यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे- ३३

थोरामोठ्यांची चरित्रे वाचत असताना माणसा-माणसांच्या जीवनात आणि अनुभवविश्वात किती विविधता असे हे लक्षात येते आणि आपले मन चिंतनशील बनते. अंतर्मुख होऊन विचार करु लागते. "वर्तमानकाळ समजण्यासाठी इतिहासाचे सतत चिंतन करावे लागते. कारण वर्तमानकाळाशी झगडणा-या माणसाला भूतकाळ समजण्याची जर अक्कल नसेल तर वर्तमानकाळाशी तो फारसा झगडू शकणार नाही आणि म्हणून त्यासाठी इतिहासाचा थोडाफार अर्थ समजून घ्यावा लागतो." असे चव्हाण म्हणतात. चरित्रकार हा इतिहासकारही असावा लागतो. इतिहासाची जशीच्या तशी पुनरावृत्ती जरी होत नसली तरी माणसाची प्रवृत्ती इतिहासापासून धडा घेण्याची असते. इतिहस हा कर्तृत्व करण्याला उत्तेजन देत असतो आणि तसे उत्तेजन देताना मागील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सूचना देतो. इतिहासामुळे पुढच्या पिढीला मार्गदर्शन लाभते. तसेच चरित्रापासून जीवनाला मार्गदर्शन लाभते. पूर्वजांचे आणि त्यांच्या भव्य दिव्य वृत्तींचे पुण्यस्मरण व्हावे. जीवनाला काही वळण लागावे, हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून कित्येक काळापर्यंत चरित्रे लिहिली गेली आणि म्हणूनच इतिहास व चरित्रे यांचा संबंध भूतकाळाशी असतो. काही चरित्रे याला अपवाद आहेत. यशवतरावांनी मालोजीराजे आणि शहाजीमहाराज ग्रंथप्रकाशन समारंभाच्या वेळी ऐतिहासिक चरित्रग्रंथावर मांडलेले विचार फार मोलाचे आहेत.

यशवंतरावांनी पं. नेहरु, रविंद्रनाथ टागोर, पं. गोविंद वल्लभ पंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, इ. चरित्र ग्रंथांना अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्यामध्ये या वाङ्मयाचे महत्त्व त्यांनी सांगितलेच शिवाय भारतीय दिशाहीन तरुणांना मार्गदर्शन व्हावे त्यांनी या थोर नेत्यांच्या चरित्रांचा अभ्यास करावा व स्वत:ही प्रतिकूल परिस्थितीशी झगडून कर्तृत्वाने मोठे व्हावे असा संदेश दिला. चरित्रपर कादंबरी हा वाङ्मयप्रकार अतिशय लोकप्रिय असा वाङ्मयप्रकार आहे. यामध्ये माणसाच्या जीवनाची कहाणी सांगितली जाते. चरित्रपर कादंबरी व्यक्तिजीवनाचा इतिहास कथन करते. आलेल्या अनुभवातून मानवी जीवनाचे स्वरुप व रहस्य उलगडून दाखवणे हेच या वाङ्मयप्रकाराचे उद्दिष्ट असते. या वाङ्मय-प्रकाराबद्दल यशवंतराव म्हणतात, "चरित्रात्मक कादंबरीचा एक नवा लेखन प्रकार अलीकडे मराठी साहित्यात रूढ होऊ पाहत आहे. कादंबरीकार साहित्यिक हे वास्तवाच्या जवळपसा जाऊ लागले आहेत आणि उगवत्या पिढीला केवळ स्वप्नरंजन किंवा मनोरंजन यांच्या चौकटीत न ठेवता पलीकडच्या टप्प्यावर बोलावत आहेत हा याचा अर्थ मी मानतो. या प्रयत्नाने अधिक बाळसे धरायला पाहिजे असे मला वाटते." स्वर्गीय श्री. लालबहादूर शास्त्रीं यांच्या जीवनावर चरित्रपर 'अमृतपुत्र' या भा. द. खेर लिखित कादंबरीच्या प्रस्तावनमध्ये यशवंतरावांनी वरील विचार मांडला आहे. ज्याच्या जीवनाविषयी परेशी माहिती मिळते, ज्याचे जीवन आकर्षक वंदनीय, पुण्यवान असून अनेक समर प्रसंगांनी, भावनिक चढउतारांनी, असामान्य घटनांनी, मानसिक द्वंद्वांनी, गुणावगुणांनी रसरसलेले असते अशाच मनुष्याची शक्यतो चरित्रपर कादंबरीसाठी निवड केली जाते. भा. द. खेरांनी या लेखनाच्या माध्यमातून चरित्रात्मक कादंबरीचा एक नवीन प्रकार मराठी कादंबरीत रुढ केला आहे, असा उल्लेख ते करतात. एवढेच नव्हे तर पाश्चात्य इंग्रजी वाङ्मयात चरित्रात्मक कादंबरीला अव्वल दर्जाचा वाचक मिळत आहे. लेखकांनी या वाङ्मयप्रकारात भरपूर लेखन करावे व हा वाङ्मयप्रकार घरातघरात पोहचवावा असा आशावाद ते व्यक्त करतात.

स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक राजकीय व सामाजिक नेत्यांची चरित्रे लिहिली गेली. स्वातंत्र्योत्तर काळात अनेक महत्वाचे नेते 'चरित्राचे' विषय झालेले आहेत. यामध्ये मुख्यत: पंतप्रधान, राष्ट्रपती यांसारख्या सत्तास्थानी असलेल्या अनेक व्यक्तींचा समावेश आहे. सामाजिक, स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतलेल्या व चळवळीचे उद्गाते म्हणून कार्य केलेल्या अनेक समाजसुधारकांची चरित्रे लिहिली गेली. या चरित्रांमुळे मराठी साहित्यात व सांस्कृतिक वातावरणात भर पडली. पण त्याबरोबर जीवनातल्या भल्याबु-या घटनांकडे वृत्तीने पाहण्याची सवय वाचकांना लागते. यासंदर्भात असे म्हणता येईल, "कर्तृत्वान व सफल माणसांच्या जीवनाचे दर्शन त्यांच्या चरित्र आत्मचरित्राच्या माध्यमातून घडते आहे त्यातून अधिक चांगले जीवन जगण्याची प्रबळ इच्छा जागृत होते. जीवनमान सुधारण्यासाठी कष्ट करण्याची प्रेरणा व स्फूर्ती मिळते. बुद्धी प्रगल्भ होऊन दृष्टिकोन व्यापक होतो. " यशवंतरावांना अंतर्दर्शी मानवतावादी चरित्र नायक आवडतात. हे महापुरुष असतात अशा महापुरुषांचे चरित्र अत्यंत अघटित आणि रोमहर्षक घटनांनी भरलेले असते. सत्यासाठी तत्त्वासाठी आणि माणसाच्या उभारणीसाठी हे महापुरुष खर्ची पडत असतात. हे खर्ची पडणे 'स्फूर्तिदायक' असेच असते. म्हणूनच यशवंतरावांना या चरित्रवाङ्मय प्रकारातबाबत रुची होती हे स्पष्टपणे जाणवते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org