यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ५२



यशवंतरावांनी विविध ग्रंथांना प्रस्तावना लिहिल्या. या प्रस्तावनामधून यशवंतरावांची साहित्यिक आणि अभिजात रसिकता प्रकट होते. तसेच त्यांचे भावस्पर्शी संवेदनशील मन आणि मार्मिक समीक्षा व आस्वादक डोळसपणा पाहावयास मिळते. म्हणून आस्वादक समीक्षेचा एक नमुना म्हणून या त्यांच्या प्रस्तावनांचा निर्देश करावा लागेल. या प्रस्तावनांमधून व साहित्याकडून देशहिताची, देशाच्या एकात्मतेची आणि समाजात नवचैतन्य निर्माण करण्याची व अपेक्षित परिवर्तन घडवून आणण्याची अपेक्षा केली आहे. प्रस्तावनेमध्ये साहित्यकृतीच्या आंतरिक सौंदर्याचा विचार हे यशवंतरावांच्या साहित्याविचाराचे बलस्थान आहे. यशवंतरावांनी श्रेष्ठ साहित्याच्या निकषाचा विचार करून आशयाच्या संपन्नतेचे महत्त्वही विशद केले आहे. यशवंतरावांनी लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा, भोवतालच्या वास्तवाचा, वाङ्मयीन अभिरुचीचा आणि वाङ्मयीन संस्काराचा केलेला विचार मौलिक स्वरुपाचा आहे. यशवंतरावांची ही साहित्यविषयक चिकित्सा आणि चिंतन म्हणूनच महत्त्वपूर्ण आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्या साहित्यविषयक भूमिका व समीक्षा लेखनाचा स्थूल आढावा घेतला आहे. साहित्यविषयक विवेचनात त्यांनी वेगवेगळ्या वाङ्मयप्रकाराबद्दल समर्थपणे आपले विचार प्रकट केले आहेत. त्यातून त्यांची साहित्याकडे पाहण्याची भूमिका स्पष्ट होते. साहित्यप्रेम, साहित्य आणि समाज यांचा अनुबंध, साहित्यिकांकडून त्यांच्या अपेक्षा, साहित्याचे स्वरुप, जीवनवाद, साहित्याचे सामर्थ्य, साहित्यविषयक दृष्टिकोन, साहित्यातील सामाजिक जाणीव, साहित्य समीक्षा विषयक विचार व जीवन विषयक भूमिका यांचा मागोवा घेतला आहे.

प्रचारकी लेखन आणि वाङ्मयांतर्गत प्रबोधन यात त्यांनी भेद केला आहे. वाङ्मयातून प्रबोधन व्हावे या मताचे यशवंतराव होते. परंत वाङ्मयाने केवळ प्रचार करावा अशा मताचे ते निश्चित नव्हते. जीवन आणि साहित्य यांचा परस्परसंबंध असतो. साहित्यात जीवनाचे प्रतिबिंब दिसते तर काही वेळा साहित्याचा जीवनावर परिणाम होतो. साहित्यात मानवी अनुभवाचे प्रतिबिंब पडलेले असते म्हणून कोणत्याही साहित्याच्या निर्मितीची बीजे जीवनातील वास्तवात असतात.

वाङ्मयासाठी वाङ्मयबाह्य प्रयोजन त्यांनी कधी महत्त्वाचे मानले नाही. साहित्याची अंतिम प्रेरणा मानवी मूल्यांची जाणीव करून देणारी असली पाहिजे. त्या साहित्यात मानवी मूल्यांची किंवा गुणांची वाढ करणे हे उद्दिष्ट असले पाहिजे. जे साहित्य सर्वसामान्यांचे हित साधते तेच खरे साहित्य. निव्वळ शब्दलालित्य म्हणजे साहित्य नव्हे. जे साहित्य समाजजीवनाला मार्गदर्शक ठरते. मानवी मन आणि भावना यांचे उदात्तीकरण करून एकूण जीवन गतिमान करते तेच खरे साहित्य होय. अशा स्वरुपाच्या विचारातून त्यांची साहित्यविषयक भूमिका स्पष्ट होते. वाङ्मयात काल्पनिकतेपेक्षा वास्तवावर त्यांनी भर दिली असता तरी कल्पकतेचे स्थानही त्यांनी कधीच अमान्य केले नाही. कल्पना प्रतिभा यांना साहित्य निर्मितीत त्यांनी स्थान दिले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org