विरंगुळा - ११०

विदेश-व्यवहार खात्याचा कारभार स्वीकारल्यानंतर पुढच्या सहा-सात महिन्यातच पंतप्रधानांनी देशात आणीबाणी पुकारल्याने संपूर्ण देशात आणि विदेशातही एक वेगळं वातावरण निर्माण झालं. भारतातील आणीबाणीचे पडसाद, परदेशस्थ भारतीय नागरिकांमध्ये तीव्रतेने उमटले. यशवंतरावांना त्यांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं. सामंजस्याच्या भूमिकेतून राजकारणात कृतिशील असलेल्या यशवंतरावांना आणीबाणी मानवणारी नव्हती. केंद्रीय मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेत्यांना आणीबाणी मान्य नव्हती. परंतु याबाबत काही ठोस मार्गाचा अवलंब करणे किंवा स्पष्ट शब्दात नाराजी दर्शविण्याइतपत परिस्थिती अनुकूल राहिलेली नव्हती. काही दुय्यम दर्जाचे आणि लाचार असलेले मंत्रिमंडळातील सदस्य आणीबाणीची तळी उचलून धरताना लोकांनी पाहिले.

विदेशव्यवहार खात्याचे काम करीत असताना आणि परदेश दौऱ्यावर निघण्यापूर्वी पंतप्रधानांच्या भेटीत, देशातील आणीबाणीची स्थिती संपवावी, लोकशाहीचे निखळ वातावरण निर्माण करावे, हवा मोकळी करावी असा सल्ला यशवंतराव आवर्जून देत असत. हा प्रयत्न अर्थातच एकाकी असावयाचा. पंतप्रधान यास विरोध करीत नसल्या तरी निर्णयही करीत नव्हत्या. त्यांचा मूड वेगळा होता. १९७७च्या जानेवारीत यशवंतरावांना विदेश दौऱ्यावर निघायचे असल्याने त्यांची पंतप्रधानांशी भेट व चर्चा झाली. या चर्चेच्या वेळीही आणीबाणी मागे घेऊन देशात रीतसर निवडणुका घ्याव्यात असे यशवंतरावांनी सांगितले. चर्चा झाली पण निर्णय झाला नाही.

दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार यशवंतराव जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात दौऱ्यावर गेले. १५ जानेवारीस ते फ्रँकफूर्टला पोहोचले. या दौऱ्यात त्यांची फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे विदेशमंत्री श्री. गेनचर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. श्री. गेनचर यांना मार्चमध्ये हिंदुस्थानला भेट देण्याची इच्छा होती. ती त्यांनी या चर्चेच्या ओघात व्यक्त केली. परंतु त्यापूर्वी पार्लमेंटच्या निवडणुकी जाहीर झाल्या तर मार्चचा पहिला आठवडा सोयीस्कर ठरणार नव्हता. त्यामुळे गेनचरला काय सांगावे असा यशवंतरावांना पेच पडला.

फ्रँकफूर्टचा दौरा उरकून यशवंतराव ता. १८ जानेवारीला बुखारेस्टला पोहोचले. हा एक दिवसाचा दौरा असल्याने दुसऱ्या दिवशी दिल्लीला परतण्याचे त्यांनी ठरविले. ती तयारी सुरू असतानाच दिल्लीहून त्यांना एक खास मेसेज मिळाला. तो मेसेज आणि यशवंतरावांची मनस्थिती त्यांनी वेणूबाईंना तेथूनच लिहिलेल्या पत्रात व्यक्त झाली आहे. ते पत्र असे -
------------------------------------------------------------

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org