विरंगुळा - ५८

बंगलोरचा बारा तासांचा मुक्काम मात्र फार सदुपयोगी ठरला. सकाळी टेलिफोन तयार करणारा आपल्या देशातील पहिला कारखाना पाहिला. त्याचप्रमाणे विमानाचे आणि रेल्वेचे डबे तयार करणारे कारखाने पाहिले. आपल्या देशाचे रूप कसे बदलते आहे आणि नवीन तांत्रिक निर्मितीच्या क्षेत्रात आपली तरुण माणसे कसे कार्य करीत आहेत हे येथे प्रत्यक्ष पहावयास मिळते. देशाच्या भविष्याबद्दल आत्मविश्वास वाढू व वाटू लागतो.

बंगलोरमधील रामन इन्स्टिट्यूट पाहिली. सर सी. व्ही. रामन यांना मी आज प्रत्यक्ष पाहिले. विज्ञानाच्या क्षेत्रात नोबेल प्राइझ मिळवून रामन यांनी आपल्या देशाच्या कीर्तीत फार मोठी भर घातलेली आहे. मी गेलो त्यावेळी बाहेरून आलेले शाळा-कॉलेजचे काही शिक्षक आणि विद्यार्थीही होते. त्यांच्याबरोबर दोन अमेरिकन्स होते. सर रामन यांच्या तोंडून 'रामन रेज' बद्दलची माहिती ऐकताना कालिदासाच्या तोंडून शाकुंतल ऐकण्याचा आनंद झाला. इथपर्यंत सर्व ठीक होते परंतु म्युझियम दाखविण्यासाठी जेव्हा सर्वांच्या घोळक्यातून हिंडू लागले आणि त्यांच्या विषयाशी संबंध नसलेल्या विषयावर, विशेषत: देशातील अंतर्गत राजकीय प्रश्नावर आणि परराष्ट्रीय धोरणावर भराभर व भरमसाट बोलू लागले तेव्हा ते सर्व न ऐकता चालू लागावे असे मनात येऊन गेले. या बोलण्याच्या ओघात पंडित नेहरूंबद्दल फार वाईट बोलले. परक्या देशाचे लोक हजर असताना त्यांचे ते बोलणे मला रुचले नाही. सामजिक आणि आर्थिक क्षेत्रातील प्रश्नावरील त्यांची मते ऐकताना मला ते विचार प्रतिगामी वाटले. परंतु देशातील हा एक थोर माणूस. पं. नेहरू हे ही थोर. थोरांनी थोरासारखे बोललेले कोणालाही आवडते भावते. त्यांच्या समोर मी काय बोलणार?
-यशवंतराव
------------------------------------------------------------

१९४६ मध्ये पार्लमेंटरी सेक्रेटरीच्या रूपानं यशवंतरावांच नेतृत्व मुंबईत पोहोचलं. १९५२ साली त्यांच्याकडं मंत्रीपद आलं. त्यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवर त्यांनी आपलं नेतृत्व क्रमाक्रमानं वृद्धिंगत केलं. १९५२ पासून पुढे चार वर्षात म्हणजे १९५६ पर्यंत त्यांचं नेतृत्व प्रशासकीय गुणांनी उजळून निघालं. पुरोगामी, ध्येयवादी प्रशासक असा त्यांचा नावलौकिक वाढला.

राजकीय क्षितीजावर मात्र त्या काळात महाराष्ट्रांत लाव्हा रसाचे लोट वहात होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शिगेला पोचली होती. ते वादळ सर्वत्र घोंगावत राहिलं होतं. या काळात यशवंतरावांनी एका भाषणात 'नेहरू की महाराष्ट्र' असा एक प्रश्न उभा केला तेव्हा चव्हाण यांचेवर चौफेर टीका सुरू झाली. यशवंतरावांची भूमिका समजून घेण्याच्या मन:स्थितीत कोणी नव्हते. वृत्तपत्रातून चव्हाण विरोधी एकतर्फी टीकेचा गदारोळ माजला. तथापी यशवंतरावांची भूमिका, मनोव्यापार त्यावेळी काय होते यावर प्रकाश टाकणारे त्यांचे स्वत:चे एक पत्र उपलब्ध आहे. संयुक्त महाराष्ट्रासंबंधात त्यांची भूमिका स्पष्ट करणारे त्यांचे हे पत्र पुरेसे बोलके आहे. ते
लिहितात -
------------------------------------------------------------

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org