यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ७४


संतांना पडणारी जातीची चौकट

यशवंतरावांनी समाजाला जाती-धर्मनिरपेक्ष विचारांचे संस्कार आपल्या भाषणांतून दिले. जातीचा विचार त्यांच्या मनाला फारसा शिवला नाही. किंबहुना जातीचे राजकारण त्यांना फारसे आवडत नसे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी, शीख अशा धर्माच्या लोकांमध्ये त्यांनी कधी फरक केला नाही. उलट मोठ्या माणसांची परस्परांशी तुलाना करू नये. त्यांना विशिष्ट जातीचे बनवून आपण करंटेपणा दाखवित आहोत. या संदर्भात ते म्हणतात, "महात्मा फुले फक्त माळ्यांचे, डॉ. आंबेडकर फक्त बौद्धांचे, गांधी फक्त गुजराथ्यांचे, टिळक फक्त ब्राह्मणांचे, शिवाजीमहाराज फक्त मराठ्यांचे अशा प्रकारे जर आम्ही या महापुरुषांच्या वाटण्या केल्या. तर या हिंदुस्थानामध्ये सामाजिक क्रांती कधीच होणार नाही. " ज्या त्या जातीतील लोकांनी त्यंचे उत्सव साजरे करणे, त्यांची पूजा करणे यशवंतरावांना मान्य नाही. कारण त्या व्यक्तींचे जीवन हे सर्व समाजासाठी होते. म्हणून त्यांच्याविषयी सर्व समाजाने आदर दाखवू त्यांच्या शिकवणुकीचे अनुकरण करावे. संतांनीही आम्हा महाराष्ट्रीयांना हीच शिकवण दिल्याचे त सांगतात. पंढरीच्या भागवत धर्माच्या झेंड्याखाली तुकाराम, रामदास, नामदेव, ज्ञानेश्वर, चोखामेळा, गोरा कुंभार, सावतामाळी अशा अठरा पगड जातींची मंडळी एकत्र आली. त्याचवेळी ख-या अर्थाने सामाजिक क्रांती व्हायला हवी होती. पण आज आम्ही संतांना सुद्धा आमच्या सोयीप्रमाणे आमच्यासारखे करतो. म्हणून जुन्या जातीधर्माच्या परंपरांनी येथील सामाजिक क्रांतीला नेहमीच अडथळा निर्माण केल्याचे ते सांगतात. " कोणी राजकारणाच्या क्षेत्रात काम करीत असतील, कोणी साहित्याच्या क्षेत्रात काम करीत असतील कोणी आर्थिक क्षेत्रात काम करीत असतील किंवा कोणी दुस-या कुठल्या क्षेत्रात काम करीत असतील, पण या सगळ्यांनी मनामध्ये हे समजले पाहिजे की आमच्यामध्ये नाना त-हेच्या सामाजिक भेदाभेदांची मोठी थोरली उतरंड रचली म्हणून हिंदुस्थआन दुबळा झाला. हिंदुस्थानचा दुबळेपणा, हिंदुस्थानचा मागासलेपणा हा या उतरंडीचा परिणाम आहे असे माझे स्पष्ट मत आहे." त्यांच्या या विचारावरून ते निधर्मी लोकशाहीवादाचे कसे पुरस्कर्ते होते हे स्पष्ट होते. जातीभेदापलीकडचा मानवतावादी दृष्टिकोन त्यांनी येथे मांडला आहे. यातून त्यांच्या निर्मळ व ऋजू मनाचे प्रतिबिंब आढळते. तसेच त्यांच्या मनाची मंगलता, उदात्तता, विशालत्व, शब्दाशब्दातून जाणवते, मानवी सुहृदयपणाचा ध्यास प्रकट होताना दिसतो.

म्हणूनच माणसाचे माणसाविरुद्ध केलेल्या अन्यायाविरूद्ध पोटतिडकीने बोलणे हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय बनतो. "मला वाटते आपण सा-यांनी एकत्र यावे. आपली जात, भाषा, विसरावी. आपले जुने भेद विसरावेत, भांडणे गाडून टाकावीत. मला वाटते, आपली प्रगती रोखणारी सारी बंधने आपण झुगारुन द्यावीत. त्या बंधनांनी आपले जखडलेले मन मोकळे करावे. त्यात कष्टाचे प्रेम निर्माण व्हावे अन् त्या प्रेमाच्या आधारावर त्याने आपले पाऊल झटपट उचलावे. त्याला गरिबीची घृणा वाटावी. रिकामटेकडेपणाची लाज वाटावी. विनाकारण मतभेद चर्चा करून आळसांचे बुरखे पांघरून बसण्याचा मोह त्याला होऊ नये. त्याने एकच निर्धार करावा मी पुढे जाणार ! हा निश्चय ज्या माणसाच्या हृदयात पक्का होईल तोच महाराष्ट्राची प्रगती करू शकेल. हे कार्य सोपे आहे असे मी कधीच म्हणत नाही. पण इतिहासात आम्ही यापेक्षाही अवघड कार्ये करून दाखविली आहेत. मग आजच ती अशक्य का वाटावीत? आम्ही एकत्र आलो, आम्ही निश्चय केला, आपसातील मतभेद मिटवले व गरिबीची बंधने झुगारुन देऊन आळसाचे विषय बाजूला करून जर संपन्न आयुष्याचा मार्ग चालू लागलो तर महाराष्ट्राची जनता ख-या अर्थाने नवा इतिहास घडवू लागली असे मी म्हणेन, " मतभेद केवळ मतभेदासाठीच असू नयेत असे यशवंतराव सांगतात. शिवाय जातीय भावना समूळ नष्ट करण्याच्या कार्यात समाज सदैव गुंतला पाहिजे व तसे प्रयत्न करावेत असाही सल्ला ते देतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org