विरंगुळा - ६४

या बैठकीत मुंबईचा प्रश्न निघताच मोरारजींनी आपलं घोडं पुढं दामटण्याचा प्रयत्न केला. द्विभाषिकाचा कारभार ठीक चालला आहे, चव्हाण चांगलं काम करीत आहेत, समितीची शक्ती कमी होत आहे वगैरे समर्थन करून या प्रश्नाचा फेरविचार करण्याचं कारण नाही असं सुचविलं. पंडितजी, पंत आणि मोरारजी यांच्यातच हा खल झाला. अखेरीस मुख्यमंत्री म्हणून चव्हाणांचं काय मत आहे असं पंडितजींनी विचारलं.

यशवंतरावांनी या संधीचा फायदा घेतला आणि सांगितलं की ''राज्य ठीक चाललं आहे, पण लोकमतात बदल घडलेला नाही. महाराष्ट्र आणि गुजरात यांचं भावनात्मक ऐक्य साध्य झालेलं नाही.'' खरं तर इथंच या प्रश्नाची इतिश्री घडून गेली. महाराष्ट्र राज्याची प्रत्यक्षात निर्मिती आणि त्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता एवढंच उरलं. त्या संदर्भात ९ डिसेंबर १९५९ ला काँग्रेस-कार्यकारिणीनं दोन स्वतंत्र राज्यं (महाराष्ट्र-गुजरात) आणण्याच्या तत्त्वास मान्यता दिली. दोन एकभाषिक राज्यं निर्माण करण्याबाबतच्या विधेयकाला महाराष्ट्रात, विधानसभेनं आणि दिल्लीतही लोकसभेनं मान्यता दिल्यानंतर एक मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्रराज्य रीतसर अस्तित्वात आले.

या संपूर्ण धावपळीच्या आणि डाव-प्रतिडाव सुरू असलेल्या काळात विरोधी पक्षियांनी महाराष्ट्रात यशवंतरावांची संभावना मात्र 'सूर्याजी पिसाळ' अशी चालू ठेविली होती. आणखीही प्रगट टीका केली. पत्नीला दिल्लीहून लिहिलेल्या पत्रात 'दूर कुठंतरी निघून जावं' असं यशवंतरावांनी नमूद केलं आहे. तो या मानसिक ताणाचा परिपाक आहे. पत्नीचं आजारपण आणि राजकीय चिंता, महाराष्ट्राविषयी चिंता असा हा ताण होता. ''या सर्व आपत्तीतून बचावलं पाहिजे, त्यात मी यशस्वी होईन.'' असा विश्वासही पत्रात दर्शवितात यावरून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळा प्रकाश पडतो.

नाट्यपूर्ण घटना घडणं हा यशवंतरावांच्या जीवनाचा विशेष आहे. पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून मुंबईतील सचिवालयात फायली पाहणाऱ्या यशवंतरावांची त्यांना काही कल्पना नसताना १९५२ मधे मोरारजींनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. मंत्रीपद मिळविण्याच्या लटपटीपासून ते अलिप्त होते परंतु पार्लमेंटरी सेक्रेटरी असताना त्यांनी सामाजिक हिताचा विचार करून केलेलं काम आणि अचूक निर्णय, कार्यक्षमता याच्या बळावरच पुरवठा खात्याचं मंत्रिपद त्यांचा शोध घेत आलं. कारभाराची कसोटी लागावी असाच तो काळ होता.

अन्नधान्याची परिस्थिती अत्यंत बिकट, पुरवठा खात्याबद्दल जनतेत तिरस्काराची भावना, रेशनिंग आणि अन्नधान्याच्या वाहतुकीवरील नियंत्रण, सरकारच्याविषयी लोकांमध्ये अप्रियता वाढलेली - अशी एकूण परिस्थिती होती. लोकांच्या दैनंदिन जीवनविषयक गरजांशी असलेलं हे पुरवठा खातं. या खात्यासाठी व्यवहारी आणि कर्तबगार व्यक्ती असली पाहिजे असा मोरारजींचा हिशेब असावा. अशी कर्तबगार व्यक्ती म्हणून यशवंतरावांची नाट्यपूर्ण रीत्या निवड झाली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org