हातावर पोट भरणारांची दाटी कराडांत झालेलीच होती. विठाईचं कुटुंब त्यांतलंच एक बनलं सारेच गरीब. तुलनेला तिथे अवसरच नव्हता. गावांत आणि आवती-भोवतीं इंग्रजांच्या कृपेनं बनलेले रावसाहेब, रावबहादूर, वतनदार, जहागीरदार, अशा नव्या शिष्टवर्गाचा जमाना वाढत होता आणि सरकारी नोकरींत शिरलेला पांढरपेशावर्ग बाळसं धरुं लागला होता. परंतु उघडयावर पडलेल्या चव्हाण कुटुंबाकडे, निराधार मुलांकडे पहाणारे त्यांच्यांत कुणी नव्हते. गरिबीनं गांजलेल्यांना कामाला जुंपून त्यांना आणखी पिळणं, गुलाम म्हणून त्यांना राबवणं हीच सरसकट वृत्ति. विठाईंची हृदयद्रावक कहाणी ऐकून कांहीजण पाझरल्यागत करीत, पण तें तितकंच ! नुसचा कोरडा जिव्हाळा !
घरांत मुलांकडे पहात बसण्यापेक्षा विठाईंला आता त्यांच्यासाठी कांही करावं लागणार होतं. करावे लागतील तेवढे स्वत:च कष्ट करणं हेंच नशिबी होतं. गरिबांच्यासाठी, भुकेल्या पोटासाठी ब्रिटिश सरकार कांहीच करीत नव्हतं.
त्या अवस्थेंत बडे जमीनदार, नोकरदार किंवा पांढरपेशे यांनाच जगतां येणं शक्य होतं. तेवढाच वर्ग जिवंत होता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारांनी कष्ट करायचे आणि मरण येत नाही म्हणून जगायचं त्यांना कुणी वाली उरला नव्हता. विठाई रोजगार करत होती. परंतु ती मिळकत एक वेळचं पोट भरण्यासहि अपुरी होती.
परतु कधी कधी असंहि घडतं की, उजाड वाळवंटांत एखादा पाण्याचा झरा दिसतो. हिरवळ आढळते. मृगजळाच्या मागे धांवणारे मग त्या रोखानं वाळू तुडवू लागतात. चोंच दिली त्यांना चा-याचीहि व्यवस्था केलेली असते म्हणतात ! त्या वैराणभूमींत विठाईला असाच एक झरा दिसला.
विठाईचा मोठा मुलगा ज्ञानोबा. बळवंतरावांच्या पश्चात् ज्ञानोबाचाच तिला आधार वाटत होत. ज्ञानोबा आता मोठा झाला होता. बळवंतराव होते तोंपर्यंत विट्याच्या शेतींतलं शेर-पायली धान्य आणण्याची व्यवस्था होती. परंतु मागे लहान मुलं राहिल्यामुळे भाऊबंद आणि वांटेकरी यांना या लहान मुलांना कांही आधार द्यावा अशी जाणीव उरली नव्हती. विठाईच्या रोजगारांत मुलाचं पोट भरत नव्हतं. त्यामुळे आपल्याबरोबर ज्ञानोबालाहि रोजगारीवर नेण्याशिवाय तिला गत्यंतर उरलं नव्हतं. ज्ञानोबा लहान, तो कष्ट ते काम करणार, त्याला कष्टाला जुंपावं तर विठाईंच्या मनाच्या यातना आणखीच वाढणार होत्या. पण इलाज नव्हता. सल्लासमलत करण्यासहि कुणी जवळ उरलं नव्हतं. आपल्याच मनाला आपलं दु:ख सांगण्याचं आता विठाईच्या अंगवळणीं पडलं होतं. या दु:खाचा कधी डोळ्यावाटे स्फोटहि व्हायचा, पण तें सुध्दा मुलं घरांत नसतांना - एकटीच असतांना ! अर्धपोटीं मुलं आणखी करपून जाऊं नयेत याचीहि विठाईला काळजी होती.
हिरमुसल्या मनानं काळजीची बेरीज करीत विठाई एक एक दिवस मागे सारीत होती. अशांतच एक दिवस, ज्ञानोबाला नोकरीला लावण्याच्या विचाराची मनांत जुळणी झाली. त्यासाठी प्रयत्नहि सुरु केला.परंतु त्या काळांत नोकरीसाठी पांढरपेशा-वर्गाची मक्तेदारी बनली होती. दैवजात दु:खी असलेल्या समाजांतील वर्गाला पराधीनतेचं जीवन जगण्याशिवाय गत्यंतर उरलेलं नव्हतं. ज्ञानोबाच्या नोकरीची जुळणी मनांत झालेली असली तरी, त्यासाठी प्रत्यक्षांत मार्ग सापडत नव्हता. अन् एक दिवस, त्या वैराण वाळवंटांतील झ-याच्या काठावरच आपण पोंचलो आहोंत असं विठाईच्या अनुभवाला आलं. ज्ञानोबानं बेलिफ व्हावं, बळवंतरावांच्या जागेवरच रूजूं व्हावं, असं कुणीं तरी सुचविलं होतं.