'श्री छत्रपती शिवराय' या महाकाव्याचे प्रकाशन करताना यशवंतराव म्हणतात, "शिवाजी महाराजांच्या रुपाने अतिभव्य असे एक चरित्र इतिहासाने आम्हाला दिले आहे. त्या चरित्राची मांडणी करण्याचे काम इतिहासकार आपल्या शब्दांनी करीत आहेत आणि कादंबरीकाही आपल्या शब्दानी करतील. पण प्रतिभावान कवींच्या शब्दांमध्ये ते चरित्र रंगल्याशिवाय त्यातला खरा जिव्हाळा आपल्याला समजणार नाही आणि म्हणून हे एवढे सुंदर चरित्र एका महाकवीची वाट पाहात उभे आहे असे मी नेहमी म्हणत असे." महाकाव्याच्या रुपाने साकारलेले हे शिल्प कसे श्रेष्ठ आहे हे सांगताना यशवंतरावांनी त्यातले उत्तुंग यश, शौर्य, ध्येय, प्रेम आणि कारुण्यही उत्तुंग असल्याचे दाखवून दिले आहे. अशा या महाकाव्याचे भावसौंदर्यात्मक वर्णन ते असे करतात, "श्री शिवाजी महाराजांचे जीवन हे आमच्या मराठी जीवनातले जे एक भव्य दिव्य असे विशाल शिल्प आहे ते महाकाव्याच्या रुपाने आमच्यासमोर उभे आहे." यशवंतराव चव्हाण हे मराठीचे नामवंत अभ्यासक आणि समीक्षक आहेत, हे त्यांच्या या महाकाव्यावरील समीक्षा-विचारामुळे लक्षात येते. त्यांनी सर्व प्रकारच्या वाङ्मयावर आपले मत प्रदर्शित केले आहे. त्यामुळे साहजिकच मराठी समीक्षेत एक मोलाची भर घातली आहे.
यशवंतराव चव्हाणांनी विविध वाङ्मयप्रकारावर विपुल लेखन केले आहे. याचे कारणही साहित्यकृतीच्या चिकित्सेला महत्व देण्याच्या त्यांच्या भूमिकेत आहे. एखादी साहित्यकृती ही साहित्यकृती म्हणून आणि कथा, कादंबरी किंवा कविता म्हणून कशी आहे याचा शोध ते घेत असत. यशवंतरावांचा पिंड हा त्या पुस्तकाच्या आस्वादाच्या प्रत्यक्ष अनुभवात रमणारा होता. साहित्य कृतींचे समरसून आकलन करणे, त्यांच्या अंत:स्वरूपाचा शोध घेणे या गोष्टींना त्यांच्या वाचनात व विचारात फार महत्त्व आहे. या वाटेने जाताना ते आवश्यक तेथे मराठी वाङ्मयासंबंधी व विविध कलाकृतींसंबंधी तात्त्विक विधाने करताना आढळतात. 'यगकर्ता' या कविता भावे यांच्या लोकमान्य टिळक चरित्रासंबंधी ते लिहितात, "एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी व विसाव्या शतकाच्या प्रारंभी ज्या धैर्याने आणि सम्यकवृत्तीने बंदिवास स्वीकारण्याचे धैर्य टिळकांनी दाखवले ते विशेष आहे. मी जेव्हा लोकमान्य टिळकांच्या जीवनाचा विचार करतो तेव्हा त्यांच्या निर्धाराचे मला अधिक महत्त्व वाटते. असे निर्धारी पुरुष इतिहासात क्वचितच तयार होतात. " यशवंतरावांनी अचूक शब्दात लो. टिळकांचे येथे वर्णन केले आहे. जगजीवनराव व्यक्ती आणि विचार : लेखक डॉ. प्रभाकर मायने यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ते त्यांचा असा उल्लेख करतात, "बाबू जगजीवनराम हे राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात सामील झाले आणि देशाच्या मुक्तीत दलितांची मुक्ती आहे. या भावनेने त्यांनी कार्य केले. दोन्ही दृष्टीने त्यांच्या चरित्रग्रंथास महत्त्व आहे." भा. द. खेर लिखित 'अमृतपुत्र' या लालबहादूर शास्त्रींच्या चरित्रात्मक कादंबरीमध्ये असा उल्लेख करतात, "शास्त्रीचं या 'वामन' अवतारातील कार्य असेच चिरंजीव ठरले आहे. अठरा महिन्यांच्या कारकीर्दीची अठरा अध्यायांची गीता देशातील पन्नास-पंचावन्न कोटी मुखांनी एक सुरानं गावी अशीच आहे." याशिवाय पं. नेहरु, रविंद्रनाथ टागोर, पं. गोविंदवल्लभ पंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, म. जोतिबा फुले, संत गाडगेमहाराज, महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्यावर विविध मान्यवर लेखकांनी चरित्रपर जे लेखन केले आहे त्यास यशवंतरावांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्याच, शिवाय टीका-टिप्पणीही केली आहे. यशवंतरावांनी विविध ग्रंथांना, गौरवांकांना प्रस्तावना लिहिल्या. आपल्या अभिप्राय कळवला. त्यापैकी १७६ प्रस्तावना आज उपलब्ध आहेत. यातील काही प्रस्तावना या समीक्षेच्या रुपात तर काही प्रस्तावना व पुरस्काराच्या शुभेच्छा, संदेशाच्या स्वरुपात आहेत. त्यामुळे सर्वच ग्रंथांचा आढावा येथे घेणे शक्य नाही. परंतु ज्या थोड्याफार समीक्षात्मक लेखांचा उल्लेख केला आहे त्यावरुन यशवंतरावांचे समीक्षा लेखन स्पष्ट झाल्याशिवाय राहात नाही.
भालचंद्र नेमाडे, ना. धों. महानोर, अरुण साधू यांसारख्या वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या साहित्यिकांबद्दल त्यांनी आपली स्पष्ट मते नोंदविली आहेत. भा. द. खेरांची 'हिरोशिमा' ही कादंबरी सर्व भाषेत गेली तर ज्यांच्या हातात निर्णयशक्ती आहे त्यांच्यावर जनमानसाचे दडपण येण्याची आशा आहे असा आशावाद ते व्यक्त करतात.