विरंगुळा - ११५

भैरवी

यशवंतरावांनी सन १९३० मध्ये कराडात टिळक हायस्कूलच्या आवारातील झाडावर तिरंगा फडकावून स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली त्यावेळी देशाला पारतंत्र्यातून मुक्त करणे हे एकच ध्येय त्यांच्यासमोर होते. अन्य कसलाही संकल्प नव्हता. भारताचे स्वातंत्र्य अद्याप दूर होते त्यामुळे कांही संकल्प करून राजकारणात उतरण्याची परिस्थितीच नव्हती. नंतरच्या टप्प्यातही, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, विशिष्ट हव्यास धरून त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली नाही.

सौ. वेणूबाईना सन १९७५ मध्ये माँटेगो बे (जमेका) येथून लिहिलेल्या चिंतनपत्रात त्यांनी स्वहस्तेच नमूद केले आहे की, ''सत्तेच्या तीस वर्षात मी काही नव्या स्थानाची महत्त्वाकांक्षा धरली होती हे म्हणणे खरे नाही, किंवा त्यासाठी कुणाच्या पाठीमागे लाचारीने लागलो असेही नाही. परंतु जबाबदारी आली तेव्हा मागे फिरून पाहिले नाही. योजून एखादी सत्तेची जागा हस्तगत करावयाची असे मी कधीच केले नाही. पण वस्तुस्थिती आहे की, सातत्याने तीस वर्षे सत्तास्थानावर आहे.''

योजनापूर्वक पंतप्रधानपद हस्तगत करण्याचा त्यांचा संकल्पच नसल्याने उपपंतप्रधान पदानंतरचे पंतप्रधानपद हुकले म्हणून ना खेद ना खंत! सत्तेचा उपयोग जाणीवपूर्वक समाजाच्या परिवर्तनासाठी करावयाचा हा संकल्प मात्र त्यांनी केला होता. तो त्यांनी मन:पूर्वक अखेरपर्यंत सांभाळला.

सत्तासंपादनासाठी संकल्प करण्यापासून ते अलिप्त राहिले पण आपल्या जीवन चरित्राचे तीन खंड प्रकाशित करण्याचा संकल्प त्यांनी केला होता. तथापि संकल्प आणि सिद्धी हे द्वंद्व त्यांच्याबाबतीत कायम राहिलं. जीवनचरित्र्याच्या तीनही खंडांची रूपरेषा तयार करून ठेवली होती. सन १९८३-८४ च्या डिसेंबर-जानेवारीत एक महिना, दिल्लीत १ रेसकोर्स रोड या त्यांच्या बंगल्यात मी त्यांच्या सहवासात मुक्कामाला होतो. सौ. वेणूताईंचे चरित्र त्यांच्या पहिल्या 'पुण्यतिथीस', १ जून १९८४ला प्रसिद्ध करण्याचा त्यांचा मानस होता. चरित्र लेखनाची जबाबदारी मी स्वीकारली आणि सविस्तर चर्चेसाठी दिल्लीला गेलो होतो. त्यावेळी त्या तीन खंडापैकी पहिला 'कृष्णाकाठ' खंड लिहून झालेला होता. १९८३च्या दरम्यान सत्तेच्या राजकारणातून ते कांहीसे अलिप्त होते. लेखनासाठी फुरसद मिळाली तेव्हा वेणूताईंनी त्यांना लेखनाची प्रेरणा दिली. १९८३ मध्ये त्यांनी पहिल्या खंडाचा श्रीगणेशा केला आणि त्या सालातच संकल्पाची सिद्धी केली. जे काही अक्षरबद्ध झाले त्याच्या पहिल्या वाचक सौ. वेणूताई होत्या. पहिल्या खंडासाठी त्यांनी जन्मापासून १९४६ पर्यंतचा म्हणजे १९४६ची पहिली विधानसभा निवडणूक जिंकून मुंबईत आमदार (पार्लमेंटरी सेक्रेटरी) म्हणून पोहोचेपर्यंतचा तेहतीस वर्षांचा कालखंड समाविष्ट केला. या कालखंडातील काही घटना, प्रसंग याच्या काही प्रमाणात वेणूताई साक्षीदार-साथीदार असल्यानं, लेखनांत परदर्शकता निर्माण होण्याच्या दृष्टीनं वेणूताईंचं वाचन आणि मार्गदर्शन मोलाचं ठरलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org