विरंगुळा - १५

यशवंतरावांनी स्वत: लिहिलेले ग्रंथ आणि त्यांच्यासंबंधी अभ्यासकांनी लिहिलेले ग्रंथ एकत्र स्वरूपात विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना उपलब्ध व्हावेत यासाठी ग्रंथालयात स्वतंत्र 'यशवंत अभ्यास कक्ष' निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. यशवंतरावांची स्मृती जिवंत आणि जागृत रहावी यासाठी व्याख्यानं, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून चव्हाण व्यक्तिमत्त्व नव्या पिढीत रुजविण्याचं कार्यही संस्थेनं अंगिकारिलं आहे. 'विरंगुळा'च्या पाठीशी हे सर्व यशवंतप्रेमी आहेत याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे.

व्यक्तिगत सहाय्यासाठी अनेक सुहृदांनी तयारी दर्शविली. हातभार लावला. इतका की, देता किती घेशिल दो कराने अशी अवस्था निर्माण केली. ज्येष्ठ साहित्यिक, ग्रंथकार, माझे साठ वर्षांपासूनचे मित्र व सहकारी श्री. भा. द. खेर यांनी ग्रंथाची संहिता वाचली, ऐकली आणि उपयुक्त सूचना केल्या उभारी दिली. बाबूराव राशिनकर, अनिल जोशी यांनी हेच केले. श्री. राजेंद्र खेर यांनी आपुलकीने लक्ष घातले आणि ग्रंथ निर्मितीसाठी 'जंगम ऑफसेट' या पुण्यातील अद्ययावत छपाई सामग्रीने सुसज्ज असलेल्या प्रेसची जोडणी करून दिली. ग्रंथ निर्मितीचं काम सुरू झालं तेव्हा जंगम ऑफसेटचे श्री. सदाशिवराव, महेश जंगम यांनी 'विरंगुळा' ग्रंथ सौंदर्यपूर्ण, देखणा व्हावा असं आव्हान स्वीकारल्याचंच प्रत्ययास आलं. दर्जेदार, सुबक छपाईसाठी त्यांनी जातीनं देखरेख केली. ग्रंथनिर्मितीचं सारं श्रेय या पिता-पुत्रांचं.

'विरंगुळा'तील साहित्य हे यशवंतरावांच्या सिद्धहस्त लेखणीचं साहित्य. त्याचं मूल्यमापन तेवढ्याच प्रथितयश लेखणीनं व्हावं ही स्वाभाविक इच्छा. प्रा. ग. प्र. प्रधान यांनी नेटकेपणानं, नेमकेपणानं ही इच्छा प्रस्तावना लिहून पूर्ण केली. वानप्रस्थाश्रमात असणाऱ्या प्रा. प्रधान यांनी पहिल्या भेटीतच प्रस्तावना लिहिण्यास मान्यता दिली. ग्रंथसंहितेची मुद्रिते अथपासून इतिपर्यंत त्यांनी किती तपशिलाने आणि आत्मियतेनं वाचली, अभ्यासली याचं प्रत्यंतर त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत मिळतं. एका बैठकीत लेखनाचं काम पूर्ण केलं असं त्यांनीच सांगितलं. अवघ्या चार दिवसात त्यांनी प्रस्तावनेचं काम तडीस नेलं. वयाच्या ८५व्या वर्षातील त्यांची ही तडफ आणि लेखनातील तल्लीनता तरुण पिढीला अंतर्मुख बनविणारी अशीच आहे. 'साधना' साप्ताहिकाचे संपादन करणारे, समाजनिष्ठ, राजकारण धुरंधर, विचारवंत, सिद्धहस्त ग्रंथलेखन आणि साधनशुचिता कटाक्षानं जतन करणारे ग. प्र. प्रधान यांची 'विरंगुळा'साठी लाभलेली प्रस्तावना म्हणजे ग्रंथाचा कळसाध्याय म्हटला पाहिजे. त्यांनी निरंतरचे उपकृत केले आहे. ग्रंथविक्रेते, वाचनालयं, ग्रंथालयं आणि सामान्य वाचकांपर्यंत हे पुस्तक पोचविण्याची जबाबदारी प्रमुख वितरक रसिक साहित्य प्रा. लि. या मान्यवर संस्थेचे श्री. मोरेश्वर आणि योगेश नांदुरकर यांनी उचलली त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org