यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-१ प्रकरण १

यशवंतराव चव्हाण यांचे समीक्षा लेखन आणि भाषणे-१ प्रकरण १

samiksha lekhan  bhashne
यशवंतराव चव्हाण यांचे

समीक्षा लेखन आणि भाषणे

लेखक : प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख
--------------------------------

pdf inmg Ebook साठी येथे क्लिक करा 


प्रकरण १ - प्राक्कथन

मराठी साहित्यात प्राचीन, आधुनिक आणि समलाकीन अशा परंपरा मानल्या जातात. साधारणत: १९४५ नंतरच्या साहित्याला 'समकालीन साहित्य' असे नाव देण्यात येते. १९४५ ते १९६० आणि १९६० ते १९८५ असे समकालीन साहित्याचे दोन कालखंड मानले जातात. १९४५ च्या आसपास देशपातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवर काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या.  दुसरे जागतिक महायुद्ध, भारताचे स्वातंत्र्य, भारत-पाकिस्तान फाळणी, महात्मा गांधी याची हत्या यासारख्या काही ऐतिहासिक घटनांचा समावेश त्यामध्ये करता येईल. या घटनांचा समाजमनावर दीर्घकाळ परिणाम झाला. आर्थिक, सामाजिक, राजकीय शैक्षणिक, धार्मिक अशा विविध पातळींवरील जीवनसंदर्भ बदले. त्याचा मराठी साहित्यावर परिणाम झाला. त्यातून नवनवीन वाङ्मयप्रवाह उदयाला आले. वास्तववाद व सौंदर्यवाद यावर भर देणारे साहित्य निर्माण झाले व अस्तित्ववादाला जवळ करणा-या साहित्यिक कलाकृती निर्माण होऊ लागल्या. 'समकालीन' साहित्य म्हणजे जे साहित्य आपल्या काळाबरोबर आहे. ज्या काळात ते निर्माण होत असते त्या काळाचे प्रतिबिंब त्यात आहे. त्या काळातील विचार, जाणिवा, मते ज्या साहित्यातून व्यक्त होतात असे साहित्य "यशवंतरावांचे साहित्य हे समकालीन साहित्य आहे. त्यांच्या साहित्यातून त्या काळातील घटनांचे पडसाद उमटलेले दिसतात. त्या काळातील मानवाच्या इच्छा आकांक्षा, प्रयत्न, असहायता, पराभव, वेदना, विद्रोह, स्वप्ने इ. आविष्कार पाहावयास मिळतो. म्हणून अशा काळाशी आणि त्या काळातील परिस्थितीशी जवळचे नाते सांगणा-या यशवंतरावांसारख्या अव्वल दर्जाच्या ललित लेखकाचा व साहित्याचा विचार करता येईल.

महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही यशवंतरावांनी आपले मराठी वेगळेपण सिद्ध केले. एका सर्वसामान्य खेड्यात जन्मलेली व्यक्ती जगाच्या कानाकोप-यात जाऊन पोहोचली. मला यशवंतरावांची साहित्यातून ओळख झाली ती अभ्यासक्रमांत त्यांच्या वाङ्मयाचा समावेश झाल्यामुळे. त्यातूनच यशवंतरावांच्या जीवनाचे एक एक पैलू उलगडत गेले. त्याअगोदर त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आदर आणि कुतूहल होतेच. कारण मी व यशवंतराव चव्हाण एकाच परिसरातील आहोत. पुढे यशवंतरावांचे साहित्य अभ्यासत गेल्यावर, एक व्यक्ती म्हणून, एक वक्ता म्हणून, एक राजकारणी म्हणून, एक साहित्यिक म्हणून आणि एक माणूस म्हणून त्यांचा अभ्यास करावा असे वाटू लागले.

माझे गाव विट्यापासून जवळ असल्याने व देवराष्ट्र हे साहेबांचे आजोळचे गावसुद्धा माझ्या गावापासून जवळ असल्याने त्यांच्या लहान वयातील काही आठवणी माझ्या कानावर पडत गेल्या. त्यांच्या या आठवणींचा परिणाम माझ्यावर झाला. पुढे महाविद्यालयीन शिक्षण कराड येथे झाल्याने यशवंरावांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आकर्षण वाटू लागले. त्यांचा मोठेपणा मला स्पर्शून गेला. त्यातूनच त्यांच्याबद्दल लिहिण्याची खरी प्रेरणा मिळाली. 

मी प्राध्यापक असल्यामुळे माझा तरुण विद्यार्थ्यांशी सतत संबंध येतो. या तरुणांमध्ये साहित्याची जाण फारच थोड्या प्रमाणात आढळते. ज्या थोड्याफार तरुणांना ती आहे त्यांच्या विचारांमध्ये प्रगल्भता,  ओघवती शैली यांचा अभाव आहे. सामाजिक प्रश्नांची जाणीव कमी प्रमाणात आहे. त्यांच्याकडे बुद्धी आहे पण तिला मार्गदर्शन आणि दिशा मिळथ नाही. त्यामुळे आज दर्जेदार नवीन साहित्यकृतींचाही समाजात अभाव जाणवतो. साहित्यातून समाजाचे दर्शन होते आणि समाजाला साहित्यातून दिशा मिळते. मोठ्या लोकांची चरित्रे वाचून समाज प्रेरित होतो व सामाजिक संकटांच्या वेळी समाजाला दिशा मिळते. अशा प्रकारे आजच्या पिढीतील तरुणांची अमर्याद शक्ती भारतीय नवसमाज निर्मितीच्या कार्याला कारणी लागावी.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org