विरंगुळा - १०९

कलकत्ता

सकाळी कलकत्त्यास आलो. पुरुलिसाच्या वाटेवर 'डमडम'वर सेंट्रल बँकेचे आडारकर भेटले. कलकत्त्याच्या बँकेच्या मेन ऑफिसची बिल्डिंग आगीत भक्षस्थानी पडली. त्याची करुण कहाणी सांगत होते. सर्व रेकॉर्डस् जळाली. बँकेचे व्हाल्टरूम सुरक्षित आहे म्हणत होते.

सिद्धार्थ शंकर आणि माया रे बंगालचे निमंत्रक शंकर घोष आल्यानंतर बंगाल सरकारच्या डकोटाने पुरुलियास गेलो. तेथून ४० मैलाचा प्रवास करून वायदंडीला पोहोचलो. एका सोसायटीच्या उद्घाटनास ग्रामीण लोक पुष्कळ होते.

वाटेत येता जाता सिद्धार्थशी पुष्कळ चर्चा झाली. सी पी आयचे धोरण घातकी आहे हे आपल्या अनुभवावरून तो सांगतो. त्याचा मुख्य सिद्धांत असा की, सी पी आय काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा 'स्प्लिट' पाडू इच्छिते. पहिल्या स्प्लिटनंतर काँग्रेसचे पुनर्मीलन होऊन ती इतकी शक्तिशाली होईल असे त्यांना वाटले नव्हते. परंतु ही किमया घडली खरी. परंतु पुन्हा स्प्लिट झाल्यानंतर काँग्रेसला आपल्या भागीदारीत चालावे लागले हा त्यांचा विचार बंगाल काँग्रेसच्या युवक संघटनेशी ती बीजे पेरीत आहे. त्यांच्यापुढे ती आज फारच महत्त्वाची समस्या होऊन बसली आहे. पुरुलिया शहरातून जात असता सिद्धार्थला आपल्या आजीची तीव्र आठवण झाली. दार्जिलिंगच्या वाटेवर सिलीगुडीमध्ये त्यांनी केलेले भाषण - या आवारातून मी जन्मलो की नाही माहीत नाही परंतु पुन्हा जन्माला आलो तर बंगालमधील आदिवासी मुलखात शेतमजुराच्या पोटी जन्म घेईन. सिद्धार्थचे डोळे भरून आले. आणि आजही त्या भागातील लोकात मनात तो कुणीतरी असेल असे वाटते.

दिल्लीत असताना किंवा विदेश दौऱ्यात आंतरराष्ट्रीय प्रश्नात गुंतलेले असताना चिंता करतो देशाची - महाराष्ट्राची! हीच यशवंतरावांच्या विचाराची, मनाची अवस्था सातत्याने राहिली. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी, नेते म्हणविणारांनी, प्रदेशाचा सर्वांगिण विकास, समृद्धी, सामाजिक शांतता यासाठी एकसंधपणे, सर्व शक्तिनिशी स्वत:ला वाहून घ्यावे आणि महाराष्ट्र देशातील एक अग्रेसर राज्य अशी प्रतिमा निर्माण करावी या विचाराची पेरणी महाराष्ट्र भूमीत करण्यात यशवंतरावांनी सर्वस्व वेचले. त्या भूमीत मतभेदाची, दुहीची, गटातटाची झुडपे माजताना पाहून त्यांना विषाद वाटणे स्वाभाविकच होय. वेळ मिळेल, कार्यकर्त्यांना एकत्रित भेटण्याची संधी मिळेल त्या प्रत्येक वेळी त्यांनी त्यांना समजावण्याच्या आणि समृद्धीच्या राजमार्गाने वाटचाल करण्याचा सल्ला दिला. सल्ला देत राहिले. परंतु कार्यकर्ते प्रत्यक्षात कसे वागतात ही चिंता पोखरीत राहिली.

काँग्रेस हा देशातील सर्वश्रेष्ठ पक्ष. सत्ता संपादनासाठी हुकमी बहुमत मिळविणारा पक्ष. परंतु हे हुकमी बहुमतच पक्षाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरेल असा इशारा निरनिराळ्या प्रसंगाने सत्ताकांक्षी नेत्यांना, कार्यकर्त्यांना यशवंतराव देत राहिले. परंतु फितुरीचे रुजलेले बीज फोफावत राहिले. महाराष्ट्राचा नियोजित विकासाच्या मार्गावरील रथ अडखळत चालत राहिला. यशवंतरावांना ही खंत होती. महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमधील बेदिली, एकमेकांचा अधिक्षेप करण्याची वृत्ती, अपरिपक्व सत्ताकांक्षा आणि सूडाची भावना याबाबत ते परदेश दौऱ्यातील निवांत वेळी, अंतर्मुख बनून चिंतन करीत राहिले. वेणूताईंना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी हे चिंतन शब्दबद्ध केले आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org