विरंगुळा - २६

मंत्रीपद मिळाल्यानंतर मुंबईत त्यांना स्वतंत्र बंगला मिळाला. त्यापूर्वी चार पाच वर्षे मरिन ड्राइव्ह भागात एका मित्राच्या खोलीत मुक्काम करून होते. मलबार हिल भागात मंत्र्यांसाठी राखीव असलेल्या 'ऐरी' या बंगल्यात वास्तव्य करण्याचे निश्चित झाले तेव्हा वेणूबाईंना त्यांनी मुंबईत आणण्याची व्यवस्था केली. आई, वडील-बंधूंची मुले अन्य कुटुंबीय यांना कराडात रहावे लागले. पत्नी कराडात किंवा मिरजेत औषधोपचारासाठी असताना तिच्याशी ते पत्राद्वारे संवाद करीत असत. पत्नीला मुंबईत आणल्यानंतर तीच प्रथा राहिली.

१९५२ च्या सप्टेंबरमध्ये इंदोर येथे अ. भा. काँग्रेस कमेटीची बैठक होती. या बैठकीला उपस्थित राहाण्याच्या निमित्ताने त्यांचा दौऱ्यास प्रारंभ झाला. इंदोर येथील 'माणिक भवन' येथे त्यांची मुक्कामाची व्यवस्था झालेली होती. तेथून त्यांनी वेणूबाईंना लिहिलेले पत्र आहे.

माणिक भवन, इंदोर
१३ सप्टेंबर १९५२

इंदोर या गावात एक दिवस राहिल्यावर आता हे आपलेच गाव आहे असे वाटू लागले आहे. ज्या ठिकाणी माझी राहाण्याची व्यवस्था केली आहे ते एक इथले मीलमालक आहेत. त्यांचे दोन चिरंजीव ए. आय. सी. सी. चे जे पाहुणे त्यांच्याकडे उतरले आहेत त्यांची व्यवस्था पाहण्यात फारच रस घेतात. श्री. राजेन्द्रकुमार शेट्टी हे ज्येष्ठ चिरंजीव बरेच शिक्षित आणि माणसात मिसळणारे गृहस्थ आहेत. आपली तुंदिल तनु सावरीत सारीत जी मारे गडबड करीत असतात ती काही विचारू नका. हिंदी भाषेतच मुळी आदरातिथ्य फार आहे. त्यात असा आदरातिथ्यशील यजमान भेटल्यानंतर नुसती भाषा ऐकूनच पोट भरेल. एकंदरीत इथलं वातावरण एकदम चांगलं आहे.
 
आज सकाळी श्री. टोणपे, मी व एल. जी. पाटील येथून ४५ मैलावरील उज्जैन शहर पाहण्यासाठी गेलो. विक्रमादित्याची ही ऐतिहासिक 'अर्वाचिन' नगरी पहावी अशी कित्येक दिवसांची मनीषा फार दिवसांनी पूर्ण होणार या कल्पनेनेच केवढा आनंद झाला होता. जाता जाता वाटेवरच असलेले देवास, आपल्या कोल्हापूरच्या आक्कासाहेबांची सासुरवाडी पाहिली.

इंदोरभोवती मराठी इतिहासात प्रसिद्ध असलेल्या शहरांचा जणू पुंजकाच आहे. येथून अगदी जवळच 'धार' आहे. मांडवगड आहे पण ही सर्व पाहणे काही शक्य दिसत नाही. हो, पण उज्जैनची कथा तशीच राहिली. किती अपेक्षेनं मी या शहरात गेलो आणि किती भयानक निराश झालो म्हणतेस! मी शाळेत विद्यार्थी दशेतच कालिदासाचे 'मेघदूत' वाचीत होतो. त्यावेळी यक्षाचा निरोप घेऊन निघालेला मेघ जेव्हा उज्जैन शहरावर येईल तेव्हा क्षिप्रा तटाशी काय काय दिसेल याचे भावमनोहर केलेले वर्णन मनाशी अजून ताजे आहेत. वेडेपणाने ते काव्यातले वर्णन मनात ठेवून अलिकडच्या बकाल शहरात मी अपेक्षापूर्तींच्या आशेने पाऊल ठेवले तर शेवटी निराशा होणार यात काय संशय! कापूस बाजाराचे एक प्रमुख केंद्र हे उज्जैनीचे आजचे खरे रूप! बारा ज्योतिर्लिंगापैकी एक 'कालेश्वर' येथे आहे. त्याचे दर्शन घेतले. मौगली राज्यातील राजा जयसिंह यांनी त्यावेळी बांधलेली 'वेधशाळा' येथे आहे ती पाहिली आणि क्षिप्रा नदीच्या घाटावर जाऊन भिक्षुकांची व 'कारागिरांची' गर्दी पाहून परत निघालो. काव्यातली आणि इतिहासातील 'वांगी' काव्यात आणि इतिहासातच ठेवणे इष्ट असा नवा धडा आज शिकलो म्हटले तरी हरकत नसावी.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org