विरंगुळा - ५३

येथे आलो त्यादिवसापासून माझा मुक्काम स्टेट गेस्ट हाऊस नं. ३ या ठिकाणी होता. आज दोन दिवसानंतर (७ जून १९५६) माझा मुक्काम स्टेट गेस्ट हाऊस नं. २ मध्ये सुरू झाला. ही बढती का मिळाली कोण जाणे? गप्पाटप्पा मारायला येथे शेजार खूपच चांगला आहे. बरेचसे मंत्री सहकुटुंब सहपरिवार आले आहेत. त्यामुळे हे 'घर' कसे अगदी गजबजून गेले आहे. पंजाबराव देशमुख येथेच सहकुटुंब उतरले आहेत.

लिहिण्यासारखे इथे इतके आहे की केव्हा लिहावे याचीच पंचाईत पडते. म्हणून जसजशी सवड होईल त्याप्रमाणे दैनंदिन स्वरूपाचे लिहिण्याचा प्रयत्न आहे. लिहिण्याच्या निमित्ताने तेवढाच चांगला वेळ जातो नाही का?

काल सकाळी म्हणजे ६ जूनला सकाळी न्याहरी करून लगेच येथून साठ मैलावर असलेल्या 'पहेलगाम' या ठिकाणी जाण्यासाठी निघालो. काश्मीर पहावयाचे म्हणजे फक्त श्रीनगर पाहून नाही चालायचे. श्रीनगरपेक्षाही अधिक उंचीवर असलेल्या पहेलगाम, सोनमर्ग, गुळमर्ग वगैरे ठिकाणांना जाऊन आल्याशिवाय काश्मीरचे पुरेसे दर्शन झाल्यासारखे होत नाही. हे पहेलगाम सात हजार फूट उंचीवर आहे. लिहार नदीच्या खोऱ्यात हे गाव आहे. तेथे पोहोचायला आम्हास दोन अडीच तास लागले. कधी मार्तंड कालव्याच्या कठावरून तर कधी विहार नदीच्या काठावरून वळसे घेत घेत सुंदर वनश्रीच्या गर्भातून हा रस्ता गेला आहे. या प्रवासाचा आनंद अनुभवल्याशिवाय समजणार नाही. पाऊस पडेल अशी धास्ती निघताना आम्हास वाटत होती परंतु हळूहळू सोनेरी उन्ह पडली. जणू दूधात साखर पडली. वाटेत मार्तंड तीर्थ लागले. स्वच्छ निळ्याभोर पाण्याचे कुंड देवतेसमोर आहे. ते पाणी प्राशन करून उमेदीने आम्ही पुढे निघालो.

खळखळ करीत नदीचे पाणी खाली जात असते. त्याच्या काठाने वृक्षराजीतून कर्णमधुर आवाज करीत असलेल्या पक्ष्यांचे संगत करीत आपण वरवर जात असतो. लांब हिमाच्छादित गिरीशिखरे दिसत असतात. कुणीतरी आपणाला वरवर चालवित आहे असे सारखे वाटते. या सूचक अनुभवाची बिजली जीवनांत नवचैतन्य देते. पहेलगामला चार तास काढले. माझ्या मानसिक यातना कुठल्या कुठे गुप्त झाल्या. फार वर्षांनी मला हा निर्भेळ आनंद घेता आला. उंच उंच पर्वतराजीच्या कोंदणात हे सुंदर ठिकाण आहे. बर्फाने आच्छादलेली त्यांची पांढरी शुभ्र शिखरे वर त्याच्या खाली नदी काठापर्यंत आलेली उंच उंच झाडांची मनोहर दरी, खळखळ करीत जाणारा स्वच्छ असा नदीचा प्रवाह आणि त्याच्या काठावर हिरव्यागार छोट्या पठारावर लहान लहान तंबू टाकून आरामात राहणाऱ्या प्रवाशांची छावणी. डोळे भरून हे दृश्य मी पाहून घेतले व डोळे झाकून काश्मीरच्या या वातावरणाचे चित्र मनावर कोरून ठेवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी पूर्व विहार आणि पश्चिम विहार या दोन प्रवाहांचा संगम होतो. पूर्व विहाराच्या काठाने पुढे पुढे गेले तर २८ मैलावर अमरनाथचे प्रसिद्ध शिखर लागते. पण हा प्रवास तीन दिवस करावा लागतो. केव्हातरी हा प्रवास केला पहिजे. पुढची गोष्ट पुढे!

नदीच्या काठी दुपारचे जेवण करून आम्ही तीन वाजता परतलो. येताना वाटेत 'अनंतनाग' येथील कुंडे व अचलबाग ही ठिकाणे पाहून ५॥च्या सुमारास या 'घरी' आलो. परत ७॥ वाजता दाल सरोवराकाठी फिरण्यासाठी पायाने गेलो. 'शिकारा' म्हणून छोटीशी नाव असते त्यातून तास-दीड तास भटकलो. दिवसाचा कार्यक्रम पुरा केला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org