विरंगुळा - १०७

दिल्ली
२ फेब्रुवारी

आज सौ. वेणूबाईंचा वाढदिवस. ४९ संपून पन्नासावे सुरू. म्हणजे आता ती पन्नाशीत पोहोचली. तिची प्रकृती उत्तम राहो अशी मनापासून प्रार्थना केली.
 
माझ्या घरच्या सर्व लोकांचे ती इतके करते - परंतु त्यांच्यापैकी कुणी साधा टेलिफोन करून शुभेच्छा व्यक्त करण्याइतकीही आपुलकी दाखविली नाही. हे सर्व पाहिले म्हणजे मन उदास होते.
 
पण वेणूबाई आज आनंदात होती. सर्वांना गोडधोड जेवण दिले. आम्ही सुरेखसे फोटो काढले. आम्हा दोघांचे! Many happy returns of the day.
-----------------------------------------------------------
आज पंतप्रधानांना भेटलो. महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीबाबत बोलणे निघाले. विशेष चर्चा गुजराथची झाली.

गुजराथमध्ये जनतेने पोलिसांना दगड व सैन्याला मार दिला ही एक विशेष आश्चर्यकारक घटना आहे असे मी म्हटले. यावर पंतप्रधान म्हणाल्या - हे डेंजरस आहे. मी म्हटले - पोलिसांचे, सैन्याचे या पद्धतीने स्वागत होणे धोक्याचे आहे.
------------------------------------------------------------
दादासाहेब रूपवते भेटले. खाडिलकरांची (र. के.) नवी चाणक्यनीती सांगत होते. ''चव्हाण ज्या पद्धतीने वागतात त्यांचे 'बरोबर' आहे हे दाखविणे खरे नाही'' असे काहीतरी पंतप्रधानांना बोलून आलो आहे. असे त्यांना म्हणाले.

रूपवते म्हणाले, 'ही पुणेरी राघोबादादाची चाल अशीच चालू राहिली तर सत्यानाश होणार!'

मी म्हटलं, या दुष्टाव्याला मी कसे तोंड देणार - मी माझ्या पद्धतीने तिकडे दुर्लक्षच करणार.

महाराष्ट्रात ताणतणाव

नवी दिल्ली,
सप्टेंबर १९७४

आतापर्यंत रोम, कौलालंपूर, वॉशिंग्टन, मॉस्को आणि आय एम एफ साठी पुन्हा बाली असा पाच वेळा बाहेर जाऊन आलो. माझ्याकडील वृत्तांत सौ. वेणूबाईंना लिहिलेल्या पत्रात आहे.

महाराष्ट्राचे राजकारण अधिकच ताणतणावाचे होते आहे. मंत्रिमंडळात मतभेदाचे पीक आहे. परस्परांबद्दल वेडेवाकडे कोणाशीही बोलत असतात. यातना होतात हे ऐकून. माझ्याशी कोणी बोलत नाही परंतु ज्यांच्याशी बोलले जाते ते येऊन सांगतात.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org