विरंगुळा - १६

एम. आय. टी. तील रिसर्च सेंटरचे डायरेक्टर डॉ. अरविंद कुलकर्णी, चार्टर्ड अकौंटंट आणि देना बँकेचे संचालक श्री. दिलीप दीक्षित यांच्या आपुलकीचा उल्लेख केलाच पाहिजे. प्रा. प्रधान यांच्या भेटीसाठी, प्रस्तावना हस्तगत करण्यासाठी हडपसरपर्यंत दूरवर जा-ये करणं डॉ. कुलकर्णी यांच्या व्यवस्थेमुळे शक्य झालं. श्री. दिलीप दीक्षित यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं सहकार्याचा श्रीगणेशा केला. नागपूरचे उद्योजक श्री. बी. एम्. लांबे पति-पत्नी कुशल चौकशीसाठी आले असतांना हातभार लावून गेले. अंबरनाथचे भास्कर ऊर्फ राजा गोसावी यांनी कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात 'विरंगुळा' पोहोचण्यासाठी मेहनत घेतली. 'सिम्बॉयसिस' चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी 'सांगाल ते सहकार्य' असं समक्ष भेटीत सांगितलं. एक ना दोन, अनेकांचे हात लागल्याने 'विरंगुळा' पेलणं शक्य होत आहे. एकाकी मी कितीसा पुरा पडणार!

परंतु सर्व काही जमून आलं. याचं श्रेय माझं एकट्याचं नाही. कुटुंबियांचं पाठबळ, मित्र, हितचिंतकांच्या दृश्य योगदानातून 'विरंगुळा' ची पूर्तता जमली.

यशवंतरावांनी समाजासाठी मागे ठेवलेलं विचारधन 'विरंगुळा'च्या माध्यमातून समाजाच्या स्वाधीन करण्याचं कर्तव्यकर्म माझ्याकडून करून घेतलं गेलं हे ठीकच झालं. समाजानं, महाराष्ट्रातील वाचकांनी, अभ्यासकांनी या विचारधनाचा स्वीकार करून ते संग्रहात ठेवणं यातच सर्व समाधान आहे. या समाधानाचं वाटेकरी होण्याइतकी अन्य कुठली गोष्ट यशवंतरावांना आणि स्वत: मला प्रिय आहे? अर्थातच वाचकांचा सहभाग आणि प्रतिसाद. देणं यशवंतरावांचं - ते त्यांनी दिलं. आता घेणं वाचकांचं - ते त्यांनी घ्यावं. ही माझी मागणी - पसायदान! साजिंदे, सहयोगी सहकारी यांना ग्रंथपूर्तीचा दंडवत.

- रामभाऊ जोशी

'कृष्णा',
पत्रकारनगर, पुणे ४११०१६.
फोन नं. २५६५२५०६.