विरंगुळा - ८७

अर्थखात्याचा कारभार पहात असतानाच १९७४च्या मध्यावर केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाची हवा निर्माण झाली. पंतप्रधानांनी बदल घडविला आणि यशवंतरावांना नव्या आव्हानाला सामोरं जावं लागलं. पंतप्रधानांनी त्यांच्याकडे विदेश-व्यवहार खात्याची जबाबदारी दिली. १९६२ला संरक्षणमंत्रीपद स्वीकारून दिल्लीत पोहोचल्यानंतर चढत्या श्रेणीनं ते आता परराष्ट्र खात्यात दाखल झाले.

अर्थमंत्रीपदाचा कार्यकाळ संपत आलेला असतानाच १९७४ च्या अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळात बदल घडवून आणण्याची हवा सुटली. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात यशवंतराव ओटावा, वॉशिंग्टन इत्यादी शहरांच्या दौऱ्यावर जाणार होते. तीन आठवड्यांचा हा सलग दौरा होणार होता. परदेशी निघण्यापूर्वी पंतप्रधान इंदिरांजींची भेट झाली त्यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या विचारात त्या आहेत याचा त्यांना सुगावा लागला होता. इंदिराजींनीच त्यांना तसं सांगितलं. हे सूतोवाच झालं त्याचवेळी यशवंतरावांनी सहमती दर्शविली आणि जे काही करायचं ते लवकर करावं असेही सांगितलं.

दिल्लीत १९६२ मधे संरक्षणमंत्री म्हणून आल्यानंतर ज्या महत्त्वाच्या खात्याचा कारभार त्यांनी सांभाळला तो चोखपणे सांभाळला. अमूक खातं हवं असा हव्यास धरला नाही किंवा त्यासाठी लाचारी केली नाही. जबाबदारी स्वीकारल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. मंत्रिमंडळात फेरबदल घडणार असल्याचं त्यांनी ऐकलं आणि अस्वस्थ न बनता दौऱ्यावर निघून गेले. २५ सप्टेंबरला सुरू झालेला दौरा संपवून ८ ऑक्टोबरला ते दिल्लीस पहाटे परतले. सकाळी १० वाजता कॅबिनेट मीटिंग असल्याचा निरोप त्यांना विमान तळावर मिळाला.

कॅबिनेट मीटिंगचा निरोप मिळताच त्यांचे विचारचक्र सुरू झालं. दिल्लीस येण्यास निघाले तेव्हा मंत्रिमंडळाचा फेरबदलाचा विचार नसेलही. तसा विचार करण्याची त्यांना गरज नव्हती. आजवर जे फेरबदल झाले त्यावेळी असा काही गंभीरपणे विचार करण्यास त्यांना फुरसत मिळालीच नव्हती. काहीतरी खातं देऊ केलं तर नको म्हणण्याचा आपला प्रिव्हिलेज आहेच असं त्यांनी ठरविलं असावं. याच अनुषंगानं ८ ऑक्टोबर १९७४ साली त्यांनी मनातील विचार डायरीत शब्दबद्ध करून ठेवले आहेत.
------------------------------------------------------------

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org