यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ३७

गतकाळातील आठवणीना उजाळा देण्यासाठी आत्मचरित्राचा उपयोग होतो. तसेच तत्कालीन जीवनातील अनुभवापासून इतरांनाही बोध होतो. जीवनाच्या प्रवासात पूर्वी भेटलेल्या सोबत्यांची पुन्हा एकदा अवलोकनात भेट होते. त्यात पुन: मीलनाचा आनंद मिळतो. त्या व्यक्तीना, प्रसंगांना नवी झळाळी मिळते. म्हणून सार्वजनिक जीवनात भाग घेणा-या व्यक्तींनी आत्मचरित्र लिहिणे आवश्यक आहे असे यशवंतराव सूचित करतात.

यशवंतरावांनी अनेक निवडक आत्मचरित्रे वाचली. अशा आत्मचरित्रांमुळे त्यांची वैचारिक, बौद्धिक व भावनात्मक भूक तर भागलीच शिवाय स्वत:च्या संकल्पित वाङ्मयाविषयी काही प्रश्न पडू लागले ते म्हणतात, " अलिकडे अधूनमधून माझ्या मनाला शंका वाटून जाते की या वाचनाद्वारे मी माझ्याच आत्मचरित्र लेखनाची तयारी तर करत नाही ना?" मी ज्या घटनांतून गेलो त्याबद्दल इतरांना काय म्हणावयाचे आहे, याबद्दल मला उत्सुकता वाटण्याचेही कदाचित हेच कारण असावे. पण आतापर्यंत प्रसंगानुसार लेखनाशिवाय अन्य लेखन मी केलेले नाही, करू शकलो नाही. आत्मचरित्र लिहायला मला आवडेल. पण त्यालाही कदाचित अवकाश आहे. मनाची तटस्थता असल्याशिवाय असले लेखन करणे शक्य नसते. मी जरी कधीकाळी आत्मचरित्र लिहिले, तर त्यात अभिनिवेश नसेल, माझे तेच खरे असा अट्टाग्रह नसेल, अशी मला आशा आहे."  त्यांच्या यावरील आत्मगतातून त्यांची आत्मचरित्रे लिहिण्याची तयारी लक्षात येते. पुढे त्यांनी 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र लिहिले. आपल्या गतायुष्याकडे यशवंतरावांनी सिंहावलोकनाच्या दृष्टीने पाहिले. त्याचे आविष्करण 'कृष्णाकाठ'मध्ये केले आहे. इतरांची आत्मचरित्रे वाचत असताना आपल्यापुढेही आपला जीवनपट अनुषंगाने कळत-नकळत उलगडत जात असतो. त्यातील अनेक बारकावे त्या त्या वेळी दिसू लागतात. आत्मचरित्रामधील आत्माविष्कार जीवनातील सत्याशी संबंधितच ठेवण्याच प्रयत्न यशवंतरावांनी केला आहे. स्वानुभावाच्या आधारे जीवनसत्याचा शोध तटस्थपणे घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. लेखकाने आत्मचरित्र लिहिताना स्वत:ला विसरले पाहिजे. तसेच त्याला स्वत:चे भानही असले पाहिजे. म्हणजेच स्वत:ला विसरुन स्वत:कडेच तटस्थपणे पाहात गतजीवनातील स्मृती अभिनिवेशाशिवाय सांगितल्या पाहिजेत.

यशवंतरावांनी साहित्यक्षेत्रात अनुभवांच्या आणि आविष्काराच्या नव्या वाटा चोखाळण्याचा सदैव प्रयत्न केला. या संदर्भात त्यांचे चरित्र, आत्मचरित्र, वाङ्मविषयक विचार महत्त्वाचे आहेत. यशवंतरावांना या वाङ्मयप्रकाराबाबत विशेष रुची होती. ते या वाङ्मयप्रकाराचे आवडीचे वाचन करत. त्यामुळे या वाङ्मयाबाबतचे अनुभवविश्व साकार करणारे विचार त्यांनी मांडले, यामधून त्यांची जी प्रतिमा उभी राहते ती एक समाजमनस्क साहित्यिक म्हणूनच. या वाङ्मयप्रकाराबद्दल विचार मांडताना - एखाद्या साहित्यिकांच्या साहित्यकृतीचा आस्वाद आणि आकलन त्याच्या आत्मचरित्रातून अधिक सुलभ होऊ शकते. किंवा एखाद्या कालखंडाचा साक्षी म्हणूनही या वाङ्मयप्रकाराचा उपयोग होतो. तसेच एखाद्या माणसाविषयीच्या आपल्या ज्ञानात, समजूतीत हा वाङ्मयप्रकार फार मोठी भर घालणारा आहे. या वाङ्मयातून विविधांगी मानवी स्वभावाचे दर्शन घडते. असे हेतूही ते स्पष्ट करतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org