मुख्य म्हणजे ती एका साहित्यिकाची भाषा आहे याचा प्रत्यय वारंवार येतो. यशवंतराव साहित्याला विशाल सागराचा एक महत्त्वपूर्ण अंश समजून मराठी साहित्याच्या सागराचे रुप स्पष्ट करतात. सागरातील विशाल लाटा तटांवर आदळून एका तटाचा विशेष संदेश दुस-या तटावर नेऊन पोहोचवतात, त्याप्रमाणे भारतीय साहित्यातही उमटलेला प्रतिध्वनी एका प्रदेशापुरता मर्यादित राहत नाही. तर त्याचा प्रतिध्वनी सर्व देशात उठतो. प्रत्येक लाटेला सौंदर्य आहे. स्वतंत्र अस्तित्व आहे. या सर्व लाटांचा समावेश शेवटी त्या महासागरातच होतो. या लाटा साहित्याला नवीन स्वर देत असतात व त्यातून भारतीय साहित्याचे मधुर संगीत निर्माण होते. या संगीताची आवश्यकता सांगताना ते म्हणतात, "आजच्या युगात, आम्हाला अशा संगीताची आवश्यकता आहे, जे एकतेच्या तालावर आम्हाला निरनिराळ्या स्वरात गाता येईल. भाषांच्या ह्या स्वरात एक नवे चैतन्य असेल, एक नवे आवाहन असेल आणि एक नवा संदेश असेल. त्यातून आम्हाला नवी शक्ती, नवी प्रेरणा आणि नवी स्फूर्ती मिळेल. असे झाल्यास जीवनात नवे चैतन्य निर्माण होईल आणि भारतातील प्रत्येक भाषा सजीव राहील." असा भाषिक एकतेचा विचार मांडतात. या त्यांच्या वक्तृत्वाचे खरे सामर्थ्य त्यांच्या विचारसरणीच्या स्वच्छपणात होते हे यावरून स्पष्ट होते. तसेच त्यांची वाक्यरचना, उच्चार आणि कल्पकता या गुणांनी ते सामर्थ्य द्विगुणित होते. आपल्या भाषाविलासाने ते श्रोत्यांना घटका न् घटका गुंग करुन सोडीत. कधी कल्पना विलासाच्या माध्यमातून श्रोत्यांच्या बुद्धीला पटवून देण्यासाठी काव्यात्मकतेचा उपयोग ते करतात. यशवंतरावांचे वक्तृत्व म्हणजे म. गांधी, लो. टिळक, पं. नेहरु, साहित्य सम्राट न.चिं. केलकर, शिवरामपंत परांजपे, स्वा. सावरकर यांसारख्या कसबी व्याख्यात्यांच्या बरोबरीचे वक्तृत्व होते. संयमी संस्कारित प्रसंगोचित व लालित्यपूर्ण आविष्कार त्यांच्या भाषणातून पाहावयास मिळतो. लोकांच्या हृदयात हळुवारपणे स्थान निर्माण करणारा एक सृजनशील विचारवंत, लोकात आत्मविश्वास, स्वाभिमान, जिद्द निर्माण करणारा मधूर वाणी असलेला लोकनेता या नात्याने संपूर्ण भारतात त्यांनी लौकिक मिळवला. उत्तम वक्तृत्व, भाषेवर प्रभुत्व, लाघवी भाषा, आवश्यक तो सभाधीटपणा, कौशल्यपूर्ण समर्थन, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती, असंतोष पेटू न देता त्यातून सामंजस्य निर्माण करणारी नीती, इच्छा स्वातंत्र्याला, वृत्ती स्वातंत्र्याची जोड देण्याची प्रवृत्ती इ. गुणासामर्थ्यामुळे ते त्यावेळी लोकनायक बनले. या गुणवत्तेमुळे त्यांचे भाषण स्वपक्षीय, विरोधक, अपक्ष, साहित्यिक, बुद्धिवादी पत्रकार सारख्याच तन्मयतेने ऐकत. 'संस्कृती'या विषयावर बोलताना भारतीय संस्कृतीचे सनातनत्व, या संस्कृतीची पारंपारिक वैशिष्टये, मूळ संस्कृतीचे उदात्त स्वरुप इ. मुद्दयांना स्पर्श करत ते विवेचन करत. राहित्य निर्मितीलाच ते एक सांस्कृतिक कार्य आहे असे म्हणत. ललित साहित्याची निर्मिती हा एक सांस्कृतिक आविष्कारच असतो. या संस्कृतीला नाकारून सकस साहित्य आपणास निर्माण करणे अशक्य आहे. भारतीयत्वाचा गाभा असणा-या संस्कृतीला छेद न जाणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे. सकस साहित्यच संस्कृतीला चांगुलपणा आणते अशा साहित्य व संस्कृतीबाबतची त्यांची ठाम भूमिका होती, तीच त्यांनी अनेक व्यासपीठावरून मांडली.
वक्ता दशसहस्त्रेषु
यशवंतरावांच्या जवळ वक्त्याला लागणारे सर्व गुण होते. अतिशय गोड आणि प्रभावी आवाज, भरपूर विषयांचे ज्ञान, बोलण्याची गती आणि मुद्रेवरील गांभीर्य कमी-अधिक प्रमाणात वाढविण्याचे कौशल्य आणि मराठी भाषेवरील पट्टीचे प्रभुत्व या गोष्टींमुळे त्यांचे व्याख्यान म्हणजे श्रोत्यांना एक आनंद पर्वणीच असे. श्रोते कितीही असले तरी ते आपल्या भाषणाला सुरुवात इतक्या घरगुती पद्धतीने करत असतात की सभेला एका कौटुंबिक संमेलनाचे स्वरुप येत असे. त्यामुळे वक्ता आणि श्रोता इतके एकजीव होऊन जात की वक्ता जे जे म्हणून काही सांगेल ते ते रसिकतेने ऐकून घ्यावयाची श्रोत्यांची तयारी असे. त्यामुळे कोणत्या प्रसंगी काय बोलावे किंवा काय सांगावे याचे यशवंतरावांना अवधान होते. त्यांची साधी, सरळ, ओघवती भाषा, दैनंदिन व्यवहारातील उदाहरमे, महनीय विचार यामुळे त्यांच्या भाषणांची श्रोत्यांवर छाप पडे.