यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ६८

प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची गरज

यशवंतराव प्राथमिक शिक्षण व शाळांबाबत आपली भूमिका अशी स्पष्ट करतात, "प्राथमिक शाळांसंबंधी माझी स्वत:ची अशी कल्पना आहे की, या शाळा ठराविक अंतरावर असाव्यात. कारण चार-सहा वर्षांच्या लहान मुलांची किती अंतर ओलांडून शाळेमध्ये जावे हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. दोन तीन मजल्यांची मोठी शाळा या मुलांकरिता आवश्यक आहे असे मी मानीत नाही. त्यांच्यासाठी दोनशे अडीचशे पेक्षा जास्त संख्या असणार नाही अशा अनेक शाळा गावाच्या वेगवेगळ्या भागात असाव्यात. शाळा एकमजली असावी. तिला पुष्कळशी हवा मिळेल अशी व्यवस्था असावी. बाहेर छोटीशी बाग असावी आणि शाळेतील मुलांना निदान न्याहारी तरी देता यावी. या गोष्टी ज्या दिवशी घडून येतील तो दिवस माझ्या मताने मोठ्या आनंदाचा ठरेल" यशंवतरावांनी प्राथमिक शाळांच्या प्रश्नाचे बारकाईने स्पष्टीकरण केलेच शिवाय आदर्श प्राथमिक शाळा कशी असावी या बाबतही आपले मनोगत भिवंडी नगरपालिका शतसंवत्सरिक महोत्सवप्रसंगी व्यक्त केले. प्राथमिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या तरच तळागाळातील बहुजन वर्ग शिक्षित होऊन माध्यमिक व उच्च शिक्षण घेईल. असा त्यांचा विश्वास होता. म्हणूनच ते प्राथमिक शिक्षणाला अधिक महत्त्व देतात, "शिक्षणकार्य हे केवळ नैतिक कार्य आहे असे नाही. कोणत्याही सामाजिक कार्यास नैतिकतेचे अधिष्ठान लागते. त्यावाचून ते टिकाऊ व परिणामकारक होऊ शकणार नाही. शिक्षणकार्य हे तर याहून मौलिक स्वरुपाचे म्हणजे चारित्र्य घडविण्याचे कार्य आहे." हे पवित्र काम शिक्षणतज्ञांनी, शिक्षकांनी व विचारवंतानी करावे असे यशवंतराव सांगतात.

यशवंतरावांनी प्राथमिक शिक्षणाबद्दल जशी भूमिका मांडली तशीच त्यांनी माध्यमिक शिक्षणाबद्दलही मांडली आहे. "हे शिक्षण अर्थपूर्ण व सर्वस्पर्शी असावे. या शिक्षणात विविधता आणावी. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण या शिक्षणाच्या एका पुढील एका पाय-या आहेत. त्यामुळे त्यात एकसूत्रीपणा असावा. थोडक्यात म्हणजे काही काळ तरी माध्यमिक शिक्षण हेच बहुसंख्य मुलांच्या जीवनातील अंतिम शिक्षण असून त्यांच्यापुरते बोलायचे झाल्यास हे शिक्षण म्हणजे त्याच्या भावी जीवनाची खूपच मोठी शिदोरी ठरणार आहे. तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो की, हे शिक्षण पुरे होत असताना जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी लागणारी साधनासामग्री विद्यार्थ्यांच्या पदरात पडते आहे किंवा नाही ? हे सर्व पाहण्याची जबाबदारी अर्थातच शासनावर आहे. आणि पर्यायाने ती आता माध्यमिक शिक्षणमंडळावर पडणार आहे."  असा विचार त्यांनी माध्यमिक शिक्षणमंडळाच्या उद्घाटनप्रसंगी 'माध्यमिक शिक्षणाचे महत्त्व' या विषयावर पुणे येथे व्यक्त केले. समाजाला आणि राष्ट्राला स्वावलंबी बनविण्याची एकमेव शक्ती शिक्षणात आहे. म्हणूनच त्यांनी व्यावसायिक शिक्षणाचा पुरस्कार केला. शिक्षणप्रसार म्हणजे शिक्षणविस्तार हा विचार त्यांनी वारंवार मांडला. या शिक्षणामुळे समाजामध्ये पहिल्या प्रतीच्या माणसांची वाढ व्हावी. त्यात गुणी माणसांची वाढ अधिक असावी आणि ज्ञानाच्या विविध क्षेत्रात पराक्रम करण्याची संधी त्यांना मिळावी. तेव्हा अशा पात्रतेची गुणी माणसं माध्यमिक शिक्षणातून निर्माण व्हावीत व ती करावी लागतील असा आशावाद ते व्यक्त करतात.

अमृताच्या कुंभातून लोकगंगेची समृद्धी

उच्च विद्यापीठीय शिक्षणाबाबतही त्यांनी असाच विचार व्यक्त केला आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात अभिभाष्य करताना यशवंतरावांनी उच्चशिक्षणविषयक विचार मांडले. तसचे पदवी शिक्षणापासून व पदवीधारकांपासून काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत. बदलत्या काळामध्ये नवे प्रश्न, नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या नव्या काळाला अनुकूल शिक्षण व शिक्षणपद्धती असणे आवश्यक आहे. कारण काळ कधी स्थिर नसतो. काळाबरोबर जाणे अपरिहार्य असते. कारण जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वीपेक्षा आज आमूलाग्र बदलला आहे. शिक्षणाचा एकूणच उद्देश त्या त्या देशातील समस्या, प्रश्न, विषमता नाहीशी करणे हा आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून या संदर्भात ते अशी अपेक्षा व्यक्त करतात, " या विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी ज्या विद्यार्थ्यांना लाभली आहे त्यांना माझी अशी विनंती आहे की, त्यांनी आपल्या भोवती घडत असलेल्या घटनांचा बारकाईने अभ्यास करावा. एवढेच नव्हे तर त्या घटनांना योग्य प्रकारे वळण लागेल अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न करावेत. या प्रदेशाचे भावी नागरिक या नात्याने त्याच्या उन्नतीसाठी व उत्कर्षासाठी प्रयत्न करण हे त्यांचे कर्तव्यच ठरते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org