विरंगुळा - ७२

स्थानिक वन्य जमातीचे लोक, व्यापारासाठी आलेले आसामी आणि इतर लोक, सरकारी नोकर वगैरे मंडळी 'प्रेक्षकां'मध्ये होती. स्थानिक जमातीतील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा एक गटही मी तेथे पाहिला. या श्रोतृवर्गाला मी प्रेक्षक हेतुपुरस्पर म्हटले आहे. ते सर्वजण पहाण्यासाठी आले होते. त्यांची भाषा मला समजत नव्हती व माझी त्यांना कळत नव्हती. त्यांच्यापैकी हिंदी जाणणाऱ्या एका माणसाला मी जवळजवळ वेठीला धरून माझ्या भाषणातील वाक्यावाक्याचे त्यांना भाषांतर करून सांगण्यास लावले. मी थोडाच वेळ बोललो पण माझे म्हणणे त्यांच्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मला समाधान झाले.

सभेनंतर निर्वासित तिबेटी लोकांचे वसलेले हे छोटेखानी गाव जवळच आहे तेथे आम्ही गेलो. हे छोटेखानी गाव, पुरुष, स्त्रिया आणि मुले सर्वजण रस्त्यावर उभे होते. अतिथीच्या सत्कारातील या लोकांची भाविकता पाहिली म्हणजे त्यांच्या व आपल्या परंपरा एकच आहेत असा प्रत्यय येतो. प्रथमत: त्यांची ती 'गुंफ' म्हणजे बुद्धधर्मियांचे प्रार्थना मंदिर असते तेथे सर्व गुंफा फिरत पाहुण्यांना घेऊन जातात. हे लोक दलाई लामांचे वेळी त्यांचेबरोबर अनंत अडचणी सोसून हिंदुस्थानात आले आहेत. बर्फाच्या प्रदेशातून प्रवास करीत असताना त्यांच्यापैकी शेकडो लोक थंडी, वारा, भूक, आजार यांना बळी पडले. परंतु त्यांची श्रद्धा अफाट आहे. या देशात आलेत खरे परंतु आपला दलाई लामा परत तिबेटमध्ये एक दिवस, लवकरच म्हणजे दोन वर्षातच जाणार आहे असेही ते मानतात म्हणे! श्रद्धा ठीक आहे पण हे घडणार कसे? चीनमधील कम्युनिस्ट राजवटीची उलथापालथ केल्याशिवाय हे कसे शक्य आहे? हा राजकीय प्रश्न आहे ह्याचे उत्तरही राजकीय असले पाहिजे हा तर्कवाद मी त्यांच्याशी घातला नाही. श्रद्धा म्हणजे श्रद्धा! तर्काची खटखट त्या क्षेत्रात कशाला? तेजू सोडून 'कॅरेबू' मधून आम्ही लोहित नदीच्या काठाने डोंगराळ भागात प्रवेश करून लोहितच्या खोऱ्यापासून पंधरा मिनिटे प्रवास केला. 'हिंगुलँग' हे ठिकाण मला पहायचे होते. ते पाहून परत फिरलो. जेवणापर्यंत वेगवेगळे विमानतळ पहात प्रवास करीत होतो. उशिरा जेवण करून ४ वाजता तेजपूरला येऊन पोहोचलो. तास-दीड तास गेले. जनरल माणिकशॉशी चर्चा करून तेजपूरच्या जाहीर सभेस गेलो. खूपच मोठी सभा होती.

गेल्या डिसेंबरमध्ये पहिल्या प्रथम या गावी मी पंतप्रधानांच्या बरोबर आलो होतो. त्याची आठवण झाली. त्यावेळी येथेच भरलेल्या सभेमध्ये मी प्रथम बोललो होतो. त्याची आठवण मी माझ्या भाषणात लोकांनाही करून दिली. गेल्या वर्षीची आठवण या गावाला विशेष आहे. त्यावेळची धावपळ व गडबड याची आठवण झाली म्हणजे अजूनही मन शरमून जाते. तेजपूरच्या लोकांनीही जोरहाटच्या लोकांप्रमाणेच एक मानपत्र दिले आहे. मात्र त्यांनी या मानपत्राचा उपयोग आपल्या मागण्या मांडण्यासाठी मोठ्या खुबीने केला आहे. सभा संपवून मी छानदार गरम पाण्याने स्नान केले. एअरफोर्सच्या मेसमध्ये भरगच्च जेवण केले आणि आता परत येऊन पत्र लिहीत आहे. सर्कीटहाऊसवर आहे. सगळ्या दिवसाचा हिशोब लिहिलेला आहे. शिलकेच्या बाजूला आता फक्त झोप बाकी आहे. Good Night.
- यशवंतराव

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org