यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-२३

कै. बळवंत पांडुरंग उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी मराठी संगीत नाटकांची एक समृद्ध परंपरा निर्माण केली. विष्णुदास भावे यांनी घालून दिलेल्या पायावर नवी वैभवसंपन्न इमारत उभारण्याचे काम अण्णासाहेब किर्लोस्करांनी १८८० मध्ये केले. जुन्या नाटकांचे स्वरुप त्यांनी सर्वस्वी बदलून टाकले. कथानकांचा विकास, स्वभाव परिपोष, नव्या धर्तींचे संगीत, उत्कृष्ट संवाद इत्यादी गुणांनी युक्त अशी नाटके लिहून त्यांनी मराठी रंगभूमीवर नवी प्रथा सुरु केली. आपल्या प्रतिभेच्या सामर्थ्याने नाट्यसृष्टीत सर्वत्र क्रांती घडवून आणली. त्यांच्या नाटकांबद्दल यशवंतराव चव्हाण लिहितात, "संस्कृत नाटकांतील कला व पौराणिक नाटकातील संगीत यांचा अपूर्व संगम अण्णासाहेब किर्लोस्करांनी 'सौभद्रात' साधला. हे नाटक रंगभूमीवर येऊन पाऊणशे वर्षाच्यावर काळ उलटून गेला आहे. पण आजही ते पहिल्या दिवसाइतकेच लोकप्रिय आहे. काळ बदलला. तंत्रविषयक कल्पनांत जमीनअस्मानाचा फरक पडला. गेल्या पाऊणशे वर्षांत अनेक प्रभावी नाटके रंगभूमीवर आली. पण सौभद्राचे स्थान अढळच राहिले." सौभद्र नाटकाने अण्णासाहेब किर्लोस्करांची ख्याती झाली. त्यांनी नाट्यकलेला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. हे करताना त्यांनी जुन्या परंपरेचा त्याग केला नाही. उलट कथानक पौराणिक स्वरुपाचेच ठेवले. चटकदार संभाषणे, नादमधुर प्रसादपूर्ण शब्दरचना, उठावदार रसपरिपोषक प्रसंगांची निवड, रंगभूमीचे मार्मिक ज्ञान, अत्यंत आकर्षक संगीत व पदरचना यांचा सुंदर मिलाफ सौभद्रात दिसून येतो. यशवंतराव लिहितात. "महाराष्ट्रात १८८२ ते १८९८ या सोळा वर्षांच्या अवधीत नाटकांची वाढ झपाट्याने झाली. याची गंगोत्री 'सौभद्र', 'शाकुंतल' सारखी नाटके आणि वाङ्मयाची निर्मिती व प्रसार यांच्या विषयी महाराष्ट्राला वाटणारी आस्था ही होय, " तत्कालीन महाराष्ट्राचे सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चित्र मोठे खुमासदार आणि उद्बोधक अशा स्वरुपाचे होते. यशवंतराव वेळात वेळ काढून नाटके पाहात असत. ते कलाप्रेमी रसिक वृत्तीचे असल्यामुळे नाटके पाहात असत. कराडहून कोल्हापूरला नाटक पाहण्यासाठी ते जात असत. 'प्रेमसंन्यास' हे नाटक पाहण्यासाठी व केशवराव दाते यांची या नाटकातील जयंताची भूमिका पाहण्यासाठी ते कोल्हापूरला गेले. "नाटक सुरु झाले आणि जयंतच्या भूमिकेत मी केशवराव दात्यांना पाहिले. त्यांचा अभिनय, शब्द उच्चारण्याची पद्धत मला फार आकर्षक वाटली. ज्यासाठी मी आलो होतो त्याचे चीज झाल्यामुळे मला समाधान वाटले. " यशवंतरावांना मराठी नाटकांविषयी व नामवंत नटांविषयी कमालीची आत्मीयता होती. मोठ्या जिज्ञासू वृत्तीने व जिव्हाळ्याने नामवंत मराठी नटाकडे ते पाहात असत. भाऊराव कोल्हटकर, गणपतराव जोशी, मोरोबा वाघोलीकर, दत्तोपंत हल्याळकर, केशवराव भोसले, बालगंधर्व, केशवराव दाते, चितामणराव कोल्हटकर, या व यासारख्या कित्येक नामवंत नाट्यकलाकारांबाबत त्यांच्या मनात आत्मीयता होती. कलेची आणि कलावंताची कदर करणारा हा रसिक नेता होता.

यशवंतराव चव्हाण विदेश दौ-यावर असताना वेळात वेळ काढून ते रंगमंदिराला भेट देत असत. तसेच तेथील नृत्य आणि नाटक या कलांमध्ये ते रंगून जात असत. रशियात मॉस्कोला गेले असताना रशियन रंगभूमीवर चाललेले खेळ पाहण्यात ते दंग होत. "न्यूयॉर्क आणि लंडन येथील नाट्यमंदिरे आणि तेथे सुरु असलेली काही नाटके मी पाहिली.  या दोन्ही शहरातील नाट्यकला क्षेत्र मोठे भव्य आहे. मन प्रसन्न होते. " असे येथील नाट्यकलेबद्दल मनोगत व्यक्त करतात. आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, लंडन, न्यूयॉर्क, ताश्कंद अशा कितीतरी ठिकाणी विदेशी दौ-यासाठी गेले असताना त्यांनी तेथेही आपली नाट्यरसिकता कमी होऊ दिली नाही. लंडनच्या रंगभूमीबद्दल ते सांगतात, "लंडनची रंगभूमी हे माझे सर्वात मोठे आकर्षण आहे. दोन नाटके पाहिली. अगदी वेगळ्या स्वरुपाची पण रंगतदार होती. अभिनयातील सहजता, आधुनिक तंत्रामुळे आलेली वास्तव कथेतील स्वाभाविकता, नाटकाचे अंक दोन. दोन अंकात सर्व मिळून चार प्रवेश. दोन अडीच तासांत सर्व काही संपते. एक नवा आनंद घेऊन प्रेक्षक बाहेर पडतो. कित्येक नाटके दोन दोन वर्षे सतत चालली आहेत. या रंगभूमीला पल्लेदार इतिहास आहे. काळाने आलेली परिपक्क्वता आहे. कलाकारांची जाणीव आणि व्यासंग या सर्व गोष्टींनी नाट्यकला येथे सदा बहरलेली असते." २५ सप्टेंबर १९७२ मध्ये लंडनहून वॉशिंग्टनला आल्यावर त्यांनी जे पत्र लिहिले त्यामध्ये लंडनच्या रंगभूमीची वरीलप्रमाणे प्रशंसा केली आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org