यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ६९

आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे गुणदोष काय आहेत याचा शोध घेऊन गुणांचा विकास व दोषांचे निराकरण करणे, आपल्या प्रदेशाचे जे निकडीचे प्रश्न असतील त्यांचा अभ्यास करणे आणि जनहिताच्या दृष्टीने हे प्रश्न सोडविण्यास साह्य करणे हीच सुशिक्षित तरुणांकडून आज अपेक्षा आहे." यशवंतराव या विचारांनी नवपदवीधारकांना प्रभावित तर करतातच शिवाय त्यांना सत्कार्याची दिशाही दाखवितात. त्या दिशेने जाऊनच त्यांना समाजाचे आणि राष्ट्राचे हित साधायला सांगतात.

आज आपल्या देश सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न होण्यासाठी विज्ञाननिष्ठ समाजाचा पाया रचण्याची गरज आहे. त्यासाठी आजच्या तरुणांनी विज्ञानशिक्षणाकडे आकर्षित झाले पाहिजे. हे शिक्षण पाठांतरापेक्षा संशोधनातून व अनुभवातून घेतले पाहिजे व यातून वैज्ञानिक व्यासंगाची लाट निर्माण झाली पाहिजे, या लाटेतून समाजात एक नवी वैचारिक ताकद निर्माण व्हावी. म्हणून या ज्ञानाचा पाठलाग करण्याची व ज्ञानाची सफर पुरी करण्याची ताकद आणि दृष्टी माणसात निर्माण झाली पाहिजे. कारण पूर्वी पायी रखडणारा माणूस बैलगाडीतून, मोटारीतून, हवेतून व विमानातून धाव लागला आहे. ही विज्ञानाची प्रगती झपाट्याने होत आहे. भविष्यात कदाचित पृथ्वीवरीलच नव्हे तर अब्जावधी कि.मी. दूर असलेल्या ग्रहता-यावरचा कारभारसुद्धा हाकावा लागेल आणि हे आवाहन या नवशिक्षितांनी स्वीकारले पाहिजे, असा ते वैज्ञानिक दृष्टीकोन सांगतात. 'अज्ञान' हा शब्द महाराष्ट्राचा कोषातन बाहेर काढला पाहिजे. हे काम तसे सोपे नाही. त्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी समाजात चांगली बीजे व मूल्ये निर्माण व्हावीत. महायुद्धात पराभूत झालेला जर्मनीने १० वर्षात पूर्वीपेक्षा उत्तम जर्मनी केवळ यांत्रिक तज्ञ व कुशल वैज्ञानिक यांच्या जोरावर निर्माण केल्याचे उदाहरण देतात. म्हणून विज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतिकारक परिवर्तन घडावे यासाठी ते सांगतात, "फक्त आम्हाला तांत्रिक शिक्षण, वेगवेगळ्या शास्त्रांचे शिक्षण घेतले पाहिजे. अशा त-हेच्या शिक्षणाला आम्हाला प्राधान्य दिले पाहिजे. याशिवाय ज्याला आपण ह्युमॅनिटीचे शिक्षण म्हणतो अशा त-हेच्या शिक्षणाचेही अर्थात महत्त्व आहेच. हे मूलभूत शिक्षण आम्हाला मंजूर आहे आणि या शिक्षणाच्या बाबतीत, शिक्षणाची सारी दारे सताड उघडी करन ते खालच्या थरापर्यंत पोहोचविण्याचे आमचे ध्येय असले पाहिजे. मी तर असे म्हणेन की, या त-हेच्या शिक्षणाचे प्रकाशझोत अगदी शेवट्या थरापर्यंत आम्ही नेऊ शकलो, तर महाराष्ट्राची शक्ती इतकी जबरदस्त वाढेल की त्याला कोणाच्याही मेहेरबानीवर अवलंबून राहण्याचे कारण राहणार नाही. तो स्वत:चे रक्षण करील आणि राष्ट्राचेही रक्षण करील." असा विचार सांगली येथील जाहीर सभेत 'महाराष्ट्राच्या भवितव्याची सफर' या विषयावर बोलताना व्यक्त केला. माणसाच्या मूलभूत गरजांचा प्रश्न सोडविण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. यासाठी आजची शिक्षण पद्धती कशी असावी यावर त्यांनी विचार मांडले. हे शिक्षण कदाचित चांगले असेल परंतु नोकरपेशाची मनोवृत्ती निर्माण करणारे आहे. अशा स्वरुपाच्या शिक्षणाची आज आवश्यकता नाही. त्यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाच्या शिक्षणातून आधुनिक उद्योगधंद्यात वाढ करणारे शिक्षण आज हवे. जेणेकरून देशाच्या विकासाला नवीन दिशा मिळतील. शिक्षणासंबंधी बोलताना ते देशाचा विकास व शिक्षण यांचा समन्वय साधत तरुणांना आवाहन करतात की, "शिक्षण संपल्यावर नोकरी करणार नाही अशी प्रतिज्ञा करा. बुद्धी व हात यांचा उपयोग करा. शौर्याला आम्ही कमी पडलो नाही तर शास्त्राला कमी पडलो. नव्या आकांक्षांनी पेटलेले तरुण आता पुढे आले पाहिजेत. कर्तृत्वाचे पीकच महाराष्ट्रात उभे राहिले पाहिजे. गुणी व बुद्धिमान असा महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे. नवीन घडणारा महाराष्ट्र Sky is the limit ( आकाश हीच वेस ) असा आदर्श ठेवणारा होवो."

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org