विरंगुळा - २१

येरवडा कारागृहात यशवंतरावांना त्या काळात अच्युतराव पटवर्धन, आचार्य नरेन्द्र देव, युसुफ मेहेरअली, आचार्य भागवत, एस्. एम्. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, बॅ. बाळासाहेब खेर असा अनेकांचा सहवास घडला. बौद्धिके ऐकली. ग्रंथवाचन केलं. पाश्चात्त्य विद्वानांनी लिहिलेले विविध विषयावरील ग्रंथ समजून घेतले. स्वातंत्र्य कोणासाठी, कशासाठी या अभ्यासानं वैचारिक पिंड तयार झाला. कारागृहात ज्या ग्रंथांचं वाचन केलं त्यातील अभ्यासपूर्ण विचार, निष्कर्ष यांची स्वतंत्रपणे नोंद करून ठेवली. सावरकरांचे 'कमला' काव्य आचार्य भागवत यांनी दोन-तीन दिवस विस्तृत विवरण करून सांगितल्याची या टिपण वहीत नोंद आहे. महत्त्वाच्या विचारांची, निष्कर्षांची, प्रतिक्रियांची नोंद करण्याचा त्यांचा परिपाठ पुढे दीर्घ काळपर्यंत त्यांनी कायम राखला. यातील काही नोंदी पत्ररूपात आहेत. अनेकविध घटनांचा तपशील क्रिया-प्रतिक्रियांसह लिहून ठेवलेला त्यांचा हा हस्तलिखिताचा खजिना आहे. शिवाय या दस्तऐवजाला ऐतिहासिक महत्त्व आहे. पक्षाच्या अधिवेशनासाठी, कार्यकारिणीच्या बैठकीसाठी, श्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी त्यांना नेहमीच दौरे करावे लागले. मंत्रीपद स्वीकारल्यावर शासकीय कामांसाठी, परिषदांसाठी, एखाद्या जिल्हाप्रश्नाचे गांभीर्य आजमावण्यासाठी संपूर्ण देशात दौरे झाले. पुढच्या टप्प्यात जोखमीच्या कामासाठी पृथ्वीपर्यटन झालं. या प्रत्येक दौऱ्याच्या वेळी, कुठे गेलो, कोण भेटलं, काय चर्चा झाल्या याचा तपशील पत्नी वेणुबाई यांना सविस्तर पत्रं लिहून नोंद केलेला आहे. तर काही महत्त्वाच्या नोंदी स्वतंत्रपणे डायरीत किंवा वहीत लिहिलेल्या आहेत.

१९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यशवंतरावांना कराड तालुक्याची उमेदवारी मिळाली. मतदारांनी त्यांना भरघोस पाठिंबा देऊन निवडणुकीत विजय संपादन करून दिला. आमदार म्हणून मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री बॅ. बाळासाहेब खेर यांनी त्यांचा मंत्रिमंडळात सामावेश केला नाही. पार्लमेंटरी सेक्रेटरीपद त्यांना दिलं.

मुंबईत वास्तव्य झालं परंतु मर्यादित उत्पन्न, आर्थिक चणचण यामुळे सर्व कुटुंबियांचं पोषण मुंबईत करणं अशक्य ठरल्यानं त्यांनी सारा कुटुंब कबिला कराडातील घरात ठेवला. थोरले बंधू राजकीय आंदोलनात सहभागी झाल्यानं तुरुंगात होते. तेथील छळामुळे शरीर प्रकृतीवर अनिष्ट परिणाम झाला. १९४५ मध्ये कारावासातून मुक्त होऊन ते परतले आणि क्षयाने त्यांना पछाडलं. त्या काळात क्षयरोगावर रामबाण औषधं उपलब्ध नव्हती. मिरजेतील दवाखान्यात उपचार झाले पण रोगानं बळी घेतला. सौ. वेणुबाईंना त्यांची शुश्रुषा करावी लागली. त्या संसर्गाने सौ. वेणुबाई क्षयरोगाच्या रुग्ण बनल्या. मिरजेत त्यांच्यावरही उपचार झाले. एका अमेरिकन डॉक्टरने उपचार केल्याने त्या बचावल्या परंतु दोन्ही फुफ्फुसे निकामी बनली. संतती होण्याची आता शक्यता नाही असा डॉक्टरांनी निर्वाळा दिला. १९४५ मध्ये त्यांनी कन्यारत्नाला जन्म दिला होता. परंतु ती बालिका दहा दिवसातच देवाघरी गेली. यशवंतराव बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत असताना त्यांचा ठावठिकाणा समजावा यासाठी पोलिसांनी वेणुबाईंना अटक करून दोन महिने तुरुंगात डांबलं होतं. त्याचा परिणाम प्रकृतीवर झालेलाच होता. त्यानंतरची प्रसूती आणि थोरल्या दिराची शुश्रुषा यामुळे क्षयरोगाने त्यांचे शरीर पोखरले. कुटुंबपोषण आणि औषधांसाठी करावा लागणारा खर्च यामुळे यशवंतरावांची आर्थिक ओढाताण सुरू होती त्याचं दर्शन १९४६ ते १९५२ या काळात त्यांनी वेणुबाईंना लिहिलेल्या पत्रातून घडतं. कधी एकवेळ जेवणं, कधी मित्राच्या डब्यातील अर्धा भाग खाणं, कधी मित्राकडे भोजनासाठी जाणं अशा अवस्थेत त्यांनी आमदार आणि पार्लमेंटरी सेक्रेटरी असतानाचे दिवस ढकलले.

श्री. नानासाहेब कुंटे हे त्यावेळी सभापती होते. त्यांना कोणाकडूनतरी या आमदाराची हलाखी आणि एकूण स्थिती माहिती झाली असावी. त्यांनी एक दिवस यशवंतरावांना घरी बोलावलं आणि भोजनासाठी माझ्याकडे आलं पाहिजे असं सांगितलं. यासंबंधी यशवंतरावांनी पत्रात उल्लेख केला आहे. तो असा-

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org