साहित्य आणि संस्कृती मंडळाचा जन्म कशासाठी हेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचे व्यापकत्व स्पष्ट केले. हे मंडळ एक प्रकारचे 'पॉवरहाऊस' बनावे, त्याने इतरांना ऊर्जा द्यावी, त्याने वाढती क्षितिजे निर्माण करावीत. या मंडळाने महाराष्ट्राचे जीवन व्यापक, विस्तृत व क्रियाशील करणारे माध्यम बनावे अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. तसेच वैज्ञानिक संशोधन मराठी भाषेत आले पाहिजे, तरच ती भाषा 'ज्ञानभाषा' होईल. अमृताचे पैजे जिंकायचे ज्ञानेश्वरांचे भाकीत खरे करायचे असेल तर शास्त्रीय माहिती मराठीत उपलब्ध झाली पाहिजे असा आग्रह ते धरतात व सामान्य माणसांचे हित करण्याचे साधन म्हणून असे साहित्य मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.
शब्दची अमूच्या जीवीचे जीवन
शब्दांचे अंतरंग, शब्दांचे सामर्थ्य काय असते व त्यांच्या उच्चाराचे ओज काय असते याचे प्रत्यंतर यशवंतरावांच्या साहित्यिक भाषणांतून मिळते. एखाद्या समर्पणशील प्रतिभावंतांच्या वाणीचा प्रभाव कसा असतो याचे प्रत्यंतर त्यांच्या अनेक भाषणांतून येते. भाषण करताना यशवंतराव काळ, वेळ आणि विषयाचे भान ठेवून बोलत. श्रोता व वक्ता यांच्यामध्ये सुसंवाद ठेवत. त्यांच्या भाषणाची शैली ही संभाषण पद्धतीची होती. भाषण रंगवण्यासाठी मनात काही आडाखे, विचार ते निर्माण करत. आपला एखादा नवा विचार, दृष्टिकोन व श्रोत्यांना सांगत, त्यांच्या भाषणात विचारांची स्पष्टता असे व प्रचंड आत्मविश्वासाने ते सभा जिंकत असत. मनाचा समतोल ठेवूनच त्यांनी अनेक वादग्रस्त सभा जिकल्या आहेत. ते म्हणतात, "मात्र बोलण्यासाठी जो विषय निवडला असेल त्यासाठी चिंतन करण्याची आवश्यकता असते. त्या विषयाचे महत्त्व, त्या विषयाची ऐतिहासिक वाढ, त्यांच्या संबंधी आजचे प्रश्न व त्यावरील उपाय अशा त-हेने मी त्या विषयाचा विचार करून ठेवतो व मग तो मी मांडू लागतो. पहिल्या दहा-पंधरा वर्षांत माझी काही निश्चित मते बनले नव्हती. मला वाटते की त्यानंतरच्या काळात राजकीय, आर्थिक, सामाजिक, साहित्यविषयक अशी माझी स्वत:ची म्हणून काही मते झाली. स्वत:मध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला." असे स्वत: च्या भाषणांबाबत यशवंतराव सांगतात. त्यांनी वक्तृत्वकलेची मूलभूत तंत्रे आणि कौशल्ये आत्मसात केली होती. त्यामुळेच ते श्रोत्यांशी उत्तम संवाद साधत असत. प्रसंगी आपल्या भाषणाचे तंत्र प्रसंगानुसार बदलतही असत. बोलताना माहितीच्या साठ्यातून अथवा कल्पनांच्या भांडारामधून योग्य ते संदर्भ आयत्या वेळी नेमकेपणाने देत असत. विचारांच्या या गाठोड्यातून योग्य वेळ योग्य ती अवतरणेही सांगत. "माणसाचे मन शिक्षणाच्या संस्काराने, अधिक संपन्न केल्याशिवाय समाज ख-या अर्थाने समजा बनत नाही... शिक्षणाने देशात बेकारीच निर्माण होणार असेल तर देशामध्ये सुशिक्षित बेकार असणे अधिक चांगले असे मी म्हणेन. कारण सुशिक्षित बेकार निदान विचार तरी करू शकेल'.... ज्ञान भाषा आणि लोकभाषा एक झाल्याशिवाय समाजाचे जीवन समर्थ होत नाही. उन्नत होत नाही, विकसित होत नाही'.... मराठी भाषेने मराठी मनाचा कस घेऊनच वाढले पाहिजे. तर ख-या अर्थाने मराठी भाषा वाढेल. अधिकाधिक उत्कर्ष पावेल... भाषा ही विचाराच्या मागे येत असते. भाषेचे खरे सामर्थ्य विचार व्यक्त करण्यात आहे." त्यांचे वरील विचार कोपरगाव येथील के. जे. सोमय्या कॉलेजच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या वेळी व्यक्त झाले आहेत. आपल्या भाषणांच्या माध्यमातून त्यांच्या मनातील विचार, माहिती, कल्पना, भावना आणि जाणिवांचे आदानप्रदान तद्नुरुप भाषेद्वारे ते करत असत. अशी भाषणे ऐकणे हा एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. तो मनाला उत्तेजित करत असतो.
स्वागतशील भूमिका
लोकसंवाद हा यशवंतरावांचा सर्वांत आवडीचा विषय. त्यासाठी भाषणांद्वारे सदैव लोकांशी संपर्क साधणे त्यांना आवडत असे. लोकांचे प्रश्न जाणून घेणे, सभेत किंवा साहित्य मेळाव्यात त्या प्रश्नांना वाचा फोडणे, त्याद्वारे लोकांच्या अंतरंगाला हात घालणे, समाजाकडून पसंतीची दाद मिळवणे व त्यांच्या डोलणा-या मानांच्या तालावर त्यांच्या मनात एखादा विचार रुजविण्याचे काम त्यांच्या अनेक भाषणांनी केले आहे. १९७५ साली कराड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागतपर भाषणात ते म्हणतात, "ज्ञानेश्वर, तुकाराम आणि कबीर भारतीय कवी आहेत असे मी मानतो. याचे कारण भारताच्या अंतरंगाचे दर्शन त्यांचे साहित्य घडवते. आधुनिक काळात शरच्चंद्र किंवा ह. ना. आपटे हे जसे राष्ट्रीय उष: कालाचे कादंबरीकार होते. तसेच आता राष्ट्रीय प्रबोधनाचे साहित्य निर्माण झाले पाहिजे." असा आशावाद ते व्यकत करतात. दलित समाजातून आलेल्या नव्या दलित साहित्याचे ते स्वागत करतात. उच्चभ्रू साहित्याचे मानदंड लावून त्याला जोखणे त्यांना चुकीचे वाटते. "म्हणून दलित साहित्याची भाषा कदाचित वेगळी असली तरी तिचा कस, तिच्यातील रग, जर नव्या मराठी उतरली, तर ती हवीच आहे. पण यासाठी जाणकारांनी व सामान्य वाचकांनी स्वागतशील वृत्ती ठेवली पाहिजे." यशवंतरावांनी मराठी साहित्य हे संकुचित न राहता या साहित्याने सारे लोकजीवन व्यापले पाहिजे. बदलते विचारप्रवाह साहित्यात येणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सातत्याने केले.