विरंगुळा - ११४

पंतप्रधान आणि उपपंतप्रधान यांचा शपथविधी झाला. त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता श्री. चरणसिंग स्वत:च १ रेसकोर्स रोड, या यशवंतरावांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या रचनेसंबंधी चर्चा करण्यासाठी दाखल झाले. मंत्रिमंडळात काँग्रेस पक्षाचे किती कोण असावेत यासंबंधी प्रामुख्याने चर्चा करावी लागणार होती. उपपंतप्रधानपदी यशवंतराव असल्याने काँग्रेस पक्षियांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. शपथविधी सोहळा संपवून यशवंतराव बंगल्यावर येताच काँग्रेस इच्छुकांची रीघ सुरू झाली. त्या सर्वांना त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अनुमती मिळविण्यासाठी पाठविले. इंदिरा गांधी या सर्वेसर्वा असल्याने त्यांच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळाची रचना करण्याचे यशवंतरावांनी निश्चित केले होते. चरणसिंग यांच्याशी झालेल्या चर्चेतही त्यांनी हीच भूमिका ठेवली. पक्षाची म्हणून काही शिस्त असते आणि शिस्तीचे पालन जबाबदार व्यक्तीने करावेच लागते ही त्यांची भूमिका.

चरणसिंग मंत्रिमंडळ विचार विनिमयानंतर अस्तित्वात आले, राज्यकारभार सुरू झाला. काँग्रेसच्या पठिंब्याने सर्व काही सुरळीत सुरू राहील असे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे दिसत असतानाच काँग्रेसच्या वरिष्ठ गोटात वेगळ्याच हालचाली होत राहिल्या. चरणसिंगाना पाठिंबा देण्याचे धोरण अवलंबिले गेले त्यावेळी चरणसिंगाना विशिष्ट कालावधीपर्यंत कारभार करण्यास मुभा द्यावयाची आणि एक दिवस त्यांना पायउतार होण्यास भाग पाडून केंद्रीय सत्ता काँग्रेसकडे घ्यावयाची असा मनसुबा ठरला होता. तसे घडले असते तर उपपंतप्रधान असलेले यशवंतराव पंतप्रधान पदावर आरूढ होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली होती. दिल्लीत तशी कुजबुज ऐकिवात येत होती. परंतु अचानक एक दिवस काँग्रेसच्या वरिष्ठांनी चरणसिंगांचा पाठिंबा काढून घेतला. चरणसिंगांचे मंत्रिमंडळ कोसळले! 'दिल्लीची चालच तिरपी' या यशवंतरावांच्या अनुभवाचा प्रत्यय आला. महाराष्ट्राचा नेता पंतप्रधान बनण्याची संधी पुन्हा एकदा निसटली.

(यशवंतराव मरहट्टे आहेत. कुशल प्रशासक आहेत. मुत्सद्दी राजकारणी आहेत. चारित्र्यसंपन्न आहेत. ते प्रमुख सिंहासनावर आरूढ झाले म्हणजे कोणी कितीही युक्त्या प्रयुक्त्या केल्या तरी त्या पदावरून त्यांना हटविणे शक्य होणार नाही या विषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची समजूत करून देण्यात आल्याचे दिल्लीत बोलले जात होते.)

या कुजबुजीविषयी यशवंतरावांना विचारले असता, 'तसे असेलही कदाचित पण मला त्याची कल्पना नाही. पक्षाने निर्णय केला, तो मी तंतोतंत पाळला एवढेच मी सांगेन.' असा खुलासा करून मोकळे झाले. आणखी खोदून विचारले तेव्हा ''नेता म्हणविणारा जो कोणी असेल त्याचा केवळ देह सोन्याचा असून भागत नाही, कानही सोन्याचे असावे लागतात. कान पितळेचे असतील तर घोटाळा होतो.'' हा निष्कर्ष ऐकविला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org