यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ४१

अर्थात ही शक्ती त्या व्यक्तीची राहत नसून ती त्या देशाची बनते व त्यामुले देश सार्थ होतो आणि देश आत्मविश्वासाने प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकू शकतो." यशवंतरावांच्या समकालीन व्यक्तींबद्दलचा हा अभिप्राय अतिशय महत्त्वाचा आहे. राजकारणामध्ये अनेक कठीण प्रसंग निर्माण झाले. काही दिवस इंदिरा गांधींचा व त्यांचा व्यक्तिगत दुरावा निर्माण झाला. पण राष्ट्रीय पुढा-यांत एक अग्रणी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा उल्लेख ते करतात. श्रीमती इंदिरा गांधींच्या बाबत 'संघर्ष' या एका शब्दात त्यांच्या सर्व जीवनाचे सार आल्याचे नोंद करतात. यशवंतरावांसारखा वाचक अशा साहित्यकृतीबद्दल सहज प्रतिसाद देतो.

कलेच्या स्वातंत्र्यावर व सामर्थ्यावर त्यांची निस्सीम श्रद्धा होती. कलेच्या आणि कलावंतांच्या अभिवृद्धीसाठी त्यांनी अनेक उपक्रम सुरू केले. 'लता' या गौरव ग्रंथामध्ये ते लिहितात. "लता मंगेशकर हे अद्भुततेचा स्पर्श झालेले भारतीय संगीत सृष्टीचे लेणे आहे. त्यांची गीते ऐकण्याची संधी मला बरेच वेळा मिळाली. शब्द आणि भावना यांना जोडणा-या त्यांच्या मधूर स्वरांतून संगीताची सृष्टी उभी राहते व त्या स्वरांनी रसिकांची हृदये हेलावतात. गीतांतील भावनांचा उत्कट अनुभव येतो." यशवंतरावांची कलेच्या क्षेत्रातील चिकित्सा किती चौफेर होती हे दिसून येते.

यशवंतरावांनी साहित्यकृतीला प्रतिसाद म्हणून अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्या प्रस्तावनांना समीक्षेचे रुप प्राप्त झालेले आहे. त्या त्या कलाकृतीचे लावण्य, सौंदर्य व आशय मोजक्या शब्दांत यशवंतराव वर्णन करतात. त्यामुळे त्या कलाकृतीची अधिक चांगली समज येते. यशवंतरावा लोकसाहित्याची परंपरा ही हजारो वर्षांपूर्वीची असल्याचे सांगतात. बदलत्या काळाप्रमाणे त्या काळातील जीवनाचे संदर्भ घेत ही परंपरा पोहोचली आहे. कित्येक शतकापासून लोकजीवनात अखंडपणे प्रवाहित राहिलेला लोकसाहित्याचा हा प्रवाह आहे. त्यामुळे लोकसाहित्य हे लोकांचे पर्यायाने त्या देशाचे धन आहे. अमूल्य असा खजिना आहे. असा उल्लेख ते करतात, "लोकसाहित्याचा संगीताशी संबंध आहे. कथांशी संबंध आहे. किंबहुना लोकजीवनाची जी विविध त-हेची स्वरुपे आहेत व ज्यांचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वरुप व्यक्त होत असेल ती सगळी लोकजीवनाची व्यक्त दर्शने म्हणजे लोकसाहित्य असे आपणाला मानावे लागेल." लोकजीवनातून लोकसाहित्य निर्माण होते आणि लोकसाहित्यातून लोकजीवनाचे प्रतिबिब पडलेले असते. " ज्या लोकजीवनाने त्यातील काहीतरी सौंदर्यस्थळामुळे, त्यातील काहीतरी शहाणपणामुळे जे स्वीकारले आणिजे सर्वांनी मान्य केले असा त्यातील जो गाभा, तेच शेवटी लोकसाहित्य होऊन बसते." अशा स्वरुपाची लोकसाहित्याची व्याख्या ते करतात. लोकसाहित्याचा अभ्यास म्हणजे संस्कृतीच्या अभिसरणाचा अभ्यास, लोकमानसाच्या अभिव्यक्तीचा अभ्यास होय. म्हणून लोकसाहित्याचे संशोधन झाले पाहिजे. तरच बाहेरच्या लोकांना आपला समाज काय आहे हे कळेल. पण आजही लोकसाहित्याचा अनादर केला जातो याची खंत यशवंतराव व्यक्त करतात. शिवाय त्यातील अपुरेपणा दाखवतात. त्यासाठी सर्वांना खास प्रयत्न करणे गरजेचे आहे असा सल्लाही देतात.

एकूण साहित्य विचारात काव्याला मध्यवर्ती स्थान देण्यात येते. याचे कारण बहुतेक देशात साहित्य परंपरेची सुरुवात महाकाव्यांनी झाली असावी. 'गीता' तून उत्क्रांत होऊ लागलेले हे 'वाङ्मयीन रुप' म्हणजेच कविता अशी व्याख्या स्थलमानाने रमेश तेंडुलकरांनी केली आहे. पण साहित्यप्रकाराच्या दृष्टीने कवितेचा विचार करताना संमिश्र कला असलेल्या गीतापेक्षा स्वतंत्र रूप धारण करणारी भावकविता हीच अखेर कवितेची मूळ प्रकृती ठरते. अशा या वाङ्मयप्रकाराबाबत यशवंतराव म्हणतात, "कविता निव्वळ योजून घडत नाही म्हणतात, ती स्फुरावी लागते. अनुभूतीची उत्कटता भावनांच्या पंखावर बसून शब्दरुप होते. तेव्हा कवितेचा जन्म होतो. असंख्य स्त्री पुरुषांनी पिढ्यानपिढ्या अनुभवलेल्या उत्कट अनुभूती आणि त्यांच्या जीवनातील प्रीती, करुणा आणि पराक्रम या प्रबळ प्रवृत्तींना साद घालणा-या प्रेरणांना आपल्या प्रतिभेने ललितरुप देणारा कवी भेटतो तेव्हा महाकाव्याचा जन्म होतो. यशवंतरावांनी कवी यशवंत ( य दि. पेंढारकर ) यांच्या 'छत्रपती शिवराय' या महाकाव्याच्या प्रस्तावनेमध्ये वरील विचार व्यक्त केले. कवितेचा जन्म आणि महाकाव्याच्या निर्मितीची मीमांसा करून त्यांच्या काव्यासंबंधी संक्षिप्त विचार मांडले आहेत. नाटकांना जशी अलीकडे गर्दी होते त्याप्रमाणे कवी 'गिरीश' आणि यशवंतांची गीते ऐकण्यासाठी त्यावेळी गर्दी होत असे. काव्यातील गेयता ही रविकिरण मंडळानेच लोकांसमोर स्पष्ट मांडल्याचे यशवंतराव सांगतात -

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org