यशवंतरावांचे अंतरंग
विरंगुळा
संपादक : रामभाऊ जोशी
-------------------------------
Ebook साठी येथे क्लिक करा |
प्रस्तावना
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे कार्य फार महत्त्वाचे आहे, मौलिक आहे. अशा राजकीय नेत्याच्या मनाची जडणघडण कशी झाली हे जाणून घेणे आवश्यक आहे.
कृष्णाकाठ' हा यशवंतराव चव्हाणांच्या आत्मकथनाचा पहिला भाग वाचल्यानंतर त्यांच्या लहानपणी, आईचे त्यांच्यावर झालेले संस्कार, ज्या ग्रामीण भागात ते वाढले तो परिसर, त्यांच्या कुटुंबाचे कष्टप्रद जीवन, कराडला आल्यावर टिळक हायस्कूलमधील शिक्षण, विद्यार्थी असताना केलेले अन्य वाचन आणि कराडमधील राजकीय व सामाजिक वातावरण यामधून त्यांच्या मनाला जो आकार आला त्यामुळे सोळा-सतराव्या वर्षी मॅट्रिकच्या वर्गात असतानाच त्यांनी १९३० सालच्या स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली हे समजून येते. यशवंतरावांना दीड वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात तुरुंग हे सत्याग्रहींचे विद्यापीठ होते. येरवडा तुरुंगात यशवंतरावांनी आचार्य भागवतांची जी बौद्धिके ऐकली, एस्. एम्. जोशी, ना. ग. गोरे आदी मित्रांशी ज्या चर्चा केल्या आणि स्वत: जे वाचन केले त्यामुळे त्यांच्या राजकीय जाणिवेला वैचारिक अधिष्ठान लाभले.
तुरुंगातून सुटून आल्यानंतर कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजातून बी. ए. झाल्यावर आणि पुढे पुण्याच्या लॉ कॉलेजामधून एल. एल. बी. झाल्यानंतर यशवंतरावांच्या जीवनाला थोडे स्थैर्य आले. परंतु एक वर्षातच १९४२ चा स्वातंत्र्य संग्राम सुरू झाला. यशवंतराव भूमिगत राहून कार्य करीत होते. नंतर त्यांना अटक झाली. पुढे स्वातंत्र्यपूर्व काळातील निवडणुकीत यशवंतराव विधानसभेवर निवडून आले. बाळासाहेब खेर यांनी पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती केली.
'कृष्णाकाठ' मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या येथपर्यंतच्या वाटचालीचे निवेदन केले आहे. 'कृष्णाकाठ' वाचल्यानंतर यशवंतरावांशी माझी भेट झाली. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, 'आपण आपले आत्मकथन लवकर लिहून पूर्ण करावे. माझ्यासारखे असंख्य वाचक ते वाचायला फार उत्सुक आहेत.' यशवंतराव हसले आणि म्हणाले, 'बघू या कसं जमतं ते.' परंतु पढे दुर्दैवाने यशवंतरावांच्या पत्नी वेणूताई यांचे निधन झाले. त्यामुळे 'सागरतळी' हा यशवंतराव चव्हाण यांच्या मुंबईतील वाटचालीतील जीवनाचे चित्रण करणारा भाग आणि 'यमुनातीरी' हा त्यांच्या दिल्लीतील राजकीय जीवनाचा आलेख देणारा भाग, हे त्यांचे संकल्पित लेखन झालेच नाही. मला याची फार रुखरुख वाटते.