यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ६४

चैतन्यदायी विचार

यशवंतरावांनी देशातल्या दारिद्रयाच्या दृष्टीने किंवा देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने अशा स्वरुपाच्या लेखनात अंतर्मुख होऊन विचार केला आहे. केवळ आत्मविष्कारासाठी विचारप्रकटीकरण हा हेतू न ठेवता संवेदनशील वृत्तीने सामाजिक, राष्ट्रीय भावनांनी भरलेले विचार ते मांडतात. एवढेच नव्हे तर मानवी जीवनाचे जिव्हाळ्याचे केलेले चिंतन व त्यातून निर्माण झालेला विचारविलास असेच त्यांच्या निबंधाचे स्वरुप आहे. ग्रामीण जीवन पद्धती, विविध स्तरांवरील सुसंस्कृत व्यक्तींचा सहवास या सर्वांचा संस्कार त्यांच्या निबंधशैलीवर दिसतो. त्यांच्या या स्वरुपातील भाषणातील विचार महाराष्ट्राचे विचारधनच आहे. हे सर्वांना मार्गदर्शक व प्रेरक ठरतील ही या निबंधलेखनाची सर्वात मोठी  उपयुक्तता आहे. या निबंधलेखनात मराठी माणसाने पाहिलेल्या उज्ज्वल भवितव्याच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रेरणा देणारा विचार मांडलेला आहे. राष्ट्राची उभारणी करण्याचा एकंदरीत मनोदय या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मानवतावादी जीवननिष्ठा आणि कार्यप्रवणता यांचा संदर्भ या निबंधांना लाभलेला आहे. या दृष्टीने ललित निबंधाची प्रवृत्ती घेऊन येणा-या त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक विषयांवरील भाषणसाहित्याचा विचार प्रस्तुत ठिकाणी अपेक्षित आहे.

यशवंतरावांनी स्वातंत्र्योत्तर काळात मराठी माणसांची दुर्बल व आत्मनिर्भत्सनेची मानसिक अवस्था दूर करण्यासाठी देशाच्या कानाकोप-यात जाऊन भाषणांतून संदेश दिले. स्वदेश प्रीती व स्वाभिमान यांचे तेज निर्माण करण्यासाठी विविध विषयावरील चिंतनातून आपला मनोदय व्यक्त केला. या दृष्टीने त्यांची भाषणे महत्त्वाची आहेत. या भाषणांतून त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय येतो. त्यांचे खरे व्यक्तिमत्त्व त्यांच्या इतर वाङ्मयापेक्षा त्यांच्या भाषणरुपी साहित्यातूनच अधिक प्रकट झाले आहे. अतिशय कसदार असे विचार व्यक्त करुन चैतन्यमय व टवटवीत समाज निर्माण करणे हाच त्यांच्या विचारांचा गाभा आहे. 'ग्रामीण शिक्षणाची माझी कल्पना', 'नवपदवीधारकांकडून अपेक्षा', 'समाजाभिमुख शिक्षण', 'माध्यमिक शिक्षणाची गरज' 'अमृताचे कुंभ', 'लोकशाहीशक्तीचा प्रभावी आविष्कार', 'सोनियाचा दिवस', 'समाजक्रांतीचे रसायन', 'जनप्रेमाची शक्ती', 'शिक्षण-संख्या व दर्जा', यांसारख्या असंख्य विषयांतून त्यांनी शिक्षण व शिक्षणाचे महत्त्व आपल्या भाषणांतून जनतेस सांगितले. सत्तेवर असताना त्यांनी अनेक शैक्षणिक सवलती देऊन गोर-गरिबांच्या मुलांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. सत्ता नसतानाही त्यांनी अनेक शैक्षणिक प्रश्नांवर भाष्य केले व त्या प्रश्नांचा छडा लावला. समाजाची उन्नती, समाजाचे कल्याण हेच यशवंतरावांनी आपल्या समाजकार्याचे प्रमुख उद्दिष्ट ठेवले. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणाचा ते योग्य प्रकारे वापर करतात आणि समाजाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देतात. समाजातील अज्ञान, दारिद्रय, रुढी, परंपरा, सनातनी प्रवृत्ती नाहीशा करावयाच्या असतील तर प्रत्येक माणसाला शिक्षणाचा 'तिसरा डोळा' असणे गरजेचे आहे. हेच उद्दिष्ट ठेवून त्यांनी विविध ठिकाणी शिक्षणाबाबतचे आपले विचार मांडले.

यशवंतरावांच्या भाषणांतून आलेले विचार एखाद्या प्रबंधासारखे वाटतात. त्यांच्या बोलण्यातून अनेक संदर्भ, आठवणी, अनुभव यातून तत्त्वमंथन होते. त्यामुळे ऐकणा-यांना  साहजिकच वैचारिक स्फुरण मिळते. यशवंतरावांनी सामाजिक व शैक्षणिक विषयांवर आपल्या संपन्न अनुभवांच्या द्वारे चिंतन व्यक्त केले. हे  चिंतन एका लेखकाचे, विचारवंताचे व जाणत्या नेत्याचे आहे. त्यांची विचार सांगण्याची पद्धत फार चांगली होती, दुस-याला ते विचार पटवून देत असत. आपल्या विचार कल्पनांना शब्दरुप देऊन श्रोते पाहून आपल्या भाषणाची पट्टी ते ठरवित असत आणि आपल्या विधानाची वास्तवता प्रभावीपणे जनसमुदायास पटवून देत. मला सत्तेचा मोह नाही पण विचारांचा जरूर आहे असे ते वेळोवेळी सांगत.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org