विरंगुळा - ९४

आज सारा दिवस तुझ्या आठवणीत गेला. तुझ्या संगतीत काढलेले कष्टाचे - आनंदाचे सर्व क्षण कसे अलगून बिलगून जवळ येतात आणि मन एका अर्थाने कृतज्ञतेने भरून जाते.

परवा येथे येताना मी अगदी शेवटच्या घटकेला वाचण्यासाठी जे पुस्तक उचलले ते मी बरेच दिवस राखून ठेवले होते. आवडीने खावयाचा पदार्थ जसा चाखून माखून खावा, शेलकी चांगली वस्तु जशी राखून सावरून वापरावी - तसे हे पुस्तक थांबत थांबत, त्याची रुची घेत घेत सावकाशीने वाचावे असे ठरविले होते.

हा विचार ग्रंथकर्त्याने या पुस्तकाला जी अर्पण पत्रिका दिली आहे ती वाचूनच माझ्या मनात आला. माझ्या नेहमीच्या संवयीप्रमाणे पुस्तक उलटसुलट वाचून झाल्यावर आता ते सलग, ओळीने वाचावयाचे, असे मी ठरविले.

ज्या दिवशी हे ठरविले तो दिवस होता २ फेब्रुवारीचा. रात्रीच्या निवांत वेळी पुस्तक हातात घेतले. पुन्हा फक्त अर्पणपत्रिका वाचून झाली आणि माझे वाचन तिथेच थांबले. विचारांचा आणि स्मृतींचा चाळा सुरू झाला. नि वाचन तसेच राहिले. पुन्हा सवडी-सवडीने वाचू म्हणून जे राहिले ते परवा परत हाती आले.

एका प्रसिद्ध इंग्लीश लेखकाचे हे आत्मचरित्र आहे. मला अजून ते पूर्ण वाचावयाचे आहे. त्याचा दुसरा खंडही परवा असाच खरेदीत हाती आला. इथे आल्यानंतर पुस्तक वाचनाची पुन्हा पहिल्यापासून सुरुवात केली आणि पुन्हा अर्पणपत्रिकेतच मन रेंगाळले.
सत्तर वर्षे वय झालेल्या ४०-४५ वर्षे संसार केलेल्या, एका कर्तृत्ववान, बुद्धिमान, विचारवंताने आपल्या बहुढंगी जीवनाची खेळी कशी झाली याची कहाणी सांगताना त्याची अर्पणपत्रिका कृतज्ञता-बुद्धीने - प्रामाणिकपणाने आपल्या प्रिय पत्नीस लिहिली आहे.

लिहिली आहे असे म्हणणेही तितकेसे बरोबर नाही. कारण त्यानेही एका जुन्या पण विख्यात फ्रेंच कलावंताने आपल्या पत्नीस लिहिलेले चार ओळींचे पत्र फक्त नाव बदलून दिले आहे. ते पत्र म्हणजेच ही अर्पणपत्रिका!

या पत्रात त्या कलावंताच्या ज्या भावना आहेत व त्यांचा प्रतिसाद या लेखकाच्या अंत:करणात ऐकू आला. अगदी त्याच भावना माझ्या आहेत. एकमेकांशी संपूर्ण मिळत्याजुळत्या आहेत. गेले दोन महिने हाच विचार माझ्या मनात मधून मधून, सारखा येत होता. अर्पणपत्रिका वाचून पुन्हा मन जे तेथे रेंगाळले आहे याचे कारण हे आहे.

आता पुस्तक पुढे वाचण्यापूर्वी ते पत्रच मूळचे नाव बदलून तुझ्या नावे येथे देत आहे. त्यातल्या भावना त्या कलावंताच्या वा लेखकाच्या नाहीत. माझ्या - अगदी माझ्या आहेत. शब्द त्याचे आहेत हे खरे; परंतु अनुभूती माझी आहे - माझीही आहे.

''तुझ्या संगतीची साथ ही ईश्वराने दिलेली देणगी आहे. त्याच्या या कृपेच्या जाणिवेने माझे मन आकंठ भरलेले आहे. तुझ्या उदार अंत:करणामध्ये माझ्या या जाणिवेला जागा राहू दे, एवढे सांगण्यासाठीच हे पत्र लिहीत आहे.''
-यशवंतराव

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org