विरंगुळा - २३

मुंबई
२६-८-१९४९

मिरजेचे सामान पुण्यास आणण्यास कसलीच हरकत नाही. परंतु कराडहून दुसऱ्याचे कोणाचे सामान आणलेले असल्यास ते परत करावे. त्यातील मिरजेच्या सामानात काही अपुरे वाटले तर कळवा म्हणजे ते इकडून आणता येईल. हे एकदा नक्की झाले म्हणजे फक्त कपडे घेऊन मी पुण्यास येईन, तेथील काम संपवून उशिरात उशिरा ता. ७ पर्यंत मिरजेस येईन. त्याच दिवशी मिरज सोडू. पैशासाठी मी एकाला लिहीत आहे. परंतु अदमासे एकंदर पैसे किती लागतील ते मात्र कळवा म्हणजे बरे.
-यशवंतराव

मिरज शहराच्या बाहेर माळावरील मोकळ्या हवेशीर जागेत क्षयरोग रुग्णांसाठी रहाण्याची व्यवस्था होती. एक लहानगी खोली, रुग्णाला विश्रांतीसाठी लोखंडी पलंग एवढेच तेथे होते.

यशवंतराव हॉस्पिटलमधील या खोलीत कॉटवर (पलंग) बसले तेव्हा वेणूबाईंनी प्रकृतीची एकूण अवस्था सांगितली. डॉक्टरांनी यापुढे संतती होण्याचा संभव नाही याची त्यांना कल्पना दिलेली होती तेही त्यांनी पतीला सांगितलं. यशवंतराव स्तब्ध होते. वेणूबाईंनी त्यांना सुचविलं की तुम्ही तरुण आहात. तुम्हाला वंशाला दिवा असला पाहिजे. त्यासाठी तुम्ही दुसरं लग्न करा.

यशवंतरावांची स्तब्धता ढळली नाही हे लक्षात येताच वेणूबाईंनी पुन्हा तेच काहीशा आग्रहानं सांगितलं.

''मला वंशाच्या दिव्याची आवश्यकता नाही. येथून पुढे तुला मी आणि मला तू. हा विषय इथे बंद.'' यशवंतराव एवढेच बोलले.

१९८३ च्या जूनपर्यंत म्हणजे वेणूबाईंचं निधन होण्याच्या क्षणापर्यंत हे दोघे एकमेकांसाठी जगले.
यशवंतरावांच्या सोबत त्यावेळी सुरक्षा अधिकारी म्हणून एक जमादार होते. खोलीच्या दारात उभा असलेला तो हे सर्व ऐकत होता. वेणूबाईंचं निधन झाल्याची बातमी वाचल्यावर यशवंतरावांना त्यांनी सांत्वनाचं पत्र लिहून- ''त्या वेणूबाई तुम्हाला सोडून गेल्या. तुमच्या मनस्थितीची कल्पनाच करता येत नाही.'' असं पत्रात नमूद केलं. सांत्वनाची सर्व पत्रं मी वाचली तेव्हा हे उमजलं.

आमदारकी प्राप्त होऊन तीन-चार वर्षं उलटली तरी प्रकृती ढासळलेल्या पत्नीला दवाखान्यातून घरी परत आणण्याच्या वेळेस खर्चासाठी कोणाकडे तरी पैशाची मागणी करावी लागावी यापरते अन्य मानसिक दु:ख ते कोणतं! हे सारं दु:ख, अवमान त्यांनी आजन्म मनाच्या कप्प्यात ठेवलं. त्याचा उच्चार केला नाही किंवा गरिबीचं भांडवल केलं नाही. इतकंच नव्हे तर सर्वसामान्य माणसांबद्दल, कुटुंबांबद्दल, त्यांच्या ओढाताणीच्या परिस्थितीबद्दल मनात कणव बाळगली आणि दैन्यावस्थेतून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. माणसाकडे माणूस म्हणून पाहिलं आणि वागविलं. चव्हाण कुटुंबाची हलाखीची स्थिती असूनही यशवंतरावांच्या मातोश्रींनी श्रीमंत मनानं माणुसकीचा दृष्टिकोन जपण्याचा सतत प्रयत्न केला. त्यातूनच यशवंतरावांना स्वत: जगावं आणि जगवावं कसे याचे धडे मिळालेले असावेत. जगण्याची आणि जगविण्याची ही भूमिका, ते उच्चासनावर आरूढ झालेले असले तरी शाबूत राहिली. अर्थातच हे देणं जन्मापासून लाभलेल्या संस्काराचं!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org