विरंगुळा - १२

मन:पूर्वक कृतज्ञता

स्वातंत्र्योत्तर पहिल्या तीस वर्षांत श्री. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात आणि केंद्रस्थानी दिल्लीत सत्तेची उच्च स्थाने भूषविली. तीस वर्षांच्या कालखंडात राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेकविध घटना घडल्या. अटीतटीचे प्रसंग निर्माण झाले. यामध्ये यशवंतरावांच्या कौटुंबिक प्रसंगांचाही समावेश आहे. घटना आणि प्रसंग, ह्या संबंधीच्या सर्व क्रिया-प्रतिक्रिया त्यांनी स्वहस्ते लिहून ठेवले. या लेखनाला केवळ टिपणे असे स्वरूप नाही. ते सर्वस्पर्शी आहे. सामाजिक, राजकीय जीवनाला स्पर्श करणारे आहे. हा साहित्य ऐवज अप्रकाशित राहिला. लिहिलेले प्रसिद्ध झाल्याचे, ग्रंथबद्ध झाल्याचे यशवंतरावांना पहाता आले नाही. तसा योगायोग नसावा! 'विरंगुळा' या ग्रंथातून त्यांनी लिहिलेले साहित्य, त्यांच्या पश्चात, वीस वर्षांनंतर प्रकाशात येत आहे.

यशवंतराव राजकीय नेते होते. उच्च सत्ताधारी होते. याहीपेक्षा त्यांची वाणी प्रभावी होती, स्पृहणीय होती आणि लेखणीचा संचार कौतुकास्पद होता. त्यांच्या वाणीचा विलास नित्य होत राहिला. त्यामानाने लेखणी क्वचित चालविली. परंतु जेव्हा चालविली तेव्हा अशा काही उत्कृष्ट दर्जाचं साहित्य त्यांच्या लेखणीनं निर्माण करून ठेवलं की वाचक थक्क होऊन जातो. राजकारण आणि राज्यकारभार याची धुरा त्यांनी खांद्यावर घेतली परंतु त्यांच्या मनाला खरं आकर्षण हे साहित्याचं आणि कलांचं होतं. यशवंतरावांचं पडलेलं भाषण जसं कुणी ऐकलं नाही त्याचप्रमाणे त्यांचा पडलेला लेख कधी वाचला नाही असा निर्वाळा ज्येष्ठ आणि प्रथितयश साहित्यिक प्रा. ना. सी. फडके यांनी लिहून ठेवला आहे.

यशवंतरावांच्या ठायी सूक्ष्म दृष्टी आहे. मुद्देसूद भाषण करतात. मोठा आशय वेचक शब्दांत थोडक्यात मांडतात. त्यात नवीन विचारांना प्रेरणा देणारा मुद्दा असतो. साहित्याची उत्तम आवड आहे. जेव्हा लिहितात तेव्हा त्यामध्ये त्यांच्या ठिकाणचे गुण प्रतिबिंबित झालेले दिसतात. हा अभिप्राय आहे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचा.

'विरंगुळा' च्या वाचकांना यशवंतरावांचं साहित्यिक नैपुण्य ठायी ठायी भेटणार आहे. याचं कारण ते लेखन सर्वस्पर्शी आहे. जीवनाच्या विविध अंगांचा वेध ते घेत आहेत असं जाणवतं. यशवंतरावांचे जीवन एकारलेलं नसल्याचा शोध त्यांच्या लेखणीतून मिळतो. सुसंस्कृतपणा व्यक्त होतो. त्याचबरोबर सर्व क्षेत्रांविषयी त्यांच्या ठिकाणी स्वाभाविक सहानुभुती असून सहानुभूती बाळगण्याइतपत त्यांचं व्यक्तिमत्त्व विशाल व व्यापक असल्याचं त्यांच्या लेखणीतून उमटलेले शब्दच सांगतात. त्यांच्या या लेखनात बुद्धीचं विलक्षण चातुर्य प्रत्ययास येतं.

यशवंतरावांचं हे हस्तलिखित, साहित्यिक ऐवज त्यांनी सन १९८४ मध्ये दिल्लीत माझ्याकडे सुपूर्त केला, त्यावर चर्चा केली. तेव्हापासून हे सर्व प्रकाशात यावं हा सुविचार मनात मूळ धरून राहिला. योगायोगावर कोणाचा विश्वास असो-नसो, परंतु वीस वर्ष अंधारात असलेल्या, अप्रकाशित राहिलेल्या या साहित्याला प्रकाश दिसला हा निव्वळ योगायोग!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org