विरंगुळा - ४०

२४ जानेवारी

दुसरे दिवशी सकाळी ७ वाजता परत प्रवास सुरू. १२ वाजता साताऱ्याला पोहोचलो. श्री. मोरारजीभाईंना पोहोचण्यास अवधी आहे म्हणून समजताच श्री. भाऊसाहेब सोमणांचे घरी जाऊन खूप गप्पा मारल्या. श्री भाऊसाहेब जलमंदिर प्रकरणाखेरीज दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलतच नाहीत.

दुपारचे जेवण सातारच्या राणीसाहेब यांचेकडे अदालत वाड्यावर घेतले. मी आज त्यांना प्रथमच पाहिले. आपल्या चार पुत्रांसह त्या हजर होत्या. जुन्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरील त्यांची कारुण्यपूर्ण मूर्ती पाहून माझे शिर आदराने विनय झाले.

मोरारजींचे कार्यकर्त्यांच्या बैठकीतील भाषण आणि उत्तरे निराशाजनक झाली. कार्यकर्त्यांना इतक्या कटुतेने व संशयाने वागविणे बरे नव्हे. काय करावे? संध्याकाळच्या सभेत मात्र बरे बोलले. भाषावार प्रांतरचनेचा त्यांनी भीतभीतच उल्लेख केला परंतु तो संयमपूर्ण होता. रात्री ते पुण्यास गेल्यावर जिल्हा बोर्डाच्या दिवाणखान्यात कार्यकर्त्यांची चर्चा झाली. खूप उपयुक्त आणि महत्त्वाचे मुद्दे चर्चेसाठी निघाले. ज्या सिद्धांतासाठी काँग्रेसचे अस्तित्व रहावे असे आपण मानतो त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची कितपत ज्वलंत श्रद्धा आहे हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही पक्षांची वाताहात अपयशाने होते परंतु काँग्रेस पक्षाची वाताहात त्या पक्षाला मिळालेल्या प्रचंड यशामुळे होणार की काय अशी भीती मनात येऊन जाते वगैरे विचार आज मी कार्यकर्त्यांपुढे ठेवले.

आज २५ जानेवारी श्री. भाऊसाहेब सोमण यांना बरोबर घेऊन सकाळी सांगलीत पोहोचलो. ठरल्या वेळेपेक्षा अर्धा तास आधीच गेल्यामुळे सर्वच गडबड झाली. दुपारच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनात माझे खरे मन रमले. रात्री ९ वाजता सांगलीहून निघालो. वाटेत तासभर कराडात घरी थांबलो. आईला तेवढाच आनंद झाला. परंतु लगेच एक तासाने मी मुंबईला जाणार हे कळताच बिचारीला किती वाईट वाटले. रात्री बारा वाजता कराड सोडले. रात्रभर मोटारीने प्रवास करून पहाटे ५॥ वाजता मुंबई गाठली.
------------------------------------------------------------

२६ जानेवारी

मुंबईत पोहोचताच समजले की श्री. किडवाई आजारी असल्यामुळे त्यांनी आपला पुढचा दौरा रहित केला असून त्यांचा मुक्काम अजून मुंबईतच आहे. सकाळची परेड आणि दुपारनंतरचा at home नेहमी सारखाच झाला. संध्याकाळी श्री. किडवाई यांना भेटलो. प्रकृती बरी आहे. उद्या फ्राँटियरने दिल्लीला जाणार म्हणाले. गव्हाच्या दरासंबंधी व दुष्काळग्रस्त भागासाठी मिळणाऱ्या स्वस्त गव्हाच्या मदतीसंबंधी श्री. चिंतामणराव देशमुख (अर्थमंत्री) यांनी काही अडचणी उपस्थित केल्या आहेत असे समजले. देशमुखांचे हे अडसर घालण्याचे धोरण थांबले का?
------------------------------------------------------------

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org