पं. नेहरूंनी नभोवाणीवरून मुंबईबाबतचा निर्णय जाहीर केला त्या दिवसापासून मुंबईंत दंगल उसळली. गिरगावांत ठाकूरद्वार भागांत ट्रॅम्स आणि बसगाड्या जाळण्यापासून जनतेनं राग व्यक्त करण्यास सुरूवात केली तेव्हा तिथेच पहिला गोळीबार झाला. लोक मोर्चानं येऊन घोषणा करत चालले होते. कुठेहि दगडफेक किंवा लुटालूट हे प्रकार सुरू झालेले नव्हते. तरी पण पोलिसांनी लाठीहल्ला व गोळीबार करून लोकांना चिथवलं. मुंबईत आठ दिवस दंगल सुरू राहिली. लाठीहल्ले, गोळीबार, धरपकड यांमुळे सा-या शहरांत हाहाकार उडाला.
या दंगलींत पोलिसांच्या गोळीबारांत किती लोक ठार झाले याबाबत एकमत कधीच होऊं शकलं नाही. संयुक्त महाराष्ट्र समितीचं म्हणणं या गोळीबारांत मोरारजींनी १०५ लोक ठार मारले. लालजी पेंडसे यांनी नांवनिशीवार कांही मृतांची माहिती जाहीर केली आहे. सरकारनं मृतांचा अधिकृत आकडा जाहीर केला आहे- त्यांतहि प्रत्येक वेळेला बदल होत गेला आहे. ६७ आणि ७५ असे ते आकडे आहेत. निरनिराळ्या मार्गांनी माहिती जमा करून वस्तुस्थितीचा तपास लावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या माहितीनुसार मृतांची संख्या ८१ पेक्षा जास्त नसावी. परंतु एक गोष्ट स्पष्ट दिसते की, सरकारी आकडे आणि समितीचे आकडे यांमध्ये दहा-बारांचाच फरक आहे.
या दंगलीच्या वेळीं गुजराती स्त्रियांवर अत्याचार झाल्याचंहि भांडवल करण्यांत आलं. मोरारजींना याबाबत असेंब्लींत जेव्हा प्रश्न विचारला गेला त्या वेळीं, अत्याचाराचे २७ प्रकार घडल्याची माहिती त्यांनी दिली. पण यांपैकी एकाहि महिलेनं तक्रार नोंदवलेली नाही किवा माहिती दिलेली नाही, अशी सोडवणूक त्यांनी करून घेतली. मोरारजीचं म्हणणं असं की, ज्या महिलांवर अत्याचार झाले त्यांच्या नातेवाइकांनी ही माहिती सांगितली. त्याच्याहि पुढे जाऊन तीन महिलांना कांही गुंडांनी नग्न करून रस्त्यावरून ओढत नेलं अशी एक चक्षुर्वैसत्यम् हकीगतहि मोरारजींनी सांगितली. त्यांनी म्हणे तो भयंकर प्रकार स्वत: पाहिला होता. पण आश्चर्य असं की, मोरारजींच्या पोलिसखात्याला या महिलांवर अत्याचार करणा-या या गुंडांपैकी कुणीहि कधीहि सापडले नाहीत. यांतलं एकहि प्रकरण कधी कोर्टांत गेलं नाही. महिलांवरील अत्याचाराचे आरोप हे निराधार असल्याचं समितीच्या महिलांनी गुजराती व मारवाडी यांच्या घरोघर हिंडून व माहिती घेऊन सिद्ध केलं. तरी पण मोरारजींनी दिल्लीला या अत्याचाराची माहिती कळवून समितीच्या चळवळीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतल्या गोळीबाराची आणि या अत्याचाराचीहि न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी लोकांनी केली, परंतु मोरारजी, नेहरू, पंत यांनी ती मानली नाही.
१७ जानेवारीच्या हरताळापासून मुंबईंत खरी दंगल उसळली. हजारो लोक रस्त्यावर आले. पोलिस आणि जनता यांच्यांत जागोजाग युद्ध सुरू झालं. पोलिसांच्या अंगावर अँसड-बल्ब फेकले जात होते. तर पोलिस त्यांना गोळीबारानं उत्तर देत होते. दंगल आटोक्यांत आणण्यासाठी संचारबंदीहि लागू करण्यांत आली, पण लोक हटले नाहीत. पोलिसांच्या गोळ्यांना लोक बळी पडत आहेत असं पाहून ऐन दंगलीच्या भागांत घुसून एस्. एम्. जोशी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत राहिले. आपल्या प्राणाची पर्वा न करतां ते प्रत्येक ठिकाणीं धांवून गेले. खवळलेल्या लोकांमध्ये सापडलेल्या एका पोलिस-इनस्पेक्टरचे प्राण त्या वेलीं एस्. एम्. जोशी यांच्यामुळेच वांचले. मुंबई प्रदेश व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी गर्दीत जाऊन लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला नाही. तसा तो करणंहि त्या वेळीं शक्य नव्हतं. पत्रकं काढून त्यांनी फक्त गुंडगिरीचा निषेध केला. या दंगलींत पांच वर्षांच्या मुलापासून पन्नास वर्षांच्या माणसापर्यंत गोळीबारांत ७१ जण ठार झाले आणि यांतील कांहीजण आपल्या घरांत असतांनाच मारले गेले. याचा अर्थ पोलिसांनी केलेला गोळीबार हा स्वैर होता. गोलीबारासाठी पोलिसांनी ३०३ नंबरच्या गोळ्या वापरल्या होत्या हें मोरारजींनीच मान्य केलं.
मुंबईंत दंगल सुरू झाल्यानंतर पं. नेहरूंना त्याची माहिती कळवून, त्यांच्या अनुमतीनंच मोरारजींनी दंगल काबूंत आणण्यासाठी सर्व कठोर उपाय योजले होते. आवश्यकता भासल्यास लष्कराची मदत घेण्याची परवानगीहि नेहरूंनी त्यांना दिली होती. त्यानुसार मोरारजींनी लष्कराला तयार रहण्याचा इशाराहि दिला; पण प्रत्यक्षांत मुंबईंत लष्कर बोलावलं गेलं नाही.