यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-१६

वाङ्मयातील खांडेकर-फडके युगाबरोबरच देशाच्या राजकीय वर्तुळात गांधी युग सुरु झाले होते. गांधी भारतीय पातळीवरचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते झाले होते. यशवंतराव यावेळी स्वातंत्र्यचळवळीत एका ध्येयवादाने प्रेरित झाले होते.  मनाने अतिशय संवेदनाशील म्हणून आसपासच्या दारिद्रयात खुंटणारे मानवी जीवन पाहून तळमळणारे, व्याकूळ होणारे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या संवेदनशील वृत्तींना गांधीवादाचे आकर्षण वाटले व म. गांधींच्या तत्त्वज्ञानाचा मोठा पगडा न कळत त्यांच्यावर बसला होता. ग्रामीण जीवनाकडे त्यांनी गांधीजींच्या दृष्टितूनच पाहिले. "खेड्यातल्या दारिद्रयाचा आणि अज्ञानाचा शोध घेण्याचा, त्यावर उपाय शोधून काढण्याचा माझा छंद हा त्यावेळेपासूनचा आहे. भारताचा विकास म्हणजे भारताच्या ग्रामीण भागाचा विकास आणि तिथल्या शेतीचा आणि शेतक-यांचा विकास उद्योगाचा विकास आणि सा-या माणसांचाच विकास. याला माझ्या मनात बळकटी प्राप्त झाली. ती या पहिल्या पावलामुळे ! परिस्थितीच्या चटक्यामुळे तापवल्याशिवाय वाकवता येत नाही हे लहानपणी लोहाराच्या भात्याशेजारी बसून मी पाहिले होते. परिस्थिती बदलण्यासाठी शहरातली आणि खेड्यातली मने तापवली तर !" हा गवसलेला नवा आदर्श त्यांच्या व्यक्तिमत्त्वाखाली भावविश्वाची उभारणी करत होता. रंजनातून सामाजिक प्रबोधन हे त्यांच्या साहित्याचे उद्दिष्ट नाही. गांधीयुगाने दिलेली समाजाकडे पाहण्याची दृष्टी व सामाजिक प्रबोधनाच्या उद्दिष्टांमुळेच त्यांच्या साहित्यात सर्वसामान्य मनुष्याचे दु:खी जीवन, त्याचे निरंतर होणारे शोषण, अस्पृश्य समाजातील दु:ख, त्यांचे प्रश्न, भारतीय समाजरचनेतील विषमता, हिंदू स्त्रीची वर्षानुवर्षे झालेली कोंडी, त्यांचा संघर्ष अशा अनेक गोष्टी येत होत्या. त्यांच्या एकेक लेखनाचा किंवा भाषणाचा आशय जरी आपण न्याहाळला तरी ही गोष्ट लक्षात येते. सामाजिक जाणिवांच्या या पार्श्वभूमीवर त्यांचे हे लेखन महत्त्वपूर्ण आहे. " जीवनाचे पंचामृत,' 'सामाजिक जबाबदारी' संयुक्त महाराष्ट्राचे साध्य', 'नव्या प्रेरणांना साथ देऊ या' 'समाजक्रांतीचे रसायन', 'सामाजिक प्रगतीची प्रेरणा', 'भविष्यकाळाचे अभूतपूर्व आव्हान', यासारख्या कितीतरी लेखांमध्ये त्यांनी सामाजिक प्रश्नासंबंधी समाजातील विषमतेच्या दु:खांसंबंधी, अथवा शोषणाच्या प्रश्नविषयी मांडलेले विचार महत्त्वाचे आहेत. आपल्या सगळ्या वाङ्मयीन निर्मितीतूनच ते एक प्रकारे सामाजिक प्रवृत्तीचे विश्लेषण व विवेचन करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशा प्रकारच्या विश्लेषणात व विवेचनात यशवंतरावांची स्वत:ची अशी खास वैशिष्टये आहेत. वेगळेपण आहे.

यशवंतरावांच्या साहित्यातील सामाजिक जाणिवांच्या संदर्भात त्यांचे वैशिष्टय हे की भविष्यकालीन नव्या समाजरचनेचे त्यांना आकर्षण होते. सामाजिक व्यवस्थेकडे वैज्ञानिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहावे असा सल्ला ते देतात. ते आपल्या लेखनातून व भाषणातून दलितांच्या प्रश्नांकडे, दु:खांकडे, समाजातील समानतेकडे तीव्रतेने लक्ष देतात. त्यांच्या लेखनात आत्मशोधाचे एक बीज आढळते. यशवंतराव हे प्रतिभाशाली राजकीय नेते तर होते त्यात पुन्हा त्यांच्या मानवतेवरील प्रेमाची त्यांच्या साहित्याला जोड मिळाली होती. या प्रेमाची जातकुळी संतकवींना मानवतेबद्दल वाटणा-या कळवळ्याची,  प्रेमाची होती.  म्हणूनच माणसाच्या माणसुकीवर व त्याच्या अंत:सामर्थ्यावर त्यांची जबरदस्त श्रद्धा होती. मानवी सामर्थ्यावरचा प्रचंड विश्वास, व्यापक मानवसमूहाच्या दृष्टीने केलेला परिवर्तनवादी विचार, त्यासाठी संघर्षशीलता आणि मूल्यात्मक दृष्टीने समाजवास्तवाचा अन्वयार्थ लावण्याची कुवत या सगळ्या गोष्टी ज्या साहित्यिकाजवळ एकवटलेल्या आहेत. त्यालाच ख-या अर्थाने 'सामाजिक जाणीव' प्रकट करता येईल. त्याच्याच कलाकृतीचे शक्तीकेंद्र ही सामाजिक जाणीव होईल' ही सर्व गुणवैशिष्टये आपणास यशवंतरावांच्या साहित्यामध्ये पाहावयास मिळतात. म्हणून वरील विवेचन आणि यशवंतरावांचे साहित्य यात समान धागा सापडतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org