विरंगुळा - १०६

नवी दिल्ली

'पीएसी'ची बैठक झाली. धान्य परिस्थिती व त्यातून निर्माण झालेली कायदा-सुव्यवस्थेची स्थिती याबाबत पुन्हा यापूर्वीच्या चर्चेचीच पुनरावृत्ती झाली. गुजराथबाबतचा तपशील मिळाला. डॉ. अमूलचे आडदांडगे धोरण आहे.

रात्रीचे जेवण राष्ट्रपती भवनवर झाले. श्रीलंकेच्या पंतप्रधान होत्या. जेवणाच्या वेळी श्रीमती भंडारनायकेंच्या ज्येष्ठ कन्या सुनेत्रा रूपसिंगे बरोबर होत्या. ऑक्स्फर्डच्या पदवीधर आहेत. वडिलांच्यासारखी वाटली. गंभीर, आत्मविश्वासी, महत्त्वाकांक्षी, कर्तबगार वाटली. डिफेन्स इन्स्टिट्यूटमध्ये बराच रस दाखविला. ऍप्रोच रॅडिकल वाटला. Must watch this lady.

अशोकामध्ये श्रीमती भंडारनायकेंचे जेवण होते. पंतप्रधान मोकळ्या बोलल्या. जेवणासाठी शेजारी बसलो होतो. बोलता बोलता रिपब्लिक दिनाची चर्चा निघाली. त्यावरून लाहोर काँग्रेसची आठवण निघाली. इंदिराजींनी त्या थंडीत बाहेर तंबूमध्ये ते सर्वजण कसे राहिले ते सांगितले. एक प्रसंगही सांगितला.

पंडितजींची शुभ्र घोड्यावरून मोठी मिरवणूक निघाली. स्वातंत्र्याचा पुकार होणार म्हणून. परंतु बँडवाले उत्साहाच्या भरात गाणे वाजवू लागले - गॉड सेव्ह दि किंग! त्यांच्या मताप्रमाणे आनंदाच्या प्रसंगी हेच गीत गायले पाहिजे!
------------------------------------------------------------
आज पुन्हा 'पीएसी'ची बैठक झाली. पंतप्रधान गैरहजर राहिल्या. सिलोन जवळचे बेटाचे भवितव्य ठरले. त्रयस्थांचे मदतीने कायदेशीर द्यावेच लागेल. मैत्री ठेवून आपणहून देणे शहाणपणाचे. कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या श्रीलंकाचा हक्क स्पष्ट आहे अशी बोलणी झाली. निर्णय पंतप्रधानांवर सोपविला.

श्री. माधव आपटे यांनी मलेशियातील एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवण दिले. त्यास हजर राहिलो. माणूस मोठा डायनामिक वाटला. भारताचा मनापासूनचा मित्र वाटला. भारताबाबत- 'त्याच्या देशातही फारच गैरसमज आहेत. भारताच्या औद्योगिक प्रगतीची कल्पना बाहेर फारशी नाही.' हे त्याच्या बोलण्याचे सूत्र होते. कौलालंपूर बैठकीस यावर्षी गेलो तर त्याच्या राज्यामध्ये एक दिवसासाठी जाण्याचे कबूल केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org