यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ७१

यशवंतरावांनी मराठी भाषा सक्षम बनविली पाहिजे असा विचार मांडला. या भाषेतून विविध विद्याशाखेतील विषय शिकवले जाण्याची आवश्यकता ते सांगतात. याचबरोबर इतर भाषेतून शिकण्यासाठी जो वेळ, श्रम लागतात तेवढ्या वेळात जर मराठी भाषेतून शिक्षण घेतले तर त्याच्या चौपट लागणारा वेळ निश्चित वाचेल. शिवाय त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल व आत्मविश्वास बळावेल, मात्र मराठी भाषा शब्दसंपत्तीने व आविष्कार क्षमतेच्या दृष्टीने संपन्न बनली पाहिजे. भाषा ही राबवावी लागते. जास्तीतजास्त ती वापरात आणली की साहजिकच ती वाढेल व तिचा विकास होईल. या संदर्भात यशवंतराव म्हणतात, "खरे म्हणजे भाषा ही विचाराच्या पाठीमागे येत असते. भाषेचे खरे सामर्थ्य विचार व्यक्त करण्यात आहे. संशोधनाच्या क्षेत्रात नवे विचार आणण्याचा प्रयत्न करणारी माणसे जसजशी निर्माण होतील, वाढतील, तसतशी भाषा वाढत जाईल. नवे अनुभव आले, भाषा वाढली, नवे काम वाढले, भाषा वाढली. पहिल्याने मोटारीची कल्पना आली, मग नंतर मोटार आली आणि त्या मोटारीबरोबर कितीतरी नवे शब्द आले. एक नवी परिभाषा आली. साखर कारखान्यांबरोबर कितीतरी नव्या कल्पना आल्या, नवीन जीवन आले. नवा विचार आला की भाषा नवे रंगरूप घेऊन आपल्यापाशी येते आणि तो विचार व्यक्त करण्याच्या प्रयत्नात ती स्वत:च संपन्न होऊन जाते. भाषेचे स्वरुप हे असे आहे. तेव्हा भाषा ही सतत वाढत राहील. याबद्दल शंका नको. आम्ही जर ठरविले की, रसायनशास्त्र हे मराठीत शिकवायचे तर त्यात काय अवघड आहे? त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे मात्र खरे आहे. पण निव्वळ परक्या लोकांच्या ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून मराठी भाषा वाढेल असे नाही. माझ्या मते भाषांतरित भाषा फारशी चांगली नसते." शिक्षणाचा भाषेशी अतिशय निकटचा संबंध असल्याने यशवंतरावांनी भाषेविषयी अतिश विस्ताराने आपले मत मांडले आहे. अहो तुम्ह ज्ञान शिकाल की भाषा शिकाल? " तुम्ही इंग्रजीतून जरी ज्ञान शिकला असला तरी तुम्हाला ते तुमच्या मातृभाषेत सांगता आले पाहिजे. प्रयत्न करा, मोडके तोडके बोलावयास सुरुवात करा. प्रयत्न केल्यास सर्व काही जमेल." रशिया, जर्मन, जपान, चीन या देशात 'इंग्रजी' ही ज्ञानभाषा नाही. तरीही आपल्या भाषेतून हा देश संपन्न व समृद्ध बनला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व स्तरांवर अध्यापनाचे माध्यम म्हणून मराठी भाषेचा स्वीकार करावा. मराठी भाषा शिकविणा-याचा, शिकणा-याचा विश्वास वाढविला पाहिजे. शिवाय मराठी भाषेत इतर भाषांतले ज्ञान-विज्ञान आणण्याचे कार्य सातत्याने करणे गरजेचे आहे. असे केल्याने मराठी भाषिकांच्या मुलांच्या डोक्यावरील इंग्रजी भाषेचे ओझे निघून जाईल व सहजतेने त्यांना त्यांच्या भाषेतून ज्ञान-लाभ होईल आणि मराठी भाषेची उपेक्षा, अवहेलना थांबेल. यासाठी उच्च शिक्षण मातृभाषेतून व्हावे असा यशंवतरावांचा हेतू दिसतो.

भाषाप्रभुत्व

यशवंतरावांची निबंधशैलीतील शैक्षणिक विषयावरील भाषणेही त्यांच्या मराठी भाषेवरील विलक्षण प्रभुत्व दाखवणारी आहेत. त्यांची ही भाषणे गांधीजीं किंवा  शास्त्रींच्या भाषणाइतकी निर्मळ व बिनचूक आहेत. त्यांच्या या भाषणात भाषेचा अपूर्व विलास आणि शिक्षणाविषयी मांडलेले गहन विचार, श्रोत्यांच्या बुद्धीला पटवून देण्यासाठी ज्या विषयाला अनुलक्षून उत्कट काव्यमय शब्दांचा वापर करण्यातच त्यांच्या प्रतिभेचा कल अधिक आहे. मग अशा वेळी आपल्या काव्यमय विचारविलासाने व भाषाविलासाने ते श्रोत्यांना गुंग करत असत. यशवंतरावांच्या या भाषणांतील शब्दकला अतिशय साधी व अर्थवाही आहे. तिच्यात कुठेही जडता नाही. शिक्षणासारख्या विषयावर विचार मांडताना आपले अंगभूत भाषासौंदर्य संयमाने समर्थ शब्दातून प्रकट करतात. शब्दांच्या सुंदरतेपेक्षा चांगला विचार देण्यावर त्यांचा अधिक भर आहे. यशवंतरावांनी या निबंध सदृश शैलीतील भाषणातून शिक्षणासारख्या विषयावरील महत्त्वपूर्ण विचार समाजाला आग्रहपूर्वक दिला. समाजाच्या व राष्ट्राच्या जीवनशक्तीला चालना देणारी विचारधाराच त्यांनी मांडली. ज्ञान आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांची बांधीलकी सांगत शिक्षण, राष्ट्र, भाषा यासारख्या विषयांवरील आपले चिंतन त्यांनी प्रकट केले. या चिंतनातून त्यांनी जीवननिष्ठ विचाराला व शिक्षणाला अधिक महत्त्व दिले. सामाजिक व शैक्षणिक विचारात रस घेणा-या यशवंतरावांनी आपल्या चिंतनशील वृत्तीतून अनेक शैक्षणिक विचार सांगितले. या विचारांची बोली, व्याप्ती व विस्तार निबंधासारखा आहे. त्यामुळे हे विचार गंभीर स्वरुपाचे असले तरी त्यातही लालित्य आहे. त्यात तार्किक सुसंगती, खंडनमंडनाची भाषा, शैलीचा सुबोधपणा या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांच्या निबंधशैलीतील भाषणातही स्वत:चा वैशिष्टयपूर्ण बाज दिसतो. तसेच सरळ विचाराला भिडण्याची आणि तो विचार ठामपणे मांडण्याची यशवंतरावांची भूमिका येथे दिसते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org