यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-२०

यशवंतरावांनी अनेक कवींच्या मैफिली करवल्या. अनेक कवी त्यांचे मित्र झाले. ग.दि. मां. चे 'गीतारामायण', " पापण्यात गोठविली मी नदी आसवांची " हे शब्द त्यांच्या मन: पटलावर दीर्घ काळ उमटत राहिले. निखळ आनंद देणारा मित्र म्हणून ते त्यांना मानत. नारायण सुर्वे, ना. धों. महानोर यांच्या कविता तेवढ्याच तन्मयतेने ते वाचत. करंदीकरांच्या काव्यात ते रमून जात. कुसुमाग्रजांच्या कवितेची उंची त्यांना सदैव जाणवत राहिली. कविविर्य यशवंत यांच्या 'छत्रपती शिवराय' महाकाव्याचे प्रकाशन यशवंतरावांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी या समारंभास अनेक साहित्यिक जमले होते. खांडेकर, प्रा. फडके, कवी गिरीश, कवी यशवंत, घाटे, रानडे इ. तर नव्या पिढीतील शिरवाडकर, पु.ल.देशपांडे, रजणीत देसाई इ. काही श्रेष्ठ साहित्यिक पहिल्या रांगेत बसले होते. त्यांना पाहून यशवंतराव म्हणाले, "इथं थोर थोर साहित्यिक प्रेक्षागारात माझ्या समोर बसलेले आहेत. मी सरस्वतीचा किंचित मानकरी आहे. अशा परिस्थितीत या सरस्वतीच्या दरबारात व्यासपीठावर मिरवताना मला अतीव संकोच वाटत आहे." यावरून यशवंतरावांच्या ठिकाणी असलेल्या साहित्यिकांच्या बाबतची आदरार्थी भावनाच व्यक्त होते. शिवाय विनम्रताही. त्यांनी या कवींच्या संदर्भात स्वतंत्र ग्रंथलेखन जरी केले नसले तरी प्रसंगानुसार त्यांनी मराठी कवी व कविता यांची भलावण केली आहे. समाजजीवनातील अनुभवांचा साहित्यातील पहिला हूंकार म्हणजे काव्य या कल्पनेने यशवंतरावांनी काव्याकडे पाहिले." "कविता निव्वळ योजून घडत नाही म्हणतात तर ती स्फुरावी लागते. अनुभूतीची उत्कटता भावनांच्या पंखावर बसून शब्दरुप घेते तेव्हा कवितेचा जन्म होतो." अशा स्वरुपाचे चिंतन काव्यनिर्मितीबाबत मांडले आहे. कवी सुधांशु यांच्या 'स्वर' या काव्यसंग्रहास त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. 'दत्त दिंगबर दैवत माझे' या भक्तिमधुर गीताने सर्वांना परिचित असणारा कवी रसिकांच्या भावमनात अनेक स्वरमधुर गीतांनी रिझवील असा आशावाद ते व्यक्त करतात. आणि कवींच्या कल्पनाशक्तीबद्दल आणि सरस साहित्यानिर्मितीबद्दल म्हणतात, "सूर्य जे पाहू शकत नाही, ते कवी पाहू शकतो. जीवनातल्या अशा काही खाचाखोचा असतात की ज्या सुसह्य व्हायला जगातलं पांडित्य, सारं तत्वज्ञान अपुरं ठरतं. कवीच्या मुखातल्या एका आर्त शब्दात ह्या सा-या अनुभवांतून एक निराळं भव्य दिव्य स्वप्न दाखवायची शक्ती असते. समवेदनेचा दिलासा असतो. सुख वाढविणारी, दु:ख हलकी करणारी, आशेचे नवजीवन जगण्याची उमेद देणारी ही संजीवनी मुक्त हस्ताने सर्वांना देण्याचे औदार्य कवीमनालाच असते. कवी यशवंत आणि यशवंतराव दोघेही सातारा जिल्ह्यातले. त्यामुळे दोघात एक वेगळे नाते होते. यशवंतरावांच्या व कवी यशवंतांच्या नावातही साम्य होते. त्यामुळे यशवंतरावांच्या या कवीबद्दल तीव्र भावना आहेत. या कवीबद्दल ते लिहितात. "आईवर प्रेम न करणारा माणूस या दुनियेमध्ये कुठे सापडेल? पण कवी यशवंतांना आईची आठवण झाली आणि घराघरातली आई जागी झाली." असे उद्गार त्यांच्या कवितेबद्दल ते प्रेमामुळेच काढतात. त्यानी देशभक्तीपर कविता लिहिल्या. या कवितांमधून त्यांनी संसारातील अनेक सुखदु:खाच्या छटा नाजूकपणे मांडल्या. शेवटी ते म्हणतात, "हे काव्य आता महाराष्ट्रातील जनतेच्या हातात जाईल. साहित्यिक त्याचे समीक्षण करतील. विद्वान त्याचे कदाचित खंडनही करण्याचा प्रयत्न करतील. परंतु आम्ही सामान्य रसिक माणसं ते गात राहू, आवडीने गात राहू. " यावरुन यशवंतरावांनी काव्यप्रतिभा, कवीचे व्यक्तिजीवन आणि कवीच्या भोवतालच्या सामाजिक व वाङ्मयीन परिस्थितीचा परस्परांवर कसा परिणाम होतो हेही सांगितले. त्यांनी काही कवींच्या व्यक्तिमत्त्वाचा मागोवा घेतला आहे. या कवींच्या काव्यावर तत्कालीन परिस्थितीचा झालेला परिणाम पाहाता त्यांच्या काव्य प्रकृतीचा ऊहापोह त्यांनी केला आहे. प्रसंगी जुन्या कवींचे आणि नवकवींचे संदर्भ घेत यशवंतरावांनी आपले काव्यविषयक विचार मांडले आहेत. यशवंतरावांना कवितांबद्दल वाटणारा जिव्हाळा त्यांनी वेळोवेळी साहित्यिक मैफलीमध्ये व्यक्त केला आहे. जीवनातल्या अनंत वेदनांना शब्दरुप देणा-या आणि अनेकांच्या भावनांना शब्दरुप देऊन आनंदनिर्मिती करणा-या या कव्यप्रकाराबद्दल स्वत:ची भूमिका ते नम्रपणे व्यक्त करतात. "नाहीतर काव्याच्या क्षेत्रात जाणता वाचक या नात्याखेरीज अकारण प्रवेश करण्याचा मला फारसा अधिकार नाही हे मी जाणतो." त्यांच्या या विधानातून एक रसिक मनाचा कवी म्हणूनच त्यांनी स्वत:चा उल्लेख केला आहे. साहित्य दरबारात राजकारणाचे जोडे बाहेर ठेवू रसिक मनाने प्रवेश करणारा सरस्वतीचा नम्र सेवक यातून प्रतीत होतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org