यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ५३ प्रकरण ६

प्रकरण ६ - भाषणे

यशवंतरावांनी त्यांच्या आयुष्यात विविध विषयांवर चिंतन केले. त्यामध्ये समाजकारण, शैक्षणिक विचार, साहित्यिकांची जबाबदारी, देशाचे अर्थकारण, परराष्ट्र धोरण, संयुक्त महाराष्ट्र चळवळ किंवा सामाजिक कार्य यांचा समावेश होतो. यशवंतरावांच्या भाषणांना त्याकाळी प्रचंड गर्दी जमत असे. त्यांच्या भाषणांनी अनेक लोकांना आकर्षिक केले आहे. या भाषणांमधून नाना व्यक्तींच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. अनेक घटना, प्रसंगांचा ऊहापोह केला. त्यांच्या भाषणांमधून वाङ्मयीन आणि कलाप्रेमी व्यक्तिमत्त्वाचाच एक संपन्न, सुंदर आविष्कार पाहावयास मिळतो. प्रदीर्घ व्यासंग, संदर्भ संपन्नता, गंभीर चिंतनशीलता, निखळ प्रांजळपणा, प्रसंगानुरुप व औचित्यपूर्ण संवाद इ. विविधतेमुळे त्यांची भाषणे वैविध्यपूर्ण आहेत. भाषण विषयातील ही विविधता जशी आपल्याला स्तिमित करते त्याप्रमाणे त्यातून व्यक्त होणारे साहित्यप्रेम आपल्याला उत्कटपणे जाणवते. साहित्याचा अनेक अंगांनी त्यांनी विचार मांडला. यशवंतरावांची ही साहित्यविषयक भाषणे व प्रासंगिक वैचारिक लेखन हे नियतकालिकातून व ग्रंथरुपाने प्रसिद्ध झाली आहेत. साहित्याच्या दृष्टीने त्यांच्या भाषणांचे संकलित ग्रंथ 'सह्याद्रीचे वारे', 'युगांतर', 'भूमिका', 'शिवनेरीच सोबती', 'यशवंतराव चव्हाण - शब्दांचे सामर्थ्य', या सारख्या ग्रंथातील काही भाषणांमधून श्रोत्यांशी ते प्रत्यक्षाप्रमाणे बोलत राहिले. वक्तृत्व हा त्यांच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक जीवनातला एक चैतन्यशील व समृद्ध असा महत्त्वाचा भाग होता. या भाषणांमधून विविध विषयांना स्पर्श करणारी आपली ठाम मते त्यांनी मांडली. यशवंतरावांच्या भाषणांनी वैचारिक व ललित निबंधांचा दर्जा प्राप्त केलेला आहे. ललित वाङ्मयाचा एक प्रकार म्हणून त्याचा अभ्यास प्रस्तुत ठिकाणी अपेक्षित आहे. यशवंतरावांची अनेक भाषणे साहित्यविषयक आहेत आणि त्यामध्ये त्यांच्यातल्या रसिकाइतकाच त्यांच्यामधला समीक्षकही सजग आहे. यशवंतरावांच्या चिंतनशील अंतर्मुखतेपासून ते सर्वस्पर्शी रसिकतेपर्यंत आणि साहित्यातील गहन प्रश्नांचा वेध घेण्यापासून ते त्यातल्या अनेक अंतर्गत विरोधांची चिकित्सा करण्यापर्यंत त्यांच्या या भाषणांचा आवाका आणि पल्ला दिसतो. यशवंतरावांनी या भाषणाच्या माध्यमातून मराठी माणसाला स्वत:च्या उज्ज्वल भवितव्याच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रेरणा देणारा विचार मांडलेला आहे. एकूणच राष्ट्राची उभारणी करण्याचा विचार त्यांनी या भाषणांतून मांडला. विविध क्षेत्रांना व्यापून टाकणारी कल्पनाशक्ती त्यांच्या या प्रासंगिक वैचारिक लेखांतून दिसून येते.

भाषणे : रुप आणि रंग

महाराष्ट्रात उत्तम वक्तृत्व संपादन केलेला विवेकशील विचारवंत म्हणून यशवंतरावांचा उल्लेख अनेकांनी केला आहे. यशवंतरावांची विविध विषयावरील ही भाषणे वाचताना वक्ता म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आपणास होते. यशवंतरावांनी त्यांच्या भाषणातून अनेक बाबींचा परामर्श घेतलेला आहे. या सर्व भाषणांमधून यशवंतरावांची सामाजिक चळवळ व साहित्यिक प्रेमाचा अधिक प्रत्यय येत राहतो. हे साहित्याबाबतचे प्रेम मर्यादित नाही. त्यात व्यापकता आहे. तशीच सर्वसमावेशका आहे. त्यांची ही सर्व भाषणे वाचल्यानंतर मनात प्रश्न निर्माण होतो तो असा की त्यांच्या भाषणाचे स्वरुप कसे होते ? ते त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, "आजच्या काळात माझी होणारी वेगवेगळी भाषणे यांचे तीन चार प्रकार करावे लागतील. राजकीय विषयावरची पक्षासाठी केलेली भाषणे व लोकसभेमध्ये केलेली भाषणे अशा प्रकारचे भाषणांचे वेगवेगळे गट होतील. या प्रत्येकाचा उद्देश वेगळा असतो व त्याच्यासाठी स्वीकारल्या जाणा-या शैलीतही फरक असतो." अशा प्रकारे वक्तृत्वाबाबतची भूमिका ते कधी स्वत: सांगतात तर कधी त्यांच्या स्फुट, त्रुटित, प्रसंगोपात्त अशा उद्गारांतून व्यक्त करतात.

यशवंतरावांचा भाषा विषयाचा अभ्यास दांडगा होता. या भाषा ज्ञानाचा उपयोग त्यांना वक्तृत्वाखाली चांगलाच झाला. भाषण किंवा व्याख्यान हा शब्द उच्चारताच व्यासपीठावर उभा असलेला नेता आणि जमलेला श्रोतृवर्ग असे चित्र आपल्यापुढे उभे राहते. यशवंतरावांच्या वक्तृत्वात खाजगी बैठकीतील भाषण, जाहीर भाषण, एखाद्या विषयावरील व्याख्यान यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे मुलाखती, चर्चासत्रे, परिसंवाद यातही ते तरबेज होते. सत्कारसभा, शोकसभा, काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर किंवा मेळावा एखाद्या कवीचा लेखकाचा सत्कारसमारंभ साहित्य संमेलन विधिमंडळ, लोकसभा या विविध ठिकाणी केलेल्या भाषणांचा समावेशही यशवंतरावांच्या वक्तृत्वकलेत करता येईल. यशवंतराव प्रासंगिक उत्स्फूर्त भाषण करत. यशवंतरावांना निरनिराळ्या प्रसंगांनी वक्तृत्वाची संधी मिळत गेली. यातले काही प्रसंग आनंदाे, काही दु:खाचे, काही कोणाच्या सत्काराचे, गौरवाचे, काही ठरलेल्या विषयावरचे तर काही प्रासंगिक उत्स्फूर्ततेचे आहेत. या प्रसंगांच्या विविधतेमुळे यशवंतरावांच्या भाषणातही निराळेपणा दिसतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org