालेल्या दलित लोकांच्या उद्धारासंबंधीच्या प्रश्नांचा समावेश होतो. तर दुस-या प्रकारात बालक व युवक कल्याण, ग्रामीण पुनर्रचना, समाजविकास, कुटुंबनियोजन वगैरे प्रश्नांचा अंतर्भाव होतो." या दोन्ही गटांतील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकार व समाजसुधारणा करणा-या नेतृत्वाची गरज ते बोलून दाखवतात. ही समाजसेवा करणा-याला कुठल्याही शिक्षणाची गरज नसते. फक्त सेवा करण्याची आवड व इच्छा असावी लागते. तसेच सामाजिक प्रश्नांची विशालता व गुंतागुंत पाहता अनेक चांगल्या सामाजिक संस्थांनी समाजसेवेकरिता पुढे यावे असे आव्हानही करतात. हे काम शास्त्रोक्त पद्धतीने होण्यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, क्रीडामंडळे, कलाकेंद्रे यांच्या सहकार्याची अपेक्षा ते व्यक्त करतात. शिवाय कोणत्याही विरोधाला न जुमानता समाजसुधारणा करणे आवश्यक असते. विशिष्ट अल्पसंख्य समाजाचे हक्क मिळवून देण्यासाठी बहुसंख्यकांना विरोध करावा लागतो. हे कार्य सरकारपेक्षा अशा सामाजिक सस्थांनी करणे अत्यंत उचित आहे.

मरगळलेल्या सामाजिक जाणिवा दूर करण्याचे महत्त्वाचे काम यशवंतरावांच्या या भाषणांनी केले आहे. त्यांनी त्यांच्या या सामाजिक भाषणांतून समाजवादी वास्तवाचे चित्र निर्माण करण्याचा सदैव प्रयत्न केला. व्यक्तीच्या बांधीलकीचे तत्त्व पुढे करून समाजाच्या साकल्याचे खरेखुरे क्षेत्र सामाजिक जीवनच आहे हे यशवंतरावांनी आग्रहाने प्रतिपादन केले. भारतातील समाज गरीब व श्रमजीवी आहे. अशा समाजाला मूठभर भांडवलदारांच्या कचाट्यातून मुक्त करावयाचे असेल तर जातीधर्मावर आधारलेली जुनी समाजव्यवस्था नाहीशी झाली पाहिजे. प्राचीन सामाजिक परंपरेचा व प्रचलित व्यवस्थेचा समग्रपणे निषेध करणारी एक न्याय्य समाजव्यवस्था नव्याने निर्माण झाली पाहिजे. जन्मजात उच्चनीचतेच्या कल्पनेवर आधारलेली जुनी समाजव्यवस्था मोडून सामाजिक, आर्थिक समानतेवर आधारलेली नवसमाजरचना उभी केली पाहिजे. सामाजिक आशयाच्या नव्या नव्या कक्षा धुंडाळताना यशवंतरावांनी समाजाचा तळठाव घेण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव म्हणतात, "या देशातील गरीबी, या देशातील विषमता नष्ट व्हावी म्हणून आम्ही स्वराज्य मिळवले. पिढ्यान् पिढ्या आमच्या मानगुटीवर बसलेले हे गरिबीचे भूत उठले पाहिजे. जातीच्या धर्मांच्या वेडाने आम्ही दबून गेलेलो, तुटलेलो, फाटलेलो असे लोक आहोत. आमची ही दबलेली, तुटलेली, फाटलेली मने बांधली जाऊन एक बनली पाहिजे. हिंदुस्थान हा सुखासमाधानाने, कर्तृत्वाने आणि वैभवाने नांदणारा असा एक नवा समाज बनावा, एकजिनसी समाज बनावा, असे समाजवादी चित्र आज आमच्या डोळ्यांपुढे आहे.


यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org