यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे ६३

विज्ञानवादी दृष्टिकोन असलेले आधुनिक मन भारताला हवे. हे मन स्थितीशील राहत नाही. ते चौफर पाहते. विज्ञान म्हणजे भौतिक सुखे निर्माण करणारी शक्ती आहे. सामाजिक परिवर्तनात त्याचा फार मोठा उपयोग होईल असे यशवंतराव म्हणतात. मानवी गरजा पूर्ण करण्याची निकड निर्माण झाली की, विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती होते. विज्ञानवादी लोकांच्या समोर बोलताना ते म्हणतात, बुद्धिमंतांना समाजाशी समरस होऊन विज्ञानवादी चळवळ चालवावी लागेल. म्हणून साहित्य व वृत्तपत्र चळवळीकडे लक्ष द्यावे लागेल. शेतकरी व कामगार यांच्यावर विज्ञानाचे संस्कार करणारे वाङ्मय निर्माण करणे ही आजची गरज आहे. मराठीत विज्ञान वाङ्मय निघू लागले आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. असे विचार यशवंतरावांनी ७ डिसेंबर १९६८ रोजी भरलेल्या विज्ञान परिषदेच्या अध्यक्षीय भाषणाच्या वेळी व्यक्त केले.

भाषण रंगवणे हे फक्त वक्त्यावरच अवलंबून नसते. ते ब-याच वेळा श्रोत्यांवर ही अवलंबून असते. यशवंतरावांचे प्रत्येक भाषण हे एक नवीन काही तरी देणारे आहे. अशी भावना श्रोत्यांत असे. यशवंतराव काय बोलणार याची जशी श्रोत्यांना उत्सुकता असे तेवढीच उत्सुकता एक वक्ता म्हणून यशवंतरावांना असे. यशवंतरावांची सर्वच भाषणे उत्तम होतील काय अशी साशंकता एखाद्या वेळी निर्माण होत असे. कारण एका राजकीय पक्षाचे पुढारी म्हणून त्यांच्यावर शिक्का होता. अशा वेळी हेतुपुरस्सर दंगल घडवून आणणे. सबा उधळून लावणे, गोंधळ घालणे असे काही प्रकार त्यांच्या काही भाषणांच्या वेळी झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळचे अनेक प्रसंग बोलके आहेत. त्यांच्या जीवनात असे अनेक आणीबाणीचे प्रसंग आले. त्यावेळच्या सार्वजनिक जीवनात काही काँग्रेस विरोधी चळवळी काम करीत होत्या. त्या चळवळींनी काही वेळा यशवंतरावांना लक्ष्य केले पण त्यांच्या कर्तृत्वाने व आपुलकीच्या मार्दवी बोलण्याने अनेकांना त्यांनी आपलेसे केले. इ.स १९७४ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन इचलकरंजी येथे संपन्न झाले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे हे होते. राजकारण्यांनी व्यासपीठावर येऊ नये असा वाद त्यावेळी उत्पन्न झाला. पण केंद्रीय मंत्री असतानासुद्धा यशवंतरावा न संकोचता एक श्रोता म्हणून व्यासपीठासमोर बसले आणि त्यांनी साहित्यसंमेलनाचा मनापासून आस्वाद घेतला. पुढे एक वर्षाच्या कालावधीनंतर १९७५ मध्ये आणीबाणीच्या दिवसात श्रीमती दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय साहित्य संमेलन कराड येथे झाले. त्यावेळी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष केंद्रयी मंत्री श्री. यशवंतराव चव्हाण होते. लेखन स्वातंत्र्याच्या बंदीमुळे अनेक बुद्धिवादी मंडळी विरोधात होती. अनेक निषेधाची भाषणे व आणीबाणीतील तणाव पचवून त्यांनी त्यावेली निखळ साहित्यिक भाषण केले व संमेलन यशस्वीपणे पार पडले. यावेळी स्वागतपर भाषणाच्या विरोधकांचा विरोध पचवून त्यांनी भाषण केले. या भाषणाच्या शेवटी सर्वांना उद्देशून अतिशय विनम्रपणे आपले मत सौम्यपणे मांडले. भाषणास उपहासाची झालर असून अतिशय गंभीरपणे त्यांनी आपले विचार पुढीलप्रमाणे मांडले, "प्राचीन काळी तपस्व्यांच्या आश्रमात शिरताना राज्यकर्ते आपली राजचिन्हे काढून साध्या वेषात जात असत. तसेच शारदेच्या उपवनात येताना भारत सरकारच्या मंत्रिपदाची बिरूदावली मी बाहेर ठेवून आलो आहे. माझ्या मातृभाषेवर उत्कंठ प्रेम करणारा एक मराठी माणूस म्हणून मी इथे आलो आहे. आमचा पाहुणचार भाजी भाकरीचा असला तरी तो भावमंत्रित आहे, जिव्हाळ्याचा आहे, सकस आहे हे ध्यानात असू द्या. तो तुम्ही गोड करून घ्यावा." वाक्यरचनेतील नेमका भावार्थ श्रोत्यांच्या अंत:करणाला भिडत असे. समयसूचकता, स्वत:च्या मताबद्दलची दृढता, आणि प्रतिपक्षाला उपहास, उपरोध व मार्मिक शब्द योजनेच्या जोरावर चारी मुंड्या चीत करण्याचे विलक्षण कौशल्य, हे सारे गुण त्यांच्या भाषणात ठायी ठायी दिसतात. याच्या जोडीला व्यक्तिमत्वाचे आकर्षण जे म्हणतात ते या बुद्धिमान, चतुर, संघटनकुशल आणि अभ्यासू वृत्तीच्या नेत्याच्या ठिकाणी फार प्रकर्षाने होते.

यशवंतरावांनी विविध विषयांवर चिंतनशील वृत्तीने भाषणे दिली. या भाषणांनी वैचारिक ललित निबंधाचा दर्जा प्राप्त केला आहे. ही भाषणे खाजगी बैठकीतील, जाहीर सभेतील किंवा एखाद्या नियोजित विषयावरील दिलेले व्याख्यान इ. स्वरुपाची आहेत. भाषणे, चर्चासत्र, परिसंवाद, मुलाखती, सत्कारसमारंभ, शिबिरे, मेळावे, शोकसभा, साहित्य संमेलने इ. प्रसंगी दिलेली आहेत. या भाषणातून त्यांचे सखोल वाचन, मनन आणि चिंतन यांचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. साहित्य, शिक्षण, माणूसकीची उभारणी, श्रमशक्ती, संस्कृती, कृषी औद्योगिक धोरण, सहकार, विज्ञान संगीत, शेती, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र धोरण, सामाजिक तत्त्वज्ञान, राजकारण, यांसारख्या असंख्य विषयांत त्यांचे विचारपूर्वक व्यक्त केलेले चिंतन पाहावयास मिळते. भाषाप्रभू यशवंतराव हे शब्दांच्या अचूक फेकीने श्रोत्यांच्या मनाचा वेध घेताना दिसतात. या भाषणांतून महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा आणि लोकसंस्कृतीच्या उन्नयनाचा विचार मांडला. वैचारिक, साहित्यिक व सांस्कृतिक धनामुळे देश ओळखला जाते असा दाखला ते देतात. आपल्या भाषणांच्या माध्यमातून त्यांच्या मनातील विचार, माहिती, कल्पना, भावना आणि जाणिवांचे आदानप्रधान तदनुरूप भाषेद्वारे ते करत असत. त्यामुळेच लोकसंवाद हाच त्यांच्या आवडीचा विषय बनला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org