विरंगुळा - ५५

खिलनमर्गच्या थंड हवेत गरम चहाचे चार घुटके घेतले आणि घोड्यावर स्वार होऊन चार-पाचशे फुटावर उंचीवर असलेल्या बर्फाकडे निघालो. वीस-पंचवीस मिनिटात तेथे पोहोचलो. बारा हजार फुटावर बर्फ पायाला लागला. पर्वताच्या शिखरापासून छोटासा एक ओढाच बर्फाने भरून असा खाली आला होता. साखरेचे ढीगच्या ढीग एकत्र केल्यावर जसे दिसले तसे हे सर्व दृश्य होते. इराण्याच्या चहाच्या दुकानात मिळतो तसा घट्ट बर्फ हा नव्हता किंवा नसतोही. ठिसूळ वाळूमधे चालताना जसे वाटते तसा अनुभव चालताना आला. अर्थात अधिक खालचे थर घट्ट असतीलच. तसे ते असले पाहिजेत. अनवाणी पायाने काही क्षण या बर्फावर उभे राहून पाहिले. लहानपणी पावसात खेळताना मनाची जी प्रचिती होती ती मनस्थिती थोडा वेळ अनुभवली. परत जाण्यासाठी निघालो. उतरताना घोड्यावर बसणे मला अवघड झाले. परतीचा प्रवास पायानेच केला. गुलमर्गपासून परत जीपने संध्याकाळी श्रीनगरला पोहोचलो.

दहा तारखेचा सर्व दिवस जवळ जवळ दोनशे मैल प्रवास करून या राज्यातील महत्त्वाचे फॉरेस्ट पाहिले. लोळाव व्हॅलीतील देवदारचे फॉरेस्ट हे आपल्या देशातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. औद्योगिक उपयोगासाठी देवदार प्रसिद्ध आहे. परंतु त्याचे फॉरेस्ट कसे असेल याची आपल्याकडे फार कमी माहिती आहे. आपण जंगल म्हणजे चिक्कार पाऊस, ओबड धोबड झाडाझुडपांची दाटी, काट्याकुट्यांनी व्यापलेले ठिकाण मानतो. हे फॉरेस्ट तसे नाही. या भागात जास्तीत जास्त पाऊस ४० इंच. तोही सर्व वर्षभर विभागून पडत असतो. उंच झाडे, जमिनीवर स्वच्छता भरपूर. क्वचित आढळणाऱ्या अस्वलाखेरीज त्रासदायक दुसरी श्वापदे नाहीत. देवदारखेरीज जंगलाच्या दृष्टीने महत्त्वाचे झाड म्हणजे स्प्रूस. पॉपरर व विलोडा. तीही रस्त्याच्या काठाने, कॅनाल किंवा सरोवरांच्या काठाने रांगारांगाने  उभी असतात. उपयोग आणि शोभा या दृष्टीने ही झाडे महत्त्वाची आहेत. माझ्या मताने वृक्ष म्हणून काश्मीरचे मानाचे असेल तर ते चिनारचे. समरकंदच्या भूमीतून काही शतकापूर्वी एका मुस्लीम राजाने हे झाड काश्मीरमधे आणले. सातशे वर्षे हे झाड जास्तीत जास्त जगू शकते असे मला सांगण्यात आले. हिरव्यागार फांद्यांचा डौलदार डोलारा घेऊन उंच झाड हलू लागले म्हणजे त्याच्या विस्तृत सावलीत बसलेल्या पांथस्थांना आपल्या डोक्यावर निसर्गाने खरोखरीची छत्र-चामरे धरली आहेत की काय असे वाटू लागते.

लोलावनंतर वुलर सरोवराला प्रदक्षिणा घालून आम्ही परतलो. वुलर सरोवर हे आशियातले ताज्या पाण्याचे पहिल्या प्रतीचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. याची लांबी १२ मैल व रुंदी ५ मैल आहे असे सांगण्यात येते. सकाळी ८॥ पासून संध्याकाळी ८ पर्यंत जवळ जवळ बारा तासांची ही भटकंती करून काश्मीर दर्शनचा एक भाग पुरा केला.

आता दुपारी परिषदेचे सूप वाजले. काही उद्याने आणि जवळपासची इतर ठिकाणे पाहून परत निघण्याच्या तयारीला लागले पाहिजे. येथील आमचे यजमान, मंत्री श्री. शामलाल सराफ यांनी सर्व प्रकारची व्यवस्था उत्तम ठेवली. त्यांचे मन:पूर्वक आभार मानले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org