यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ४७

'छत्रपती शिवराय' या महाकाव्याच्या प्रस्तावनेत कवी यशवंतांच्या कवितेचे काव्यविवेचन अगदी मोजक्या पण मार्मिक शब्दात त्यांनी केले आहे. मराठी साहित्यात महाकाव्याशी फारशी निर्मिती नाही याबद्दल खंत व्यक्त करून कवी यशवंतांनी मराठी भाषेत असे विशाल, उदात्त शिल्प महाकाव्याच्या रुपाने उभे केले आहे. यातून त्यांनी मराठी साहित्याची अमर सेवा केली आहे असा त्यांचा गौरव करतात.  त्या संदर्भात ते लिहितात. " कवी यशवंत महाकाव्याच्या रुपाने समर्थांचे शब्द खरे करीत आहेत. शिवरायांचे जीवन एवढे भव्य आहे की, त्यांचे गीत भूषण समर्थांच्या समोर अेक कवीने गायले. यात रविंद्रनाथांची ओजस्वी प्रतिभाही सामील झाली आहे. आज आम्हा सर्वांना आनंद होत आहे की आमच्या पिढीतील श्रेष्ठ कवी शिवरायांची महापूजा आपल्या महाकाव्याने बांधीत आहे." असा कवी यशवंतांचा गौरवपूर्ण उल्लेख ते करतात.

भा. द. खेर लिखित 'अमृतपुत्र' ( १९७०) या लालबहादूर शास्त्रीजींच्या चरित्रात्मक कादंबरीच्या प्रस्तावनेत लिहितात. "शास्त्रीजींचं यशस्वी जीवन आणि निर्धारी व्यक्तिमत्त्व 'केसरी'च्या संपादक मंडळातील माझे मित्र श्री. भा.द.खेर यांनी 'अमृतपुत्र' या त्यांच्या कादंबरीत वर्णिले आहे. परंतु हे केवळ चरित्रकथन नव्हे, शास्त्रीचं चरित्र हा केंद्रबिंदू ठेवून श्री. खेर यांनी सौष्ठवपूर्ण वाङ्मयशैलीनं भारताच्या इतिहासातील सुवर्णपानं उलगडली आहेत. श्री खेर हे पत्रकार आहेत आणि सिद्ध साहित्यकार आहेत. त्यांच्यातील पत्रकारानं त्यांना लेखणीचा विवेक सोडू दिलेला नाही. आणि विकारवशतेला बळी पडू दिलेलं नाही असं अमृतपुत्र वाचताना लक्षात येतं." लालबहादूर शास्त्रीजींच्या पंतप्रधानापदाच्या काळात यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री होते. त्यामुळे त्यांना त्यांच्याविषयी कुतूहल असणे स्वाभाविक आहे. शिवाय मराठी वाङ्मयात चरित्रपर कादंबरी लिहिली गेली. त्या कुतुहुलातूनच त्यांनी ही प्रस्तावना लिहिलेली दिसते. त्यांच्या 'हिरोशिमा' (१९८४)  या कादंबरीच्या प्रस्तावनेत त्यांच्या बद्दल लिहितात, "निव्वळ कादंबरीकरिता कादंबरी लेखन न करता काही मानवी आदर्श डोळ्यांपुढे ठेवून करुणेच्या प्रेरणेने उद्युक्त होऊन श्री. खेरांनी हिरोशिमा कादंबरी लिहिली आहे." कवीला व कवितेला पूर्ण न्याय देणारी प्रस्तावना कशी लिहावी याचा एक आदर्श वस्तुपाठच यशवंतरावांनी 'स्वर' या कवी सुधांशूच्या ( ह.न.जोशी) काव्याच्या प्रस्तावनेद्वारे घालून दिला आहे. "काव्यशक्ती शापही आहे आणि वरही. अतितरल कल्पनाशक्ती असल्याशिवाय सरस साहित्य निर्मिती होणे कठीणच. परंतु हा शाप जीवनातल्या अनंत वेदना शब्दरुप करणारा आहे. स्वत:च्याच नव्हे तर सहसंवेदनेने अनेकांच्या भावनांना शब्दरुप देऊन निर्भेळ आनंदाची निर्मिती करणारा असा हा शाप एखाद्या भाग्यवंतालाच पर्वपुण्याईने लाभतो...कवी 'सुधांशु' कल्पनाशक्तीचे हे असेच वादळ घेऊन वाचकापुढ या 'स्वर' रुपात आले आहेत... कवी सुधांशूंचा हा 'स्वर' कुठे रडवील, कुठे हसवील तर कुठे वाचकांना अभिमानाने, आनंदाने नवे स्फुरण देईल." त्या काळाला अनुसरून चिंतनात्मक, तात्त्विक व काव्यविषयक असा त्यांच्या कवितांचा आस्वाद त्यांनी सादर केला आहे. कवी सुधांशूच्या जीवनदृष्टीचे काव्यामधून येणारे प्रत्यंतर आणि त्यांच्या काव्याशयातील अर्थपूर्णता त्यांनी सोदाहरण उलगडून दाखवली आहे." 'दत्त दिगंबर दैवत माझे' या भक्तीमधूर गीताने सर्वांनाच परिचित झालेले. 'सुधांशु' रसिकांच्या भावमनाला अेक स्वरमधूर गीतांनी रिझवीत आहेत. घराघरातून नित्य नव्या भावोन्मेषाने त्यांची गीते आबालवृद्धांच्या ओठातून उमटतात. " असा आशावाद ते व्यक्त करतात. तसेच त्यांच्या कवितेचे मर्म कमालीच्या जाणतेपणाने सांगितले आहे. कृष्णाकाठ, मातृप्रेम, देशप्रेम, प्रीती, समाजजीवन, आकांक्षा, शल्ये याविषयी उत्कटतेने तर तितक्याच व्यथित, आर्तभावनेने चंद्रवीर, रविंद्र सरोवर, गंधर्व गीतांची चांदणी रजनी ही उजळून निघालेली आहेत. अशी त्यांच्या कवितांची वैशिष्टये सांगतात. मोजक्या शब्दात त्यांनी कवितांचे रसग्रहणही केले आहे. कवितेच्या गुणवत्तेच्या बाबतीत सूक्ष्म अवलोकन, अखंड आत्मचिंतन आणि दीर्घ निदिध्यास या कवी सुधांशु या कवीच्या वैशिष्ट्यांचे महत्त्व यशवंतराव यांनी प्रस्तावनेत सांगितले आहे.

