या चळवळ्या मुलानं, १९४२ चं स्वातंत्र्य-आंदोलन सुरू झालं त्या वेळी त्यांत भाग घ्यायचं ठरवलं. तरुण मुलांचा एक गट त्यानं तयार केलेलाच होता. परंतु मामा-यशवंतराव-भूमिगत झालेले असल्यानं, या चळवळींत नेमकं काय करायचं हें बाबूला उमगत नव्हतं. कांही तरी करायचं एवढीच तळमळ होती. त्यांतच एक दिवस मामा गुप्तपणानं येत आहेत म्हणून सुगावा लागल्यानं त्यांना भेटण्यासाठी कराडनजीकच्या शिरोडें स्टेशनवर बाबू गेला. मामांच्या भेटीनंतर बाळनाथबुवांच्या मठामध्ये त्या वेळीं एक गुप्त बैठक झाली. मामांनी तिथे जमलेल्या तरुणांना चळवळीची दिशा समजून सांगितली. बाबूच्या मनांत चळवळीचे विचार घट्ट होते. मामांचं मार्गदर्शन मिळतांच बाबूनं शाळा सोडली अन् चळवळीला वाहून घेतलं. मामांचा चिटणीस महणूनच जणू कांही तो काम करूं लागाल.
या चळवळींत बाबूला १ जानेवारी १९४३ ला अटक झाली. पण अटक होईपर्यंत बाबूनं अनेक धाडशी उद्योग केले होते. रात्री-अपरात्रीं हिंडत राहून गुप्तपणानं चळवळींतली कामगिरी करण्यांत बाबूचा पुढाकार असे. वडूजच्या मोर्चाला जाण्यासाठी मामा-भाच्यानं असंच एक धाडस केलं. कराडहून रात्रीं रेल्वेनं एका संकेतस्थळीं जायचं ठरलं होतं. बाबू नेहमीप्रमाणे एक प्रवासी म्हणून कराड-स्टेशनवर गाडींत चढला आणि त्याच वेळीं फलाटाच्या विरुद्ध दिशेनं यशवंतराव डब्यांत शिरले. डब्यांत शिरल्यानंतर यशवंतराव सरळ बाकाखाली जाऊन झोपून राहिले आणि बाबू पाळत ठेवत राहिला. रहिमतपूर स्टेशन येतांच दोघेहि गाडींतून उतरले. त्यांना पुढे औंधला आणि तिथून पुढे वडूजच्या बाजूला जायचं होतं. त्या काळांत प्रत्येक रेल्वेस्टेशनवर पोलिपहारा असे आणि येणा-या-जाणा-यांवर त्यांची पाळत असे. रेनकोट, बॅग, कपडे वगैरेसह हे दोन प्रवासी स्टेशनवर उतरले तेव्हा पोलिस तिथे हजरच होते. परंतु यशवंतरावांचं धाडस असं कीं, पोलिस उभे होते तिथेच जाऊन त्यांनी रेनकोट अंथरला आणि मामा-भाचे, पोलिसांच्या पहा-याजवळच झोपले. बिचारे पोलिस! या प्रवाशांना कुठे तरी खेड्यांत जायचं असेल अन् उजाडल्यावर ते जाणार असा विचार करून पहा-यावरील पोलिसांनी या प्रवाशींची विशेष दखल घेतली नाही. मात्र पहाटे ही दुक्कल उठली आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन औंधला निघून गेली. तिथे बापूराव शेंडे यांच्याकडे सकाळी न्याहारी वगैरे करून पुढे वडूजच्या मोर्चाची आखणीसाठी सर्वजण सुखरूप स्थळी पोंचले.
शिरोडें-स्टेशन-जळित-प्रकरणांतहि बाबूनं जबाबदारीनं कामगिरी बजावली होती. बैलगाडींतून, कधी पायीं चालत, असा रात्रीच्या वेळीं बाबूचा संचार कराडच्या पंचक्रोशींत सुरू असायचा. अशा धामधुमींतच बाबू एक दिवस पकडला गेला. चव्हाण-कुटुंबापैकी गणपतरावांना पकडलंच होतं. सौ. वेणूबाईंनाहि तुरुंगाची वारी करावी लागली होती आणि आता बाबूहि पोलिसांना सापडला. स्वत: यशवंतराव भूमिगत राहून काम करत होते. सबंध चव्हाण-कुटुंबच चळवळींत सामील झालेलं होतं. त्यांच्या नात्यांतलीं अन्य माणसं मात्र धास्तावली होती. त्या काळांत चव्हाणांच्या घराकडे कुणी पाहुणा फिरकत नसे.
बाबूला पकडल्यानंतर यशवंतरावांचा पत्ता समजून घेण्यासाठी पोलिसांनी त्याला पुष्कळ छळलं. मारहाण केली. यशवंतरावांची माहिती बाबूकडून कळेल असं पोलिसांना कुणी तरी सांगितलं होतं. त्यासाठी मग सत्तावीस दिवस बाबूनं छळ सोसला. नग्न करून त्याला अमानुष मारझोड करण्यांत आली, परंतु अखेरपर्यंत बाबूच्या तोंडून पोलिसांना भूमिगत यशवंतरावांचा ठावठिकाणा समजूं शकला नाहीं. तुरुंगांत बाबूला दोन वर्षे रहावं लागलं आणि १९४५ च्या जानेवारींत त्याची सुटका झाली. त्या काळांत चव्हाणकुटुंबाला आणि कोतवालांना आधार फक्त आक्कांचा- विठाईचाच राहिला होता. सौ. वेणूबाई आणि गणपतराव यांच्याकडूनहि पोलिसांनी छळ करून, आमिषं दाखवून यशवंतरावांचा सुगावा लावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांत त्यांना यश आलं नव्हतं. बाबूनंहि तेंच अपयश पोलिसांच्या पदरीं बांधलं.