विरंगुळा - ६३

दिल्लीहून येणाऱ्या लाटा थोपविण्यासाठी, किमान त्यातील तीव्रता कमी करण्यासाठी आणि महाराष्ट्र जागच्या जागी स्थिर राखण्यासाठी प्रसंगी नम्रता स्वीकारण्याच्या घटना जुन्या ऐतिहासिक काळात घडलेल्या आहेत. महाद्विभाषिकाचं मुख्यमंत्रीपद स्वीकारून या इतिहासाचा त्यांनी पुन:प्रत्यय आणून दिला. १९५६ ते १९६० पर्यंत म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत यशवंतरावांनी दिल्लीशी प्रतारणा केली नाही. शिवाय मोठ्या विवेकानं, संयमानं दिल्लीकृत महाद्विभाषिक यथातथ्य राबवलं. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सामाजिक मनाशी ते मिळून-मिसळून गेले. राजकारणाचे पत्ते पिसताना प्रतिस्पर्ध्यांना, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळकर्त्यांना एकामागून एक डाव जिंकत असल्याचा आनंदही मिळवून दिला. डाव खेळणाराला, खेळताना इतरांनाही खेळण्यास सवड द्यावी लागते. तथापि विशिष्ट वेळ प्राप्त झाली की हुकुमाचा पत्ता पुढे करून सारा डावच जिंकावा लागतो. धीरानं, सचोटीनं, धोरणीपणानं पावलं टाकीत, पत्ते पिसत महाराष्ट्राचं ग्रहण सुटण्यासाठी यशवंतरावांनी तेच केल आणि डाव जिंकला. डाव जिंकला तरी श्रेय स्वत:कडे घेतलं नाही.

बुद्धिबळाच्या डावात प्याद्यांची हलवाहलव अनुकूल करावी लागते. आणि डाव जिंकला जावा यासाठी पुष्कळदा योगायोगाचं स्वरूप येतं. महाद्विभाषिक चालविण्याची त्यांनी एवढी पराकाष्ठा केली की दिल्लीतील सर्व श्रेष्ठांची या प्रामाणिक प्रयत्नाबद्दल खात्री पटली होती. नेमकी ही वेळ साधून प्रामाणिक प्रयत्न करूनही द्विभाषिक चालणं अशक्य आहे असं पं. नेहरूंना सांगितलं. पं. नेहरूंच्या सान्निध्यात त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचं स्वस्तिवाचन करताच या प्रश्नाला पडलेल्या रेशीम निरगाठी हळूहळू ढिल्या होऊ लागल्या. दुसऱ्या बाजूला, द्विभाषिक चांगलं चाललं आहे, स्थिर झालं आहे, असा प्रचार गुजराथी बंधू करीत होते. मुंबईचा वजीर कोंडीत पकडण्याची ही खेळी होती. वजीराला कोंडीत पकडून एक दिवस आपल्या राहुटीत नेण्याचा डाव त्यांना साध्य करायचा होता. यशवंतरावांचा ते जयजयकार करू लागले. १९६२ च्या निवडणुकीपर्यंत द्विभाषिक अबाधित राखण्याचा त्यांचा कावा होता. परंतु सह्याद्रीत वावरणारे यशवंतराव कच्च्या गुरूचे चेले नाहीत याची त्यांना कल्पना नसावी. यशवंतराव जागरूक होते.

दरम्यान दिल्लीत अनुकूल वारं वाहू लागलं. ढेबरभाई यांच्या जागी इंदिरा गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. यशवंतरावांनी इंदिरा गांधीशी चर्चा करून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी इंदिरा गांधीची, काँग्रेस अध्यक्षांची अनुकूलता संपादन करण्यापर्यंत मजल गाठली. इंदिरा गांधी यांनी या प्रश्नाचा अभ्यास करून निर्णय करण्यासाठी म्हणून नव्या सदस्यांची एक समिती स्थापन केली. द्विभाषिक हा कायमचा तोडगा अशी दिल्लीची भूमिका नव्हतीच.

समितीचा अहवाल मिळाल्यानंतर या प्रश्नाचा सोक्षमोक्ष करण्याचे ठरविले आणि पं. नेहरू, पं. गोविंदवल्लभ पंत यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यासाठी यशवंतरावांना पाचारण केले. मोरारजी देसाई तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात होते तथापि या अंतर्गत हालचालींचा ह्यांना थांगपत्ता नव्हता. नियोजित चर्चेच्या बैठकीसाठी मात्र त्यांना निमंत्रण देण्यात आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org