१९८४ मध्ये शाहीर शंकरराव निकम यांच्या 'सांगतो ऐका' 'ज्ञानेश्वरी' सारख्या तत्त्वज्ञानविषयक ग्रंथाला शिफारसवजा व शुभेच्छापर असी प्रस्तावना यशवंतरावांनी लिहिली आहे. त्यात शाहीर निकम यांच्या शाहिरी गीतांचा आणि कवित्व शक्तीचे वेगवेगळे पैलू त्यांनी स्पष्ट केले आहेत. प्रस्तावनेमध्ये त्यांच्या ग्रंथलेखनाबद्दल व त्यांच्याबद्दल यशवंतराव लिहितात, "एक प्रतिभावान गीतकार आणि निष्ठावान देशभक्त क्रांतिकारक हा त्यांचा तेव्हापासूनचा लौकिक आहे. ते प्रतिभाशाली गीतलेखक आहेत." असे विशेष कौतुक त्यांना वाटते. त्यांच्या या ग्रंथरचनेत त्यांनी "मराठी भाषेचा अभिमान आणि प्रतिभावान शीघ्र कवित्व हे पुन्हा एकत्र आल्याचे पाहून मला आनंद वाटला." असे शब्द कौतुकाने लिहिले आहेत. यशवंतरावांच्या ठायी गुणग्राहकता होती आणि कवीची कवित्वशक्ती व लेखकाची लेखनवृत्ती टिकावी, वाढावी अशी भावना होती. त्यांची 'दिग्दर्शन' ही प्रस्तावना त्यांच्या स्वभावाची निदर्शक म्हणता येईल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org