विरंगुळा - ९१

यशवंतराव जागतिक दौऱ्यात मग्न होते, दौरे करत होते, भारताची प्रतिमा उंचावित होते. पण मनात कष्टी होते. याचं कारण खुद्द देशातलं वातावरण १९७४मध्ये गढूळ, अनिश्चिततेचं, घबराटीचं बनलं होतं. राजकीय स्थिती बेभरवशी, बेबंद बनली होती. केव्हा काय उलथापालथ होईल याचा भरवसा उरला नव्हता. साथी जयप्रकाश यांनी परिवर्तन आंदोलन सुरू करून न भूतो न भविष्यती असं आव्हान त्यावेळच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना दिलं होतं. राजकीय क्षेत्र अस्वस्थ बनण्यात या आंदोलनाचा परिपाक झाला असतानाच आंदोलन चिरडण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी पुकारली. आणीबाणीच्या अंमलबजावणीत विरोधी पक्षांच्या नेत्याची धरपकड हे सूत्र ठरून जयप्रकाशजींसह अनेकांची कारावासात रवानगी करण्यात आली. प्रसिद्धी माध्यमांवर कठोर बंधनं लादण्यात आली. सर्वत्र हाहाकार माजला. केव्हा कोणावर आपत्ती येईल याचा नेम उरला नाही.

१९७५ मध्ये आणीबाणी पुकारली ती पंतप्रधानांनी, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना हा आदेश धरपकड सुरू झाल्यानंतरच समजला. तथापि या विरुद्ध बोलण्याची किंवा कृती करण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती. सर्वत्र जबरदस्त धाक!

आणीबाणीचा पुकारा झाला त्या दिवशी मी दिल्लीत होतो. त्या काळातील एक प्रसंगाचा साक्षीदार आहे. त्या दिवशी दुपारी नॉर्थब्लॉक भागातील निवासस्थानी होतो. काही लेखन करीत होतो. तेवढ्यात दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार मित्र श्री. अनंत सात्विक यांचा फोन आला. पार्लमेंट हाऊसच्या सेंट्रल हॉलमधून ते बोलत होते. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मी अवाक् बनलो. बी. बी. सी लंडन वरून प्रक्षेपित झालेली बातमी त्यांनी ऐकली व मला सांगितली. ''जगजीवनबाबू आणि यशवंतराव चव्हाण यांना 'हाऊस अरेस्ट' (नजरकैद) करण्यात आल्याचं प्रक्षेपित करण्यात आलं होतं.

दिल्लीत आणि इतरत्र त्या काळात अनेक अफवा उठत असत. त्यापैकीच ही एक अफवा असेल असे सात्विक यांना सांगितलं. पण ते हाडाचे पत्रकार. खात्री करून घेऊया म्हणाले.

त्यांच्या मोटारीनं प्रथम आम्ही जगजीवन बाबूजींच्या बंगल्यावर गेलो. सर्वत्र सामसूम होती. सेक्रेटरीच्या परवानगीने बाबूजींना भेटलो आणि लंडनची बातमी सांगितली. त्यावर खदखद हसून ते म्हणाले, ''आम्हाला नजरकैदेत ठेवणारा अजून जन्माला यायचाय! नजरकैद असती तर तुम्ही मंडळी बंगल्यात कसे आला असता?''

तेथून यशवंतरावांच्या बंगल्यावर गेलो. आम्हाला पाहताच ''बातमीची शहानिशा करायला आलात ना?'' असं त्यांनीच विचारलं. ''आत्ताच परदेशातून काही फोन आले. येथूनही आले. कोणा हुकूमशहाला आम्हाला नजरकैदेत ठेवायचं असेल तर ठेवोत बिचारे! राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या निर्माण होईल आणि त्यास सामोरं जावं लागेल. एक-दोन दिवसात दौऱ्यावर निघणार आहे. पाहूया काय घडतं ते.'' यशवंतरावांनी सांगितलं. नजरकैद ही शेवटी अफवाच ठरली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org