विरंगुळा - १०२

महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये गटबाजी सुरू आहे. कष्टदायी चित्र आहे. मराठा-मराठेतर वाद वाढविण्याचा 'चाणक्य' प्रयत्न सुरू आहे. या सर्व जातीय तेढीतून बाहेर येण्याचा मी गेली १०-१५ वर्षे प्रयत्न करीत आहे. पण काही धूर्त लोक या कार्याचा खेळ-खंडोबा करण्याची जणू काय प्रतिज्ञाच केल्यासारखे वागत आहेत. योग्य वेळी यांना (Expose) पूर्ण उघडे करण्याखेरीज दुसरा मार्ग नाही.

पुण्यातील एका समारंभ सभेत डॉ. वि. म. दांडेकरांशी अनपेक्षित वाद झाला. माझ्या ध्यानीमनी नव्हते. त्यांच्या वावदूकी भाषणाने वाद माझ्यावर लादला. वृत्तपत्रातून त्याची काही महिने चर्चा चालू होती.

३ जानेवारी १९७४

श्री. शंकरराव चव्हाण भेटले. मोकळे बोलताना दिसतात. विचार, मते यांना वळण देण्याचा प्रयत्न करीत असावेत. त्यांच्या दृष्टीने हे उत्तमच आहे. इतरांच्या दृष्टीनेही चांगले आहे. श्री. वसंतराव नाईक यांचा विश्वास त्यांनी संपादन करावा एवढीच माझी अपेक्षा.

शालिनीबाईंचे आणखी एक नवे भाषण. त्यावरील तळवळकरांचा लेख वाचला. बराच वेळ विचारचक्र चालू होते. शालिनीबाई महाराष्ट्राची सेवा करीत नाहीत अशी भाषणे करू नयेत असे सारखे वाटते. त्यांच्याशी याबाबतीत एकवेळ बोलले पाहिजे. अर्थात बोलल्यावर त्यावर पुन्हा एखादे भाषण होणार नाहीच याची खात्री नाही. श्री. वसंतदादा मात्र अकारण धर्मसंकटात आहेत.
 

३० जानेवारी १९७४

मुंबईत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीस उपस्थित राहिलो. रात्री १० वाजता सुरू झालेली बैठक फारच गाजली. सर्व रात्रभर बैठक झाली. १९६१ च्या महाबळेश्वरच्या शिबिरात अशीच रात्र जागल्याची आठवण झाली. परखड भाषणे झाली. तणाव निर्माण झाला असल्याचे उघड उघड दिसले. मंत्रिमंडळात वेगळे वेगळे गट आहेत. श्री. वसंतराव नाईक यांनी याकडे वस्तुत: कानाडोळा करू नये. अंतर्गत गटबाजीला ते प्रोत्साहन देत आहेत की काय असे मनात येऊन जाते. गटबाजीला पोषक अशी भूमिका घेणे हे काहीसे दु:खदायक आहे.

मी भाषण न करता सर्वांना एकत्र बसवून चर्चा केली. आनंद एवढाच की मला चांगला प्रतिसाद मिळाला. खेळीमेळीने ठराव झाला.
------------------------------------------------------------